Monday, 12 December 2011

गर्ग संहिता - ४

पुढे भगवान् ब्रह्मदेवांना म्हणाले, "सुबल आणि श्रीदामा नावाचे माझे सखा नंद आणि उपनंदांच्या घरी जन्म घेतील. यांच्याशिवाय माझे इतर स्तोककृष्ण, अर्जुन आणि अंशु वगैरे जे मित्र आहेत त्यांचाही जन्म नवनंदांच्या घरात होईल. ब्रजमंडळामध्ये जे सहा वृषभानु आहेत, त्यांच्या घरांमध्येही विशाल, ऋषभ, तेजस्वी, देवप्रस्थ आणि वरूथप नावांचे माझे सखा अवतीर्ण होतील."
त्यावर ब्रह्मदेवांनी त्यांना विचारलं, "देवेश्वर! हे नंद कुणाला आणि उपनंद कुणाला म्हण्टलं जातं? त्याचप्रमाणे वृषभानुंची काय लक्षणं आहेत?
तेव्हा भगवंतांनी उत्तर दिलं, "ज्यांच्याकडे गोठ्यांमध्ये नेहमी गोपालन होतं आणि गोसेवा हीच ज्यांची उपजीविका आहे त्यांना मी 'गोपाल' असं म्हणतो. ज्या गोपाळांकडे नऊ लाख गायी असतात त्यांना 'नंद' म्हणतात. ज्यांच्याकडे पाच लाख गायी असतात त्यांना 'उपनंद' म्हणतात. ज्यांच्या अधिकारात दहा लाख धेनु रक्षणासाठी असतात त्यांना 'वृषभानु' म्हणतात तर ज्याच्या अधिकारात एक कोटी धेनुंचं रक्षण होतं त्याला 'नंदराज' म्हणतात. पन्नास लाख गायींची रक्षा करणारा 'वृषभानुवर' म्हणून ओळखला जातो. सुचंद्र आणि द्रोण हे दोघे या प्रकारच्या संपूर्ण लक्षणांनी युक्त असे संपन्न गोपराज बनतील आणि माझ्या दिव्य ब्रजातील सुंदर वस्त्रे धारण करणार्‍या, शंभर चंद्रांचं सौन्दर्य ल्यालेल्या गोपसुंदरींचे शंभर यूथ असतील."
भगवंतांनी असं म्हण्टल्यावर ब्रह्मदेवांनी त्यांना विचारलं, "भगवन्! तुम्ही दीनबंधू आणि प्रकृतिचेही कारण आहात, कृपया मला या यूथांची सगळी लक्षणं सांगाल का?"
त्यावर भगवंत म्हणाले, "संख्यासंदर्भाने शंभर कोटी म्हणजे एक अर्बुद आणि शंभर अर्बुद म्हणजे एक यूथ. या संख्येने असलेल्या गोपींमध्ये काही गोलोकवासिनी आहेत, काही द्वारपालिका आहेत, काही श्रुंगार-साधन-वाहिका आहेत तर काही शय्या-निर्मिती करणार्‍या आहेत. काही पार्षदश्रेणीमधल्या आहेत तर काही वृन्दावनाची देखरेख करणार्‍या आहेत. काही गोपींचा गोवर्धन गिरीवर निवास आहे. काही गोपी कुञ्जवनाच्या देखभालीचं कार्य करतात तर काही माझ्या निकुञ्जामध्ये निवास करतात. या सगळ्यांना माझ्यासोबत ब्रजामध्ये यावं लागणार. त्याचप्रमाणे गंगा-यमुनांचेही यूथ आहेत. तसेच रमा, मधुमाधवी, विरजा, ललिता, विशाखा आणि मायेचेही यूथ यामध्ये असतील. ब्रह्मदेवा, याप्रमाणे माझ्या ब्रजामध्ये आठ, सोळा आणि बत्तीस सखिंचेसुद्धा यूथ असतील. पूर्वीच्या अनेक युगांमध्ये ज्यांना मी त्यांनी मागितलेले वर प्रदान केलेले आहेत अशा श्रुति, मुनीपत्नी, अयोध्येतील महिला, श्रीरामांनी यज्ञात वापरलेल्या सुवर्ण सीता-प्रतिमा, जनकपुरी आणि कोसलनिवासी सुंदर्‍या आणि दण्डकारण्यादि अरण्यांतील भिल्लकन्या या देखिल माझ्यासोबत ब्रजामध्ये गोपीरूपात अवतरीत होतील आणि त्यांचेही यूथ असतील."
त्यावर ब्रह्मदेवांनी विचारलं, "या स्त्रियांनी कोणत्या पुण्यकर्मांमुळे हा ब्रजवासाचा वर मिळवला? कारण तुमचं धाम हे तर योगीजनांसाठीही दुर्लभ मानलं जातं."
तेव्हा भगवंत त्यांना म्हणाले, "फार पूर्वी श्रुतिंनी श्वेतद्विपात जाऊन माझ्या विराट पुरूषरूपाचे आपल्या मधुर वाणीने स्तवन केले होते. त्यावर सहस्त्र पाद विराट पुरूष प्रसन्न होऊन त्यांच्याशी बोलू लागले."
विराट पुरूष श्रुतिंना म्हणाले, "श्रुतिंनो, तुम्हाला जे काही मिळवण्याची इच्छा आहे त्याचा आशीर्वाद मागा. मी ज्यांच्यावर प्रसन्न झालो आहे त्यांना अप्राप्य असं काय असेल?"
तेव्हा श्रुति बोलल्या, "भगवन्, तुम्ही मन आणि वाणी यांच्या आधाराने जाणले जाऊ शकत नाही म्हणून मग आम्ही तुम्हाला पूर्णपणे जाणण्यास असमर्थ आहोत. पुराण जाणणारे ज्ञानी, तुम्ही 'आनंदमात्र' आहात असं सांगतात, तुमच्या त्या 'आनंदमात्र' रूपाचं आम्हाला दर्शन द्यावं."
श्रुतिंचं हे बोलणं ऐकून भगवंतांनी त्यांना सामान्य प्रकृतिच्या पलिकडल्या, त्यांच्या दिव्य गोलोक धामाचं दर्शन करवलं. हे धाम ज्ञानानंदस्वरूप, अविनाशी आणि निर्विकार आहे. इथे वृन्दावन नावाचं कल्पवृक्षांनी सुशोभित वन आहे. मनोहर बगिचे आहेत. सगळ्या ऋतुंमध्ये ते सुखदायीच असतं. तिथे सुंदर झर्‍यांनी आणि गुहांनी सुशोभित असा गोवर्धन गिरी आहे. रत्नं आणि मौल्यवान धातुंनी भरलेला हा श्रीमान् पर्वत विविध पशुपक्षांचं निवासस्थान आहे. इथे स्वच्छ जल असणारी यमुना नदीही वाहतेय. तिचे दोन्ही काठ रत्नांनी बांधलेल्या घाटांद्वारे सुयोजित आहेत. ते हंस आणि कमळं इत्यादिंनी नेहमी व्याप्त असतात. तिथे रास-रंगाने उन्मत्त गोपींचा समुदाय शोभायमान होतो आणि त्यांच्या मध्यभागी किशोरवयीन भगवान् श्रीकृष्ण असतात. त्या श्रुतिंना अशाप्रकारे आपल्या धामाचं दर्शन करवून भगवंत म्हणाले, "बोला, आता तुमच्यासाठी काय करू? तुम्ही माझं हे धाम तर पाहिलेलंच आहे, याखेरीज दुसरा उत्तम आशीर्वाद नाहीच."
त्यावर श्रुति म्हणाल्या, "हे प्रभो, तुमचा कामदेवाहून सुंदर विग्रह पाहून आमच्यात कामिनी-भावाची लागण झाली आहे आणि त्याच्या पूर्तीची उत्कट इच्छा होत आहे. आम्ही सार्‍या विरहाने तळमळत आहोत. तुमच्या गोपी जशा तुमचा संग मिळवण्यासाठी तुमची सेवा करतात तीच आमचीही इच्छा आहे."
तेव्हा श्रीहरि बोलले, "हे श्रुतिंनो, तुमचा हा मनोरथ दुर्लभ आणि दुर्घट आहे, पण मी तुम्हाला त्याच्या पूर्ततेचा वर दिलेला असल्याने तो पूर्ण होणार हे नक्की. तेव्हा ब्रह्मदेवांच्या पुढच्या नव्या जगत् निर्मितीमध्ये, सारस्वत कल्पाच्या समाप्तीनंतर तुम्ही सार्‍या ब्रजामध्ये गोपी बनाल. भूमण्डलातील मथुरामंडलामध्ये असलेल्या वृन्दावनातील रासमंडलात मी तुमचा प्रियतम बनेन. हे सर्व प्रकारच्या प्रेमाहून श्रेष्ठ आहे. त्यावेळेस तुमचा मनोरथ पूर्ण होईल."
असा श्रुतिंचा वृत्तांत ब्रह्मदेवांना सांगून भगवान् त्यांना म्हणाले, "आधीच्या कल्पामध्ये मी दिलेल्या आशीर्वादाचा परिणाम म्हणून श्रुति ब्रजामध्ये गोपी बनतील. आता इतर गोपींची लक्षणं ऐक."
त्रेतायुगामध्ये देवतांच्या रक्षणासाठी आणि राक्षसांच्या संहारासाठी माझे स्वरूपभूत महापराक्रमी श्रीरामचंद्रांचं अवतरण झालं. कमललोचन श्रीरामांनी सीतास्वयंवराच्या वेळेस जाऊन शिव धनुष्य तोडलं आणि तिच्याबरोबर विवाह केला. त्यावेळी जनकपुरीतील स्त्रिया श्रीरामांना बघून प्रेमविह्वल झाल्या. एकांतात त्यांनी, "राघव, तुम्ही आमचे प्रियतम बना", असा प्रस्ताव ठेवला. तेव्हा श्रीराम त्यांना म्हणाले की या जन्मामध्ये ते शक्य नाही तरी तुम्ही शोक करू नका. द्वापाराच्या अन्ति मी तुमची इच्छा पूर्ण करेन. तोपर्यंत तुम्ही श्रद्धा आणि भक्तिभावाने तीर्थ, दान, तप, शौच आणि सदाचाराचं पालन करा. ब्रजामध्ये गोपी बनण्याची संधी तुम्हाला मिळेल. असा वर देऊन धनुर्धारी, करुणानिधी श्रीराम अयोध्येला निघून गेले. अयोध्येला जाताना मार्गातील कोसल जनपथातील स्त्रियाही श्रीरामचंद्रांवर मोहित झाल्या. त्यांनी श्रीरामांना मनोमन आपला पति मानलं. तेव्हा सर्वज्ञ श्रीरामचंद्रांनी त्यांचे मनोरथ जाणून त्यांनाही, ब्रजामध्ये गोपी होण्याचा आणि तिथे त्यांच्या मनोरथपूर्तीचा आशीर्वाद दिला.
अशाप्रकारे सीता आणि आपल्या सेनेसहित श्रीराम अयोध्येत पोहोचले. ही वार्ता ऐकताच अयोध्येतल्या स्त्रिया त्यांना पहाण्यासाठी आल्या आणि त्यांना बघून मुग्ध झाल्या. श्रीरामांच्या प्रेमात विह्वल होऊन त्या शरयु नदीच्या तिरावर तप करू लागल्या. त्यावेळी आकाशवाणी झाली - द्वापाराच्या अंताला यमुनेच्या किनारी ब्रजभूमीमध्ये तुमचे मनोरथ नि:संशय पूर्ण होतील.
पुढे ज्यावेळी पित्याच्या आज्ञेने श्रीराम, धनुर्धारी लक्ष्मण आणि सीतेसहित वनवास करत होते तेव्हा तेथिल अनेक ऋषि-मुनि गोपालवेषातील भगवंतांच्या स्वरूपावर ध्यान करत होते. रासलीलेच्या निमित्ताने ते भगवंतांचे ध्यान करत होते. युवावस्थेतील धनुर्धारी श्रीरामचंद्रांना दुसर्‍या वेशातील भगवंतच समजून ते श्रीरामांकडे आकर्षित झाले. त्यांची समाधि भंगली. ते एकमेकांमध्ये बोलू लागले की गोपालजीच वंशीशिवाय आलेले आहेत. त्यांनी श्रीरामचंद्रांना मनोमन प्रणाम करून त्यांची स्तुति करण्यास आरंभ केला. त्यामुळे प्रसन्न होऊन श्रीराम त्यांना म्हणाले वर मागा. त्यावर त्या सर्वांनी एका सूरात सांगितलं की जशी सीता तुमच्या प्रेमाला प्राप्त करते तशाचप्रकारे आमची मागणी आहे.
त्यावर श्रीरामचंद्र त्यांना म्हणाले, "तुम्हाला लक्ष्मणाप्रमाणे माझा बंधू व्हायचं असेल तर मी आत्ताच तुमची ही अभिलाषा पूर्ण करू शकेन पण तुम्ही सीतेसारखे बनायचा वर मागितल्यामुळे हा महाकठीण आणि दुर्लभ वर बनला आहे. कारण यावेळी मी एकपत्नीव्रती असून मर्यादारक्षणात तत्पर राहून 'मर्यादापुरूषोत्तम' नावानेही ओळखला जातो. तेव्हा तुम्हाला दिलेल्या वराचा आदर राखून द्वापाराच्या अन्ति मी तुमची वरपूर्ती करेन. असं म्हणून श्रीराम पुढे पञ्चवटीला गेले.
पंचवटीमध्ये श्रीरामचंद्रांना तिथल्या भिल्ल स्त्रियांनी पाहिलं आणि त्या त्यांच्या प्रेमात विव्हल बनल्या. श्रीरामांच्या चरणांची धूळ मस्तकी लावून त्यांनी प्राणत्यागाचीही तयारी केली. तेव्हा श्रीराम ब्रह्मचारी वेषात तिथे आले आणि त्यांनी त्या स्त्रियांना प्राणत्याग करण्यापासून थांबवलं. ते त्यांना म्हणाले की तुम्ही व्यर्थ प्राणत्याग करत आहात. तसं करू नका. द्वापाराच्या अन्ति तुमचे मनोरथ पूर्ण होतील.
पंचवटीहून दानवराज रावणाने सीतेचे हरण केले आणि तिच्या शोधार्थ श्रीराम आणि लक्ष्मण दक्षिण दिशेकडे गेले. तिथून त्यांची भेट सुग्रीवादि वानरांशी झाली आणि त्यांच्याकडून सीतेची माहिती मिळाली. वानरांच्या साहाय्याने सीतेची मुक्ति करवून तिच्यासह श्रीरामचंद्र पुन्हा अयोध्येला आले. पुढे लोकापवादामुळे त्यांनी सीतेचा वनामध्ये त्याग केला. या घटनेनंतर श्रीरामचंद्र जेव्हा जेव्हा यज्ञ करत तेव्हा तेव्हा विधिवत् सीतेची सुवर्णमूर्ती बनवायचे आणि त्या मूर्तीला आपल्या शेजारी बसवून यज्ञ करायचे. अशाप्रकारे श्रीरामांच्या निवासस्थानी अशा यज्ञ-सीतांच्या मूर्तींचा समूहच बनला. एके वेळी या सर्व दिव्य चैतन्यशाली मूर्ती श्रीरामांकडे गेल्या तेव्हा श्रीराम त्यांना म्हणाले की मी तुमचा स्विकार करू शकणार नाही. त्या दिव्य स्वर्णिम सीतामूर्तींनी त्याचं कारण विचारलं. त्या श्रीरामांना म्हणाल्या, "आम्ही तुमची सेवा करणार्‍या आहोत, आमचं नावही मिथिलाकुमारी सीता आहे आणि आम्हीही व्रताचरण करतो, यज्ञाच्या वेळेला तुमची अर्धांगिनी बनतो तर मग तुमच्यासारख्या धर्मात्मा आणि वेदमार्गानुसारी व्यक्तिकडून अशी अधर्मयुक्त वाणी कशी निर्माण होते आहे? अशा प्रकारे तुम्ही आमचा त्याग केल्यास तुम्ही पापकर्माचरण केल्यासारखे होईल."
त्यावर श्रीरामचंद्र त्यांना म्हणाले, "देवींनो, तुम्ही आत्ता जे काही म्हणत आहात ते निश्चितच सत्य आणि योग्य आहे. परन्तु मी एकपत्नीव्रती आहे आणि लोकं मला राजर्षि मानतात तेव्हा मी नियम तोडू शकत नाही. एकमात्र सीताच माझी सहधर्मिणी आहे तेव्हा आता तुम्ही द्वापार युगाच्या अन्ति श्रेष्ठ अशा श्री क्षेत्र वृन्दावनात अवतरित व्हा, मी तिथे तुमची मनोकामना पूर्ण करेन."
श्रीहरि पुढे म्हणाले, "ब्रह्मदेव, अशा प्रकारे यज्ञ-सीताही ब्रजामध्ये गोपी बनणार आहेत. आता इतर गोपींची लक्षणंही ऐक."
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अशाप्रकारे श्रीगर्गसंहितेतील गोलोकखंडान्तर्गत भगवद्-ब्रह्म संवादातल्या 'अवतारकार्यविषयक प्रश्नाचे वर्णन' नावाचा चतुर्थ अध्याय पूर्ण झाला.

No comments:

Post a Comment