Thursday, 15 September 2011

श्री गर्ग संहिता - २


नारद मुनी पुढे म्हणाले, "जो मनुष्य जीभ असूनही कीर्तनीय भगवान श्रीकृष्णांचे कीर्तन करत नाही तो बुद्धिहीन मनुष्य मोक्षपदाची शिडी मिळूनही त्यावर चढण्याचा प्रयत्नच करत नाही. हे राजा, या वाराहकल्पात पृथ्वीवर भगवान् श्रीकृष्णांचे जे आगमन झालेले आहे, त्यांनी ज्या ज्या लीला इथे केल्या, त्या सगळ्या मी तुला आता वर्णन करून सांगतो; ऐक. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे -

दानव, दैत्य, असुर - स्वभावाच्या मनुष्य आणि दुष्ट राजांच्या भाराने पृथ्वी अत्यधिक पीडित झाली. एका गायीचे रूप घेऊन अनाथ स्त्रीसारखी रडत रडत आपली आन्तरिक व्यथा सांगण्यासाठी ती ब्रह्मदेवांकडे गेली. त्यावेळी दु:खाने तिची काया थरथरत होती. तिची करुण कहाणी ऐकून ब्रह्मदेवांनी तिला धीर दिला आणि तात्काळ ते, शंकर आणि इतर देवतांना बरोबर घेऊन भगवान् नारायणांच्या वैकुण्ठ-धामी गेले. तिथे गेल्यावर ब्रह्मदेवांनी चतुर्भुज भगवान् विष्णुंना प्रणाम करून यासंबंधी आपलं निवेदन ऐकवलं.

त्यावर लक्ष्मीपति भगवान् विष्णु त्यांना आणि इतर देवतांना म्हणाले, "ब्रह्मन्, साक्षात् भगवान् श्रीकृष्ण हेच अगणित ब्रह्माण्डांचे स्वामी, परमेश्वर, अखण्डस्वरूप आणि देवातीत आहेत. त्यांच्या लीला अनन्त आणि अनिर्वचनीय आहेत. त्यांच्या कृपेशिवाय तुमचं हे अपेक्षित कार्य कधीही सिद्ध होणार नाही. तेव्हा तुम्ही सगळेजण लवकरात लवकर त्यांच्या परमोज्ज्वल आणि अविनाशी धामात जाणं उत्तम राहिल."

तेव्हा ब्रह्मदेव त्यांना म्हणाले, "प्रभो! तुमच्याशिवाय कुणी दुसरंही परिपूर्णतम असं तत्त्व आहे, हेच मला माहित नव्हतं. आता असा कुणी तुमच्याहूनही श्रेष्ठ परमेश्वर असल्यास त्यांच्या धामाचं तुम्हीच दर्शन करून द्या."

हे सांगून नारदमुनि जनकराजाला म्हणाले, "ब्रह्मदेवांनी असं म्हण्टल्याबरोबर भगवान् विष्णुंनी उपस्थित सर्व देवतांसह ब्रह्मदेवांना ब्रह्माण्ड-शिखरावर असलेला गोलोकधामाला जाणारा मार्ग दाखवला. भगवान् वामनदेवांच्या डाव्या पायाच्या अंगठ्याच्या आघातामुळे ब्रह्माण्डाच्या शिरोभागावर जी छिद्ररूपी भेग पडली होती ती ब्रह्मद्रवाने (नित्य अक्षय नीर) परिपूर्ण होती. त्या भेगरूपी मार्गातून जाऊ शकण्यायोग्य अशा जलयानातून सर्व देव ब्रह्माण्डाच्या कक्षेतून बाहेर पडले. ब्रह्माण्डाच्या वर पोहोचल्यावर जेव्हा त्यांनी खाली वाकून, जिथून आले त्या ब्रह्माण्डाला पाहिले तेव्हा त्यांना ते एखाद्या कलिंगफळाप्रमाणे (दुधी) दिसले. त्यांना असंही दिसलं की त्या फळासारखी अनेक इतर फळं त्या पाण्यात इथे-तिथे डुलत होती. हे सगळं पाहून देवतांना आश्चर्याचा धक्काच बसला. ते एकदम चकितच झाले. पुढल्या प्रवासात तिथून करोडों योजन अंतरावर उर्ध्व दिशेला त्यांना आठ नगरं लागली. त्यांच्या चारही दिशेला दिव्य तटबंदी उभारलेली होती. रत्नादिंनी युक्त वृक्षांनी या नगरांची मनोरम शोभा वाढत होती. तिथेच वरच्या अंगाला देवतांनी विरजा नदीच्या लाटा हळूवारपणे आपटणारा घाट बघितला. विरजा नदीचा तटप्रदेश उज्ज्वल रेशमी वस्त्र-प्रावरणांप्रमाणे शुभ्र दिसत होता. घाटावर दिव्य मणिमय पायर्‍या बांधलेल्या असल्याने ते दृश्य अतिशय मनोहर दिसत होतं. तटप्रदेशाची शोभा बघत बघत पुढे जाणार्‍या देवता, अनन्तकोटी सूर्यांइतक्या तेजःपुंज अशा त्यातल्या उत्तम नगरात पोहोचल्या. त्या नगराला बघताच देवतांचे डोळे दिपले नि ते जागच्याजागीच स्तब्ध झाले. तेव्हा भगवान् विष्णुंच्या आज्ञेने ब्रह्मदेवांनी त्या तेजाला प्रणाम केला आणि ते त्याची प्रार्थना करू लागले. त्याच तेजःपुंज ज्योतिच्या ठिकाणी त्यांना परम शांतिमय साकार धाम दिसलं. तिथे अद्भूत, कमलनालवर्णी, हजार फणांच्या शेषनागाचंही त्यांना दर्शन झालं तेव्हा इतर देवतांसह त्यांनी शेषनागांना प्रणाम केला. हे जनक राजा! त्या शेषनागाच्या कुशीमध्ये महातेजस्वी, लोकवन्दित गोलोकधामाचं त्यांना दर्शन झालं. या गोलोकधामामध्ये धामाभिमानी देवतांचा ईश्वर आणि गणनाशीलांमध्ये प्रमुख अशा काळाच्या आधीन काहीही नाही. इथे मायादेवीही आपला प्रभाव पाडू शकत नाही. मन, चित्त, बुद्धि, अहंकार, सोळा विकार त्याचप्रमाणे महत्तत्त्वसुद्धा इथे प्रवेश करू शकत नाही तिथे (सत्त्व-रज-तम या) त्रिगुणांविषयी काय म्हणावं? तिथे अत्यंत लावण्यशालिनी, श्यामसुंदरविग्रहा श्रीकृष्णांच्या पार्षदा (सख्या) द्वारपालनाचं कार्य करत होत्या. देवता दार ओलांडून आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्नात आहेत हे पाहताच त्यांनी सर्वांना दारातच थांबवलं.”

तेव्हा देवता गण म्हणाले, "आम्ही सगळे ब्रह्मा, विष्णु, शंकर नावाचे लोकपाल तथा इन्द्रादि देवता आहोत आणि भगवान् श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी आलेलो आहोत."

श्रीकृष्णांच्या द्वारपालिकांनी देवतांचं म्हणणं अन्तःपुरात जाऊन सांगितलं. तेव्हा पीतवस्त्रांकित आणि हातात वेताची छडी घेतलेली शतचंद्रानना नावाची सखी बाहेर आली आणि तिने देवतांच्या तिथे येण्याचं प्रयोजन विचारलं. ती म्हणाली, "इथे आलेले तुम्ही देवतागण कोणत्या ब्रह्माण्डाचे रहिवासी आहात? ते त्वरेने सांगा म्हणजे मला तसं भगवान् श्रीकृष्णांना सूचित करता येईल." 

त्यावर देवतागणांनी तिला सांगितलं, "अरे, हे तर फारच आश्चर्यजनक आहे, आमच्या ब्रह्माण्डाखेरिजही खरंच दुसरी अनेक ब्रह्माण्डं आहेत? आम्ही तर कधीच त्यांची स्वरूपं पाहू शकलेलो नाही. हे सुंदरी, आम्ही तर असंच समजत होतो की एकच ब्रह्माण्ड आहे."

तेव्हा शतचंद्रानना त्यांना म्हणाली, "ब्रह्मदेव, इथे विरजा नदीमध्ये करोडो ब्रह्माण्डं आहेत. त्या प्रत्येक ब्रह्माण्डामध्ये तुमच्यासारखेच अनेक देवतागण निवास करतात. तुम्ही स्वतःच्या ब्रह्माण्डाचे नावही जाणत नाहीत? असं वाटतंय की तुम्ही पूर्वी कधी इथे येऊच शकलेला नाहीत. आपल्या तुटपुंज्या ज्ञान-आधारावरच हर्षभरीत झाला आहात. असंही वाटतंय की तुम्ही कधी आपल्या घराबाहेरच पडलेला नाहीत. औदुंबराच्या फळांमध्ये असलेले किडे ज्या फळात राहतात त्या फळाशिवाय दुसर्‍या कशालाही जाणत नाहीत तशीच तुमची गत झालेली दिसतेय. तुम्हीही स्वतःच्या ब्रह्माण्डालाच एकमेव उपलब्ध ब्रह्माण्ड समजता."

हे ऐकून सर्व देवता उपहासाचा विषय बनल्यामुळे गप्प उभे राहिले. त्यावेळी भगवान् विष्णु म्हणाले, "ज्या ब्रह्माण्डामध्ये भगवान् पृश्निगर्भांचा सनातन अवतार झाला होता आणि त्रिविक्रमाच्या (विराटदेहधारी वामन) नखामुळे ज्या ब्रह्माण्डामध्ये विवर उत्पन्न झालेले आहे, त्या ब्रह्माण्डामध्ये आम्ही निवास करतो."

भगवान् विष्णुंचं बोलणं ऐकताच शतचंद्राननाच्या सगळ्या संदेहांचं निराकरण झाल्यामुळे तिने त्यांची प्रशंसा केली आणि ती स्वतः देवतागणांच्या आगमनाची वर्दी देण्यासाठी अन्तःपुरात गेली. तिथून ती लगोलग परतली आणि सर्वांना अन्तःपुरात येण्याची सूचना देऊन निघून गेली. 

यानंतर देवतागणांनी दरवाज्यातून आतमध्ये पदार्पण करून प्रथमच त्या परमसुंदर गोलोकधामाचं अवलोकन केलं. तिथे 'गोवर्धन' नामक गिरिराज स्थापित होते. गिरिराज गोवर्धनांचा प्रदेश वसन्तोत्सव साज‍रा करणार्‍या अनेक गोपि आणि गायींनी घेरलेला होता. कल्पवृक्ष आणि कल्पलतांच्या समुदायांनी सुशोभित होता त्याचप्रमाणे त्या प्रदेशाला रासमण्डल अलंकृत करत होतं. तिथे श्यामवर्णी यमुना नदी स्वच्छंद गतिने वाहत होती. तिच्या तटावर अनेक प्रासाद उभे होते आणि ते तिची शोभा वाढवत होते. त्या नदीत उतरण्यासाठी वैदूर्यमण्यांच्या पायर्‍यांनीयुक्त घाट बांधलेले होते. तिच्या किनार्‍या वरच दिव्य वृक्ष-वेलींनीयुक्त 'वृंदावन' अत्यंत शोभायमान दिसत होतं. चित्र-विचित्र पक्षी, भ्रमर आणि वंशीवटांमुळे तिथलं सौदर्य आणखी वाढत होतं. तिथे सहस्र कमलदलांपासून निघालेले सुगंधित परागकण चारही दिशांना पसरवणारा थंड वायु मन्द गतिने वाहत होता. अशा वृंदावनाच्या मध्यभागी बत्तीस वनांनी युक्त एक 'निज-निकुंज' होतं. हे निकुंज चारही दिशांनी तट-खंदकांनी सुशोभित होतं. त्याचं अंगण रक्तवर्णी अक्षयवटांनी सुशोभित होतं. पद्मरागादि सात प्रकारच्या मण्यांनी बनलेल्या त्याच्या भिंती आणि फरसबंद खूपच सुंदर दिसत होत्या. कोटीचंद्रबिंबांची छबीच जणू असे चांदवे त्या निकुंजाला सुशोभित करत होते आणि त्याच्या अन्तर्भागात चमचमते गोळे लटकत होते. फडफडत्या पताका आणि जागोजागी फुललेली फुले मंदिरांची आणि मार्गांची शोभा वाढवत होते. तिथल्या भ्रमरांचा गुंजारव जणू संगीताची वृष्टीच करत होता. त्याचप्रमाणे मत्त मयुर आणि कोकिळ यांचा कलरव सतत कानावर पडत होता. तिथल्या, बाल-सूर्याच्या पीत-रक्तवर्णाची कुण्डलं धारण करणार्‍या ललना शंभर-शंभर चंद्रांइतक्या गौरवर्णी सुंदरी होत्या. स्वच्छंद गतिने चालणार्‍या आणि मणिमय भिंतींमध्ये आपले मुखावलोकन करणार्‍या अशा सुंदर स्त्रिया तिथल्या रत्नजडित अंगणात फिरत होत्या. त्यांच्या गळ्यातील हार आणि बाहुंतील केयूर त्यांच्या सौन्दर्यात भर टाकत होते. पैजण आणि करधनींचे मधुर झंकार तिथे सतत गुंजत होते. गोपांगनांनी मस्तकावर चूडामणि धारण केले होते. तिथे प्रासादांच्या दारांमध्ये आभूषणांनी विभूषित आणि श्वेत पर्वतासमान अनेक गायींचे दर्शन होत होते. सर्व गायी तरुण, दूध देणार्‍या, सुशीला, सुरुचा, सवत्सा, पीतपुच्छा आणि सद्गुणवती होत्या. त्यांच्या गळ्यांतील घण्टांचा आणि मंजिरांचा मधुर ध्वनि उत्पन्न होत होता. त्या विविध रंगी होत्या. काही उजळ, काही काळ्या, काही पांढर्‍या, काही लाल, काही पिवळ्या, काही तपकिरी आणि काही चित्रविचित्रवर्णी होत्या. काहींचा धूम्रवर्ण, काहींचा कोळश्यासारखा काळा रंग होता. दूध देण्यामध्ये समुद्राशीच तुलना होऊ शकणार्‍या या गायींच्या शरीरावर तरुणींची करचिह्ने उमटवलेली होती. हरणांप्रमाणे उड्या मारणारी वासरं त्या दृश्याची शोभा अधिकच वाढवत होती. गायींबरोबरच मध्ये मध्ये लांब मानांचे आणि मोठ्या शिंगांचे धष्टपुष्ट, ज्यांना साक्षात् धर्मधुरंधर संबोधले जाते असे बैलही दिसत होते. या गायी-बैलांच्या सुरक्षेसाठी तिथे अनेक गोपाळही दिसत होते. त्यांच्यातल्या काहींच्या हातात वेताच्या छड्या दिसत होत्या तर काहींच्या हातात पावा होता. सर्व गोपाळ रंगाने सावळे होते. ते भगवान् श्रीकृष्णांच्या लीला इतक्या मधुर स्वरात गात होते की त्या ऐकून कामदेवही मोहित होऊन जाईल.

अशा दिव्य निज-निकुंजाला सर्व देवतांनी प्रणाम केला आणि त्यांनी त्यात प्रवेश केला. तिथे त्यांना सहस्रदलाच्या कमळाचं दर्शन झालं. ते कमळ इतकं सुशोभित होतं की जणु एखादा प्रकाशपुंजच असावा. त्या कमळावर आणखी एक सोळा पाकळ्यांचं कमळ होतं आणि त्याच्यावर आणखी एक अष्टदलयुक्त कमळ होतं. या अष्टदलयुक्त कमळावर उंच आणि तेजस्वी सिंहासन होतं. कौस्तुभ मणि जडवलेलं हे सिंहासन तीन पायर्‍यांनी सुशोभित होतं आणि त्यावरच भगवान् श्रीकृष्णचंद्र, श्रीराधिकाजींसह विराजमान झाले होते, असं दृश्य देवांनी पाहिलं. ते युगलरूप भगवान् आठ दिव्य सखींबरोबर होते तथा श्रीदामा प्रभृति आठ गोपालांद्वारे सेवित होते. त्यांच्या डोक्यावर हंसासारख्या शुभ्रवर्णाचे पंखे झुलत होते आणि त्यांच्यामागे हिर्‍यांच्या मुठी असलेल्या चवरी डुलत होत्या. भगवन्तांच्या सेवेमध्ये असे करोडो छत्र होते ज्यांची तुलना केवळ कोटीचंद्रांच्या कौमुदीशीच होऊ शकेल. भगवान् श्री़कृष्णांची डावी भुजा त्यांच्या डाव्या अंगाला असलेल्या श्रीराधिकाजींमुळे सुशोभित होत होती. भगवंतांनी स्वेच्छेने आपला उजवा पाय दुमडला होता. त्यांनी हातात मुरली धारण केली होती. त्यांच्या हास्ययुक्त मुखकमलाने आणि भ्रुकुटी-विलासाने जणु अनेक कामदेवांनाच मोहित करून ठेवलं होतं. त्या श्रीहरिंची कान्ति मेघाप्रमाणे श्यामल होती आणि त्यांचे डोळे कमलदलांप्रमाणे मोठे होते. आजानुबाहु भगवंतांनी पीतवस्त्रं धारण केली होती आणि वृंदावनात विचरण करणार्‍या मत्त भुंग्यांना आकर्षित करणारी सुंदर वनमाला गळ्यामध्ये घातली होती. पायामध्ये घुंगरु आणि हातांमध्ये कंकणांच्या छटा विलसत होत्या. त्यांचं अतिसुंदर हास्य फारच मनमोहक होतं. त्यांचं श्रीवत्साचं चिह्न, बहुमोल रत्नांनी बनलेले किरीट, कुण्डल, बाजूबंद आणि हार यथास्थान भगवंतांची शोभा वाढवत होते.

भगवान् श्रीकृष्णांचे असे दिव्य दर्शन प्राप्त झाल्यावर सर्व देवता जणु आनंदसागरातच गटांगळ्या खाऊ लागले. हर्षातिरेकाने त्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. तेव्हा सर्व देवतांनी हात जोडून विनीत भावाने त्या परमपुरुष भगवान् श्रीकृष्णचंद्रांना प्रणाम केला.


No comments:

Post a Comment