हे ऐकून बहुलाश्व राजाने नारद मुनिंना विचारलं, "हे मुने! परात्पर
महात्मा भगवान् श्रीकृष्णचंद्रांचं दर्शन घेतल्यानंतर सर्व देवतांनी पुढे काय
केलं, हे मला सांगण्याची कृपा कराल का?"
त्यावर नारद मुनि त्यांना म्हणाले, "राजन्, त्यावेळी अष्टभुजाधारी
वैकुण्ठाधिपति भगवान् श्रीहरि उठले आणि बघता बघता साक्षात् भगवान् श्रीकृष्णांच्या
शरीरामध्ये विलीन झाले. त्याचवेळी कोटीसूर्यांप्रमाणे तेजस्वी, प्रचंड पराक्रमी,
पूर्णस्वरूप भगवान् नरसिंह उपस्थित झाले आणि भगवान् श्रीकृष्णाच्या तेजामध्ये
लीन झाले. त्यानंतर तिथे लाख घोडे जोडलेल्या शुभ्रवर्णी रथावर आरूढ होऊन,
श्वेतद्विपाचे स्वामी, सहस्रबाहु विराट् पुरूष, श्रीलक्ष्मींसह आले. ते स्वतः
आपल्या सर्व आयुधांना धारण केलेल्या अवस्थेत होते आणि त्यांचे पार्षदगणही
चहुबाजूंनी त्यांच्या सेवेसाठी उपस्थित होते. ते सर्वही त्याचवेळी श्रीकृष्णांच्या
श्रीविग्रहात सहजतेने प्रविष्ट झाले. त्यानंतर धनुष्य-बाणधारी कमलनयन भगवान्
श्रीरामांचे सीता आणि आपल्या इतर तिन्ही भावंडांसह तिथे आगमन झाले. त्यांचा दिव्य
रथ दहा कोटी सूर्यांच्या तेजासमान प्रकाशमान होता. त्यांच्यावर सतत चवर्या
ढाळल्या जात होत्या. असंख्य वानरयूथपति त्यांचे संरक्षणासाठी नियुक्त होते.
त्यांच्या रथाच्या लक्ष चाकांमधून मेघगर्जनेसमान ध्वनि उत्पन्न होत होता. त्यावर लक्ष ध्वजा
फडफडत होत्या. लक्ष घोडे जुंपलेल्या सुवर्णमय रथावर बसलेले भगवान् श्रीरामही
श्रीकृष्णचंद्रांच्या दिव्य विग्रहात लीन झाले. तेव्हाच प्रलयकाळच्या जाज्वल्यमान
अग्निज्वालेसमान तेजस्वी साक्षात् यज्ञनारायण श्रीहरि तिथे आले. ज्योतिर्मय रथावर,
आपली धर्मपत्नी दक्षिणा हिच्यासह असलेले तेही श्यामविग्रह भगवान्
श्रीकृष्णचंद्रांमध्ये विलीन झाले. त्यानंतर मेघश्यामवर्णी, चतुर्भुज, विशाल
नेत्रधारी, मुनिवेशधारी भगवान् नर-नारायण साक्षात् तिथे उपस्थित झाले. त्यांनी
कोटी विद्युल्लतेसमान तेजस्वी जटा धारण केल्या होत्या. आपल्या अखण्ड ब्रह्मचर्याने
युक्त भगवान् नारायणांकडे सगळे देव बघतच होते की त्यांनीही स्वतःला श्रीकृष्णामध्ये
विलीन करून घेतलं. अशा प्रकारच्या दिव्य दर्शनांनी देवता अत्यंत आश्चर्य चकित
झाल्या. त्यांना व्यवस्थित समजून चुकलं की परमात्मा श्रीकृष्णचंद्रच स्वयं
परिपूर्णतम भगवान् आहेत, तेव्हा ते त्या परमप्रभुची स्तुति करू लागले.
देव म्हणाले, "भगवान् श्रीकृष्णचंद्र, जे पूर्णपुरूष, परात्पर,
यज्ञांचे अधिपति, कारणांचेही परम कारण, परिपूर्णतम परमात्मा आणि साक्षात्
गोलोकधामाचे निवासी आहेत, त्या परम पुरूष श्रीराधावराला आमचा सादर प्रणाम असो.
योगेश्वर लोकं म्हणतात की तुम्ही परम तेजस्वी आहात; शुद्ध अंतःकरणाच्या व्यक्ती
असं मानतात की तुम्ही लीलाविग्रह धारण करणारे अवतारी पुरूष आहात; परंतु आम्ही आज
आपल्या ज्या स्वरूपाला जाणलं आहे, ते या सगळ्यांहून भिन्न आणि अद्वितीय आहे;
तेव्हा तुम्ही महत्तम तत्त्वांचे आणि महात्मांचे अधिपति आहात. परब्रह्मस्वरूप
परमेश्वर अशा तुम्हाला आमचा नमस्कार असो. कित्येक विद्वानांनी व्यंजना, लक्षणा आणि
स्फोटद्वारा तुम्हाला जाणण्याचा प्रयत्न केला; परंतु तरी ते तुम्हाला जाणू शकले
नाहीत; कारण तुम्ही निर्दिष्ट भावरहित आहात. म्हणून तुम्ही मायेच्या पलिकडचे आहात
आणि तुम्हाला निर्गुण ब्रह्म मानून आम्ही तुम्हाला शरण येतो. काही लोक तुम्हाला
'ब्रह्म' मानतात तर काही तुमच्यासाठी 'काल' या शब्दाचा प्रयोग करतात. कित्येकांची
अशी धारणा आहे की तुम्ही शुद्ध 'प्रशान्त' स्वरूप आहात तर काही मीमांसकांनी असं
मानलेलं आहे की पृथ्वीवर तुम्ही 'कर्म' स्वरूपात विराजमान आहात. काही प्राचीनांनी
'योग' या नावाने तर काहींनी 'कर्ता'च्या रूपात तुमचा स्वीकार केलेला आहे.
अशाप्रकारे सगळ्यांची वेगवेगळी नावं आहेत. पण त्यांच्यापैकी कुणीही तुम्हाला
परिपूर्णरीत्या जाणू शकलेला नाही. म्हणून अनिर्देश्य, अचिन्त्य आणि अनिर्वचनीय अशा
तुम्हाला आम्ही शरण आलेलो आहोत. भगवन्! तुमच्या चरणांची सेवा कल्याणकारक आहे. तिला
सोडून जो तीर्थ, यज्ञ आणि तपाचरण करेल किंवा ज्ञानाद्वारे सिद्ध होण्याचा प्रयत्न
करेल, त्याला अनेक विघ्नांचा सामना करावा लागेल आणि तो त्याच्या
साध्यप्राप्तीमध्ये यशस्वी होऊ शकणार नाही. भगवन्! आता आणखी काय बोलू, तुम्ही तर
सगळंच जाणता, कारण तुम्हीच सर्व चराचर व्यापून आहात. ज्यांचे अन्तःकरण शुद्ध आहे
आणि जे देहबन्धनापासून मुक्त आहेत त्या आमच्यासारख्या देवताही तुम्हालाच वंदन
करतात. अशा पुरूषोत्तम भगवान् तुम्हाला आम्ही प्रणाम करतो. श्रीराधिकेच्या हृदयाला
सुशोभित करणार्या चंद्रहार स्वरूप असलेल्या, गोपींच्या नेत्रांचा आणि जीवनाचा
आधार असलेल्या आणि ध्वजाप्रमाणे गोलोकधामास अलंकृत करणार्या आदिदेव भगवान् (अशा)
तुम्ही, संकटात सापडलेल्या आम्हा देवतांची रक्षा करावी, रक्षा करावी. भगवन्!
तुम्ही वृन्दावनाचे स्वामी आहात, गिरिराजपति असेही संबोधले जाता. तुम्ही ब्रजाचे
अधिनायक आहात, गोपालरूप अवतार धारण करून अनेक प्रकारच्या नित्य विहार-लीला करता.
श्रीराधिकेचे प्राणवल्लभ आणि श्रुतिधरांचेही तुम्ही स्वामी आहात. तुम्हीच
गोवर्धनधारी आहात, तेव्हा आता धर्माचा भार सहन करणार्या या पृथ्वीचाही उद्धार
करण्याची कृपा करा."
"देवतांनी अशाप्रकारे केलेली स्तुति ऐकून," नारदमुनि पुढे सागू
लागले, "गोकुलेश्वर भगवान् श्रीकृष्णचंद्रांनी त्या देवतांना आपल्या मेघासमान गंभीर आवाजात आपला निर्णय
सांगितला."
भगवान् श्रीकृष्ण देवतांना म्हणाले, "ब्रह्मा, शंकर आणि अन्य
देवतांनो, तुम्ही सगळे मी जे सांगतोय ते ऐका. माझ्या आदेशानुसार तुम्ही आपापल्या
पत्नींसह आणि अंशांसह यदुकुलात जन्म घ्या. मी सुद्धा अवतार घेईन आणि पृथ्वीचा ब
हार हलका करेन. माझा हा अवतार यदुकुलात होईल आणि मी या कार्याची पूर्ण सिद्धी
करेन. वेद माझी वाणी, ब्राह्मण माझे मुख आणि गाय माझं शरीर आहे. सर्व देवता माझे
अंग आहेत, साधुपुरूष तर हृदयी निवास करणारे माझे प्राणच आहेत. म्हणून प्रत्येक
युगात दंभपूर्ण दुष्टांद्वारे जेव्हा यांना पीडा दिली जाते आणि धर्म, यज्ञ आणि
दयेवरही आघात होतात तेव्हा मी स्वतःला भूतलावर प्रकट करतो."
भगवान् श्रीकृष्णांचे हे शब्द सांगून नारदमुनि बहुलाश्व जनक राजाला पुढे
म्हणाले, "ज्यावेळी जगताधिपति भगवान् श्रीकृष्णचंद्र अशाप्रकारे देवतांशी
वार्तालाप करत होते त्याच वेळी 'आता माझ्या प्राणनाथांशी माझा वियोग होणार' असं
वाटून श्रीराधिका व्याकूळ झाली आणि वणव्यात जळून दग्ध झालेल्या वेलीप्रमाणे
मूर्च्छित होऊन पडली. तिच्या शरीरात अश्रु, कंप, रोमांच इ. सात्त्विक भावांचा उदय
झाला. तशा अवस्थेत ती श्रीकृष्णांशी बोलू लागली."
श्रीराधा म्हणाली, "प्राणनाथ, तुम्ही पृथ्वीदेवींचा भार कमी करण्यासाठी
जरूर भूमण्डलावर पदार्पण करा पण जाण्यापूर्वी माझी एक प्रतिज्ञाही ऐका. तुम्ही
इथून गेल्यावर तुमच्या अपरोक्ष मी एक क्षणही इथे जिवंत राहू शकणार नाही. तुमचा
माझ्या या प्रतिज्ञेवर विश्वास नसेल तर मी हेच पुन्हा सांगते. आत्ताच माझे प्राण
कंठाशी आलेले आहेत. कापूर अग्नीच्या संपर्कात जसा भुर्कन् उडून जातो तसंच माझं
शरीर अशाने उडून जाईल."
त्यावर श्रीकृष्णचंद्र भगवान् म्हणाले, "राधिके, तू अशी दु:खी होऊ नकोस.
मी तुझ्याबरोबरच जाऊन पृथ्वीवरचा भार कमी करणार आहे. मी या देवतांना जे काही
सांगितलं आहे ते तसंच अवश्य होणार आहे."
"पण हे प्रभो", श्रीराधिकेने विचारलं, "जिथे वृन्दावन नाही,
यमुना नदी नाही आणि गोवर्धन पर्वतही नाही तिथे माझं मन कसं काय रमेल?"
नारदमुनि पुढे सांगू लागले, "राधाराणीने अशा प्रकारची शंका व्यक्त
केल्यावर भगवान् श्रीकृष्णचंद्रांनी आपल्या धामातून चौर्याऐंशी कोस भूमी, गोवर्धन
पर्वत आणि यमुना नदी भूतलावर पाठवली. त्यावेळी सगळ्या देवतांच्या वतीने
ब्रह्मदेवांनी भगवान् श्रीकृष्णांना नमस्कार करून त्यांना काही शंका
विचारल्या."
ब्रह्मदेवांनी भगवान् श्रीकृष्णांना विचारलं, "भगवन्, माझ्यासाठी कोणते
स्थान असेल? तुम्ही कुठे जन्म घेणार आहात? आणि हे सगळे देव कोणकोणत्या घरात जन्म
घेतील आणि त्यांची नावं काय काय असतील?"
तेव्हा
भगवान् श्री़कृष्णचंद्रांनी त्याला उत्तर दिलं, "मी स्वतः वसुदेव आणि देवकी
यांच्याकडे प्रकट होणार आहे. माझाच अंश असणारा 'शेष' नि:संशय रोहिणीच्या गर्भातून
जन्म घेईल. साक्षात् 'लक्ष्मी' राजा भीष्मक यांच्या घरी पुत्रीरूपाने उत्पन्न होईल
आणि तिचं नाव 'रुक्मिणी'असेल आणि 'पार्वती' ही 'जांबवती' या नावाने प्रकट
होईल. यज्ञपुरुषाची 'दक्षिणा देवी' तिथे 'लक्ष्मणा' नाव धारण करेल. इथे जी विरजा
नदी आहे, तीच 'कालिंदी' नावाने प्रसिद्ध होईल. भगवती 'लज्जा'चं नाव 'भद्रा' असेल.
समस्त पापांच निराकरण करणारी 'गंगा', 'मित्रविंदा' नाव धारण करेल. जो या वेळी
'कामदेव' आहे तोच रुक्मिणीच्या पोटी 'प्रद्युम्न' रुपात उत्पन्न होईल. या
प्रद्युम्नाच्या घरात तुझा अवतार होईल आणि त्यावेळी तुला 'अनिरुद्ध' नाव मिळेल, यामध्ये
कसलाही संशय नाही. हे 'वसु' जे 'द्रोण' नावांनी प्रसिद्ध आहेत, ते व्रजात 'नंद'
होतील आणि त्यांची प्राणप्रिया 'धरा देवी' ही 'यशोदा' नाव धारण करेल. 'सुचंद्र' हा
'वृषभानु' होईल आणि त्याची सहधर्मिणी 'कलावती' पृथ्वीवर 'कीर्ति' या नावाने
प्रसिद्ध होईल. नंतर यांच्याच घरी श्रीराधिकेचा जन्म होईल. मी या व्रजमंडलात
गोपींबरोबर नेहमीच रासविहार करेन."
अशाप्रकारे श्री गर्ग संहितेच्या गोलोक खंडान्तर्गत श्री नारद-बहुलाश्व संवादातील
'भूतलावर अवतीर्ण होण्याचे उद्योग वर्णन' नामक तिसरा अध्याय पूर्ण झाला.