Friday, 3 June 2011

श्रीगर्ग-संहिता - १


नैमिषारण्यातला तो दिवस नेहमीसारखाच उगवला. दिवस नेहमीसारखाच उगवला म्हणजे योग्य वेळेला सूर्योदय झाला इतकंच! तिथला दिवस खरं तर चार घटका त्यापूर्वीच सुरू झालेला. ब्राह्म मुहुर्तावर भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न करणारे मुनिगण आपापली नित्यकर्मे आटोपून स्वाध्यायाला बसलेली. कुणी नामस्मरण करत होतं तर कुणी विग्रहसेवा, कुणी योगाभ्यासामध्ये समरस झालेलं तर कुणी ग्रंथाभ्यासामध्ये. मुनिगण स्वतःचं अध्ययन स्वतःच करत असत पण त्यातही भगवंतांच्या संदर्भाने शास्त्रात काही शंका अथवा समस्या उत्पन्न झाल्या तर त्यांच्या उकलांसाठी हक्काचं आणि निश्चित समाधानाचं एकच ठिकाण त्यांच्यासाठी सर्वमान्य होतं आणि ते म्हणजे शौनक मुनींची कुटी! त्या दिवशीही अशाच काही समस्या घेऊन मुनिगण तिथे जमा झाले. शौनक मुनीही मोठ्या कौशल्याने त्यांच्या समस्यांचे समाधान करत होते. बहुतेक त्यावेळी उपस्थित असलेल्या सर्वांच्या शंकांचे समाधान झालेच होते की शौनक मुनींनी काही अंतरावरून कुणा व्यक्तीला त्यांच्याच कुटीकडे येताना पाहिले. थोड्या वेळातच योगशास्त्राचे सूर्यच जणु अशा गर्ग मुनींना त्यांनी येणारी व्यक्ती म्हणून ओळखलं आणि आपल्या बैठकीवरून उठून त्यांच्या स्वागतासाठी ते पुढे झाले. शौनक मुनींच्या जाण्यापाठोपाठ त्यांच्याकडे आलेले इतर मुनिगणही गर्ग मुनींबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी उभे राहिले.
आपल्या कुटीपासून काही अंतरावर शौनक मुनींनी गर्ग मुनींना दण्डवत् प्रणाम केला आणि मोठ्या आदराने ते त्यांना घेऊन आपल्या कुटीमध्ये परतले. एक दर्भासन अंथरून शौनक मुनींनी गर्ग मुनींना त्यावर बसवून त्यांची विधिवत् पाद्यपूजा केली आणि त्यांच्यासमोर भगवंतांच्या सकाळच्या न्याहरीचा नैवेद्य ठेऊन त्यांना म्हणाले, "गृहस्थांचे इष्ट साधण्यार्‍या आणि त्यांच्या सांसारिक अडचणींना तोंड देता देता क्षुब्ध होणार्‍या मनाला शांतीचा लाभ करवण्यार्‍या तुमच्यासारख्या माहात्मा साधु पुरुषाचे यायावरत्व अभिनंदनीय आहे. जनमानसांच्या अज्ञानरुपी अन्धःकाराचा विनाश तुमच्यासारखे माहात्माच करू शकतात अन्यथा ते कार्य तर प्रत्यक्ष सूर्यालाही अशक्य आहे. बर्‍याच प्रवासानंतर तुम्ही माझ्या कुटीत दाखल झाला आहात तर न्याहरी करून इथे थोडी विश्रांती घ्या. थोड्या वेळात मी तुमची पुन्हा भेट घेतो."
घटकाभरानंतर शौनक मुनींनी गर्ग मुनींची पुन्हा भेट घेतली. त्यांच्याबरोबर क्षेम-कुशलाची देवाणघेवाण केल्यावर शौनक मुनींनी त्यांना विचारलं, "भगवन्! व्यासदेवांनी पुराणांची परिष्कृती करून जनसामान्यांवर अनंत उपकार केलेले आहेत. त्यांच्या या कृतीमुळेच माझ्यासारख्यांना भगवंतांच्या लीलांचं आस्वादन करणं शक्य झालेलं आहे. पुराणांच्या काही काळ केलेल्या अभ्यासामुळेच काही प्रमाणात आजुबाजुच्या जिज्ञासूंच्या शंकांचं समाधान मी करू शकतो आहे. तरी सध्या माझ्याच मनात भगवंतांच्या अवतारासंदर्भात एक जिज्ञासा उत्पन्न झालेली आहे, ती अशी की भगवंतांचे अवतार किती प्रकारचे असतात? आता तुम्ही इथे आला आहातच तर माझ्या या जिज्ञासेचं समाधान करून मला आणि इथे उपस्थित या नैमिषारण्यातील मुनिगणांना उपकृत कराल अशी आशा आहे."
त्यावर गर्ग मुनी त्यांना म्हणाले, "ब्रह्मन्! भगवंतांच्या गुणानुवादाशी संबंधीत असा हा तुमचा अगदी उत्तम प्रश्न आहे. या एका प्रश्नानेच विचारणारे तुम्ही, ऐकणारे हे नैमिषारण्यवासी आणि सांगणारा मी या तिघांचंही कल्याण होण्यासारखं आहे. या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी प्राचीन इतिहासाचा काही कथाभाग आधी सांगितला जाणं आवश्यक आहे. याच्या केवळ श्रवणातूनच मोठमोठ्या पापांचं क्षालन होतं. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, मिथिलापुरीमध्ये महाप्रतापी बहुलाश्व नावाचा राजा राज्य करित होता. मिथिलापुरीमध्ये राज्य करणार्‍या राजांद्वारे प्रजेचं पितृवत् पालन होत असल्यामुळे तिथल्या राजाला 'जनक' नावाने संबोधण्याची परंपरा होती. बहुलाश्व 'जनक', भगवान् श्रीकृष्णाचा परमभक्त, शान्तचित्त आणि मनात नावालाही अहंकार नसलेला राजा होता. एके दिवशी त्याच्याकडे नारद मुनी आकाशमार्गाने पोहोचले. त्यांना आलेलं बघताच बहुलाश्व राजाने त्यांना योग्य आसनावर बसवून त्यांची पाद्यपूजा केली आणि त्यांना आदरपूर्वक विचारलं, "महामते! जे भगवंत अनादि, प्रकृतीच्या पलिकडचे आणि सर्व प्राणीमात्रांच्या अन्तर्यामी उपस्थित असा आत्मा आहेत, ते शरीर कसं धारण करतात? अर्थात जे सर्वव्यापक आहेत, ते शरीराने कसे काय आवृत्त होऊ शकतील म्हणजे त्यांनाच शरीराचं आवरण कसं बनू शकेल? हे मला सांगण्याची कृपा करावी."
त्यावर नारद मुनी उत्तरले, " गायी, साधु, देवता, ब्राह्मण आणि वेदांच्या संरक्षणासाठी साक्षात् भगवान् श्रीहरि आपल्या लीलेने शरीर धारण करतात. आपल्या अचिन्त्य लीलाशक्तीने देहधारी असूनही ते व्यापकच राहतात. इथे लक्षात घ्यायला हवं की भगवंतांचा हा देह प्राकृत नसून चिन्मय असतो. जसं नाटकातला नट आपल्या अभिनयरूपी मायेने स्वतः मोहित होत नाही पण बघणारे मात्र त्यामुळे मोहित होतात त्याचप्रमाणे परमात्मा भगवंतही अशा मोहाच्या पलिकडचे असतात यात लेशमात्रही संशय नाही."
यावर 'जनक' राजाने प्रतिप्रश्न केला, "संतांच्या रक्षणासाठी भगवान् विष्णुंचे किती प्रकारचे अवतार होतात? हे मला सांगण्याची कृपा करावी."
या प्रश्नावर नारद मुनी उत्तरले, "राजन्! व्यासादि मुनिश्रेष्ठांनी भगवंतांचे अशांश, अंश, आवेश, कला, पूर्ण आणि परिपूर्णतम असे सहा प्रकारचे अवतार सांगितले आहेत. मरीचि आदि 'अंशांशावतार', ब्रह्मा आदि 'अंशावतार', कपिल आणि कूर्म प्रभृति 'कलावतार' आणि परशुराम आदि 'आवेशावतार' सांगितले जातात. नृसिंह, राम, श्वेतद्विपाधिपति हरि, वैकुण्ठ, यज्ञ आणि नर-नारायण हे 'पूर्णावतार' आहेत आणि साक्षात् भगवान् श्रीकृष्ण हे 'परिपूर्णतम' अवतार आहेत. असंख्य ब्रह्माण्डांचे अधिपति असे ते गोलोकधामात राहतात. जे भगवंतांच्या सृष्टीच्या नियमांचे पालन करतात ते ब्रह्मा आदि 'सत्' अर्थात सत्स्वरूप भगवानांचे अंश असतात. या अंशावतारांना साहाय्य करणार्‍यांना 'अंशांशावतार' असं म्हणतात. हे परम बुद्धिमान् राजा, भगवान् विष्णु स्वतः ज्यांच्या अन्तःकरणात समाविष्ट असतात आणि इच्छित कार्य करून झाल्यावर ते त्यातून वेगळे होतात अशा विविध अवतारांना 'आवेशवतार' असं समजावं. जो प्रत्येक युगामध्ये प्रकट होतो आणि त्या त्या युगातला युगधर्म जाणून त्याची पुनर्स्थापना करून पुन्हा अंतर्धान पावतो त्या भगवंतांच्या अवताराला 'कलावतार' असं म्हण्टलं जातं. जिथे चार जणांच्या समुदायात उत्पत्ती दिसते, म्हणजे राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न किंवा वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध त्याबरोबरच जिथे नऊ रसांची अभिव्यक्ती दिसून येते, बल-पराक्रमाची पराकाष्ठा दिसते त्या अवतारांना 'पूर्णावतार' म्हण्टलं जातं. ज्याच्या स्वतःच्या तेजात इतर संपूर्ण तेजांचं विलिनीकरण होतं, त्या भगवंतांच्या अवताराला श्रेष्ठ विद्वान पुरुष 'परिपूर्णतम' असं संबोधतात. ज्या अवतारात पूर्णाच्या संपूर्ण लक्षणांचं दर्शन होतं आणि लोकं आपल्या वेगवेगळ्या भाव-भावनांच्या अनुषंगाने आपल्या परमप्रिय रूपात त्याला बघतात, तोच साक्षात् परिपूर्णावतार आहे. या सर्व लक्षणांनी युक्त स्वयं परिपूर्णतम भगवान् श्रीकृष्णच आहेत, दुसरं कुणी नाही, कारण श्रीकृष्णांनी एका विशिष्ठ कार्याच्या पूर्ततेसाठी अवतार घेऊन त्याचवेळी इतर अनेक कामं केली. जो पूर्ण, पुराण पुरुषोत्तम आणि परात्पर पुरुष परमेश्वर आहे, त्या साक्षात् सदानन्दमय, कृपानिधि, गुणांचे सागर भगवान् श्रीकृष्णचन्द्रांना मी शरण जातो."
मुनिश्रेष्ठ नारदांचे हे उत्तर ऐकताच 'जनक' राजा खूप आनंदित झाला. त्यांच्या शरीरावर रोमांच उभे राहिले आणि भगवान् श्रीकृष्णांप्रतिच्या प्रेमभावनेने विव्हल होऊन अश्रुपूर्ण नेत्रांनी तो नारद मुनींना म्हणाला, "महर्षी! साक्षात् परिपूर्णतम भगवान् श्रीकृष्णचन्द्र जे सर्वव्यापी चिन्मय अशा गोलोकधामातून उतरून भारतवर्षांतर्गत द्वारकापुरीमध्ये विराजमान झाले आहेत, त्याचं कारण काय? हे ब्रह्मन्! भगवान् श्रीकृष्णांच्या सुंदर, विशाल अशा गोलोकधामाचं वर्णन करून सांगा ना! त्याबरोबरच हे महामुनी, त्यांच्याद्वारे झालेल्या अपरिमित कार्यांचीही माहिती सांगण्याची कृपा करावी."
असं सांगता सांगता राजा बहुलाश्व जनक पुढे म्हणाला, "मनुष्य जेव्हा शंभर जन्मांपर्यंत तीर्थयात्रा आणि तपस्या करतो तेव्हा त्याच्या फलस्वरुपात सत्संगाची संधी मिळून त्याला भगवान् श्रीकृष्णचन्द्रांची प्राप्ती होते. पण मी कधी भक्तीरसामध्ये चिंब होऊन भगवान् श्रीकृष्णांच्या दासांचा दास होईन? जे सर्व देवतांसाठीही दुर्लभ आहेत, असे परब्रह्म, परमात्मा, आदिदेव भगवान् श्रीकृष्ण माझ्या नेत्रांसमक्ष कधी येतील?"
त्यावर नारद मुनी म्हणाले, "हे नृपश्रेष्ठा! तू धन्य आहेस, भगवान् श्रीकृष्णचन्द्रांच्या अभीष्ट जनांपैकी आहेस आणि त्या श्रीहरिचा परम प्रिय भक्त आहेस. तुला दर्शन देण्यासाठीच भक्तवत्सल भगवान् इथे नक्कीच येतील. ब्रह्मण्यदेव भगवान् जनार्दन द्वारकेत राहूनही तुझी आणि ब्राह्मण श्रुतदेवाची आठवण काढतात. खरंच, या जगातील संत किती सौभाग्यशाली आहेत!"

Wednesday, 1 June 2011

दर्शनेच्छा बलियसि!


वृन्दावनातल्या राधा-मदनमोहन मंदिराजवळच एक आंधळे बाबाजी राहायचे. त्यांचं नाव, गाव कुणालाच माहिती नव्हतं. बहुतांशी दिवसभर त्यांचं वास्तव्य वृन्दावनाजवळच्या 'मदनटेर' या जागी असायचं म्हणून लोकं त्यांना 'मदनटेरवाले बाबा' अशीच हाक मारायचे.


हे बाबा काही जन्मान्ध नव्हते. पण त्यांच्या डोळ्यांतून सतत अश्रुपात होत असायचा. दिवसभर ते मदनटेरच्या घनदाट झाडीमध्ये बसून राधा-कृष्णांच्या लीलांचे स्मरण करत रडायचे. राधा-कृष्णाच्या विरहात त्यांचं अविरत अश्रुविसर्जन सुरू असायचं. संध्याकाळचे ते वृन्दावनातल्या राधा-गोविन्दजींच्या मंदिरात जावून रडत रडत त्यांना निवेदन करायचे आणि तिथून येता येता गावात केवळ चार घरची माधुकरी मागून जे मिळेल त्यात समाधान मानायचे. येता-जाता, खाता-पिता कुठल्याही वेळी त्यांचं अश्रुविसर्जन काही थांबायचं नाही.


मदनटेरवाल्या बाबाजींनी अशाप्रकारे चाळीस वर्ष राधा-कृष्णांच्या विरहात रडत रडत, अश्रुपात करत काढली. सततच्या अश्रुपाताने त्यांची दृष्टी क्षीण होत गेली आणि पुढे ते पूर्णपणे आंधळे झाले. तरीही दृष्टीहीनतेबद्दल कुणी त्यांना कधीच चिडलेलं, क्षुब्ध झालेलं पाहिलं नाही. बाबाजींच्या मते, डोळ्यांची सार्थकता राधा-कृष्णांच्या दर्शनामध्ये होती आणि ते दर्शन जर त्यांचे चर्मचक्षु करून देऊ शकत नसतील तर त्यांना अशा डोळ्यांच्या असण्या नसण्याने काहीच फरक पडणार नव्हता किंबहुना असे डोळे नसलेलेच बरे, असा त्यांचा विचार होता.


आता मात्र इतक्या वर्षांनी बाबाजींना आयुष्याच्या संध्याछायांची जाणीव होऊ लागली होती आणि त्यांच्या युगल दर्शन मिळवण्यासाठी राखलेल्या धैर्याचा बांध ढळू लागला होता.  त्यांची राधा-कृष्णांच्या संबंधातली विरहावस्था टिपेला पोहोचलेली. त्या विरहवेदना त्यांना असह्य होऊ लागल्या होत्या. तासन्तास मदनटेरवरच्या झाडींमध्ये या वेदनांमुळे मुर्च्छित होऊन ते पडून राहत पण अशा निर्जन स्थानी त्यांची विचारपूस करायला तरी कोण येणार? तिथे असणारे मोर, कोकिळ आणि शुकादि पक्षीच आपल्या कलरवाने त्यांची सोबत करायचे.
असेच एक दिवस राधा-कृष्णांच्या विरह-वेदनेने व्याकुळ होऊन बाबाजी मुर्च्छित पडले. आडरस्त्याच्या जागेत असल्याने कुणालाच त्यांच्याबद्दल काही कळलं नाही आणि ते अगदी रात्रभर तिथेच पडून राहिले. कर्मधर्म संयोगाने दुसर्‍या दिवशी सकाळी कुणा परिक्रमा करणार्‍या यात्रेकरूंच्या गटाला त्यांचा सुगावा लागला आणि त्यांनी बाबाजींना ओळखले. त्याच अवस्थेत उचलून त्या गटाने बाबाजींना राधा-मदनमोहन मंदिरात आणले. त्यांची अवस्था बघून मंदिराच्या सेवाईत गोस्वामींनी ताडले की बाबाजींना काही विशेष अनुभव आलेला आहे. त्यांनी तात्काळ बाबाजींच्या भोवती भजनी-मंडळाला पाचारण करून हरि-कीर्तनाला सुरुवात केली. कीर्तनाचे सूर कानी पडू लागताच बाबाजींची शुद्ध परत आली.
बाबजी यथायोग्य शुद्धीवर आल्याबरोबर सेवेकरी गोस्वामीजी त्यांना घेऊन मंदिरात आतल्या बाजूच्या खोलीत गेले. तिथे त्यांच्या अणि बाबाजींच्या शिवाय आणखी कुणीच नव्हते. अजूनही अश्रु विसर्जन करणार्‍या बाबाजींना गोस्वामीजींनी त्यांच्या इतक्या प्रदीर्घ मूर्च्छेबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी रडत रडत त्यांचा वृत्तांत कथन केला.
बाबाजी म्हणाले, "नेहमी प्रमाणे काल स्नानादि प्रातर्विधी आटोपून मी पाण्याने भरलेलं एक वाडगं घेऊन मदनटेरवरच्या दाट झाडीत जाऊन बसलो. नित्याप्रमाणे लीला-स्मरण करत असताना तेव्हा मला युगल सरकारांचा विरह अधिकच जाणवू लागला आणि मी दु:खातिरेकाने तिथल्या मातीतच तळमळू लागलो. मला आतून आतून प्रचंड दु:खाचे कढ येत होते आणि अगदी सहन होईना तेव्हा मी हंबरडा फोडून रडू लागलो. नाही तरी त्या रानात माझं रडं कोणा माणसाला ऐकू जाणार होतं? आणि कुणाला त्याचा त्रास होणार होता? म्हणून पार निलाजरेपणाने मी युगलमूर्तीला आठवून आठवून लहान मुलासारखा रडत होतो. इतक्यात मला कुणाची तरी चाहूल लागली. कुणीतरी जवळपास उभं होतं. या ग्रीष्माच्या दिवसात हेमन्तातल्या सारखी थंड वार्‍याची झुळुक येत होती, जवळपास कुठेतरी शरदामध्ये फुलतो तसा सप्तपर्ण फुलल्यासारखं वाटायला लागलेलं, बहुदा त्याच्या फुलांचाच असावा असा वाटणारा गंध येऊ लागलेला. बाजूला ती दोघं आपापसात बोलत होती. एक मुलगा नि एक मुलगी."


ती मुलगी त्या मुलाला म्हणाली, "अरे बघ ना हा बाबा किती रडतोय! जरा हसव की त्याला." 

मुलीने असं म्हणताच तो मुलगा माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला, "बाबा, अरे का रडतोयस तू? तुला कुणी मारलं का? कुणी तुझं काही चोरून नेलंय का?"

मी त्याला काय उत्तर देणार होतो? माझी वेदना त्याला काय सांगणार होतो? आधीच माझ्या दु:खाच्या उमाळ्यांनी मी अस्वस्थ होतो त्यात त्या मुलाचे प्रश्न ऐकून मला थोडं वैतागायलाच झालं. मी त्याला म्हणालो, "काही नाही, तुला समजायचं नाही मुला! तू इथून जाच कसा?”

त्यावर तो मला म्हणाला, "अरे बाबा, तुला काय हवंय, या उकाड्याच्या दिवसात इथे उन्हातान्हात बसलायस तर तुला थंड ताक आणून देऊ का? भाकरी आणून देऊ का? तुला काय हवय ते सांग, आणून देतो पण तू असा रडू नकोस रे!"

त्या मुलाचे प्रश्नावर प्रश्न ऐकून मला आणखीनच तिरसटायला झालं. मी तोंड फिरवून त्याला म्हणालो, "अरे गवळ्या! तुझा काय संबंध माझ्याशी? तू आपला तुझ्या गायी चारायला जा ना! सांगतोय मगापासून तुला काही कळणार नाही तरी का प्रश्न विचारून सतावतोयस?"

मी असं म्हण्टल्यावर तो मुलगा त्या मुलीकडे जाऊन तिला म्हणाला, "बाबा तर काही ऐकतच नाहीये. रडतोच आहे, रडतोच आहे. काय करावं?” त्यावर ती मुलगी त्याला म्हणाली, "प्रियतम, तुला नाही जमायचं त्याला हसवणं! मीच बघ त्याला कशी हसवते ते."

ती मुलगी माझ्याजवळ आली आणि आपल्या मंजुळ आवाजात मला म्हणाली, "बाबा, तू का रडतोयस? तुझी बायको मेली का रे?"

मी विरह वेदनेने तळमळत असतानाही तिच्या त्या प्रश्नाने मला हसू आलं. मी तिला म्हणालो, "लाली, मला बायको वगैरे कुणीच नाही."

त्यावर ती मला म्हणाली, "म्हणजे तू ज्याच्यासाठी रडतोयस ते तुझे कुणीच नाहीत तर!"

मी उत्तरलो, "लाली, मी असाच कुणासाठी रडत नाहीये पण जे मला अगदी विसरून गेलेत त्यांच्यासाठी रडतोय."

आमचं हे संभाषण चाललेलं तेव्हढ्यात तो मुलगाही त्या मुलीशेजारी येऊन थांबल्याचं मला जाणवलं. माझ्याजवळ बसून तिने विचारलं, "अरे, ते आहेत तरी कोण?"

मी तिला म्हणालो, "तुला कळणार नाही, लाली! हा ब्रजचा छलिया, ज्याचं आयुष्यभर भजन करत करत मी आता म्हातारा झालोय, एक झलकही अजून दाखवली नाहिये त्याने! आणि तुला काय सांगू लाली, त्या बाँके-बिहारीच्या सान्निध्यात आमची राधाराणीही अगदी निष्ठूर बनून गेलीय."

"मी? मी निष्ठूर बनलेय?" अचानक ती मुलगी म्हणाली, मग सावरून पुढे बोलली, "म्हणजे अरे बाबा, माझं नावही राधाराणीच आहे ना! पण मला सांग आता तुला काय हवंय?"

"आता काय हवं असणार?," मी म्हणालो, "आता आयुष्याच्या सायंकाळी त्यांची एक झलक जरी बघायला मिळाली तरी खूप आहे."

मी असं म्हणताच खुदकन हसून ती मला म्हणाली, "बाबा, अरे तू तर एकदम भोळाच आहेस रे, तुला डोळेच नाहीत तर तू बघणार कसा?"

तिने असं म्हणताच मी बोललो, "लाली, भोळी तर तूच आहेस, जेव्हा राधाकृष्ण माझ्या जवळ येतील आणि आपल्या हाताने स्पर्श करतील तेव्हा माझ्या नेत्रज्योती तात्काळ परत नाही का येणार?"

मी असं म्हणतोय तोच त्या मुलीने माझ्या एका डोळ्याला स्पर्श केला आणि दुसर्‍या डोळ्याला त्या मुलाने स्पर्श केला. त्या दोघांच्या स्पर्शाबरोबरच मला एक झगमगता प्रकाश दिसला. मला दिसायला लागलं होतं. माझ्यासमोर एका मुलाचे आणि मुलीचे चरणकमल होते. ते बघून समोर कोण आहेत हे बघण्यासाठी मी नजर उचलली तर मला माझ्यासमोर उभ्या असलेल्या राधाकृष्णांच दर्शन झालं. मी अगदी भावविव्हल झालो, तोंडातून शब्द फुटेना, हर्षातिरेकाने माझं उर भरून जातंय की काय असं वाटायल लागलं. युगलसरकारांच दर्शन होताच मी मोठमोठ्याने त्यांचा जयजयकार करू लागलो. आनंद जणू माझं हृदय फोडून बाहेर पडू बघत होता. मी राधाकृष्णांना वंदन करण्यासाठी त्यांच्या चरणकमळाशी दण्डवत करतच होतो की आनंदातिशयाने मी तिथेच मूर्च्छित होऊन पडलो."

मदनटेरवाल्या बाबाजींनी ज्याची कामना केलेली त्याची प्राप्तीही त्यांना झाली. पण तरीही त्यांचं रडणं काही थांबलं नाही तर अधिकच वाढलं. राधाकृष्णाच्या एकवेळच्या दर्शनाच्या सुखापेक्षा त्यांच्या त्यानंतरच्या अदर्शनाचं दु:ख त्यांना अधिक असह्य होत होतं. त्या दु:खातच बाबाजी आपला जडदेह सोडून सिद्धदेहाद्वारे राधाकृष्णांच्या परिकरगणांमध्ये सामिल झाले.