बुन्देलखंडामधून वृन्दावनामध्ये आलेले गोपाळ बाबा आपला यार श्रीकृष्ण याच्यासारखेच खेळकर आणि विनोदी स्वभावाचे होते. पण त्यांच्या खेळकरपणात आणि विनोदात लोक कल्याणाचा आणि लोक शिक्षणाचा हेतु नेहमीच असायचा.
आपल्या जन्मगावाचा त्याग केल्यानंतर गोपाळ बाबा, जेव्हा काही काळ जंगलांमध्ये आणि दर्याखोर्यांमध्ये भटकत होते, तेव्हा काही दिवस दतिया संस्थानामध्ये त्यांचा निवास होता. गोपाळ बाबांचा ऋजु पण निर्भय स्वभाव, वैराग्य, निष्ठा-भक्ती आणि संगीत कलेचं मर्मग्राही ज्ञान यांच्यामुळे दतियानरेश त्यांच्याकडे आकर्षित झाले. बाबांना ते गुरूचा मान देत आणि कारभारही त्यांच्या अनुकूल मतांनुसारच करायचे. याच कारणाने बाबा दतियामध्ये असताना त्या भागामध्ये भक्ती आणि नामसंकीर्तनाचा खूप चांगला प्रसार झाला. गोपाळ बाबा जसे एक दिवस दतियामध्ये प्रकटले होते तसेच एक दिवस कुणालाही न सांगता न कळवता ते दतियामधून निघून गेले. दतियात त्यांच्या जाण्यानंतर कुणालाही त्यांचा ठावठिकाणा माहित नव्हता. गोपाळ बाबा वृन्दावनात आल्यानंतर काही काळाने ही बातमी दतियानरेशांना मिळाली. त्याबरोबर महाराज स्वतः जातीने वृन्दावनात आले आणि मोठ्या विनम्रतेने त्यांनी गोपाळ बाबांना पुन्हा दतियामध्ये येऊन राहण्याची गळ घातली. बाबांनी या गोष्टीला नकार दिला तरी ते त्यांच्या मागेच लागले. तेव्हा गोपाळ बाबा त्यांना म्हणाले, "आता तू नाहीच ऐकत आहेस तर येतो मी तुझ्याबरोबर!" याचा महाराजांना खूप आनंद झाला आणि त्यांनी प्रस्थानाचा मुहूर्त ठरवला.
ठरलेल्या दिवशी मुहूर्ताच्या वेळेला सकाळी सकाळी गोपाळ बाबा दतियानरेशांकडे आले आणि त्यांना म्हणाले, "चला महाराज, मी एकदम तयार होऊन आलेलो आहे. आपण लगेच निघूया." महाराजांनी बाबांकडे पाहिलं मात्र आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. गोपाळ बाबांनी स्वतःच्या तोंडाला संपूर्ण काळं फासलं होतं आणि ते गाढवावर उलटे बसून आले होते. महाराजांनी त्यांना विनम्रतेनं विचारलं, "बाबा, हे असं रूप का बनवलंत? गाढवावर उलटं बसून येण्याचं काय प्रयोजन आहे?" त्यावर गोपाळ बाबा म्हणाले,
"एकदा ज्याने वृन्दावनाचा आश्रय घेतला आणि पुढे वृन्दावन सोडून कुठे दुसरीकडे जाण्याचा विचार केला तर त्याचं असंच रूप होतं. त्याच्यासाठी हे गाढवावरून धिंड काढण्या इतकंच दु:खद प्रकरण आहे."
गोपाळ बाबांनी असं म्हणताच दतियानरेशांना आपली चूक उमगली आणि ते बाबांना म्हणाले, "बाबा! माझ्या या अपराधाला क्षमा करा. मी तुम्हाला वृन्दावन सोडण्यासाठी भरीला घालून तुम्हाला खूपच त्रास दिला आहे. आता मी तुम्हाला दतियात या असं म्हणून अजिबात हट्ट करणार नाही."
गोपाळ बाबांचं ब्रजभूमीवर खूप प्रेम होतं आणि त्याबरोबरच त्यांचा ब्रजवासीयांवरही खूप स्नेह होता. असेच एकदा गोपाळ बाबा बरसान्यातल्या एका बागेमध्ये खूप उशीरापर्यंत बसून श्रीकृष्ण चिंतन करत होते. जवळच कुठेतरी त्यांना कुजबुज ऐकू आली. त्यांनी नीट कान देऊन ऐकलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की काही चोर जवळच्या एका गोस्वामींच्या घरामध्ये चोरी करण्याची योजना बनवत आहेत. ते त्यांच्याजवळ जाऊन त्यांना म्हणाले, "मी एक चोर आहे. मी पण येतो तुमच्या बरोबर चोरी करायला."
ऐन वेळी आलेल्या या नवागताला त्या चोरांनी आपल्यात सामिल करून घेतलं आणि त्या गोस्वामींच्या घरात सर्वजण घुसले. बाकी चोर घरातल्या मौल्यवान वस्तु एकत्र करू लागले पण गोपाळ बाबांचं लक्ष घरातल्या एका कोपर्यात असलेल्या देवघराकडे गेलं. त्यांनी देवघराचा दरवाजा उघडला तर त्यांना दिसलं की त्यातले ठाकुरजी तर झोपले आहेत. त्यावर ते म्हणाले, "अरे यार! इथे मी तुझ्या घरी आलोय आणि तू चक्क झोपून राहिलायस? चल उठ, माझ्यासाठी काही न्याहरी वगैरे बनवून चांगली बडदास्त ठेवणार आहेस की नाही?"
ठाकुरजी गाढ झोपलेले होते. ते थोडीच काही बोलणार होते, उत्तर देणार होते? त्यावर गोपाळ बाबा, "तू असा नाही उठणार, आता बघंच!" असं म्हणत देवघराच्या दरवाज्याजवळची घंटा मोठ्याने जोराजोरात वाजवू लागले. त्याबरोबर त्यांच्या बरोबरच्या चोरांनी जमा केलेला सगळा मौल्यवान मुद्देमाल तिथेच टाकला आणि ते सर्व जण पसार झाले. यामुळे गोस्वामींचं होणारं नुकसान टळलं आणि त्यांनी बाबांना खूप धन्यवाद दिले.
No comments:
Post a Comment