मनुष्याचं मन एक निराळच रसायन आहे आणि या मनाचा, शरीरावरचा आणि शरीरक्रियांवरचा परीणामही अनन्यसाधारण असतो. माणसाचं मन जेव्हा एखाद्या गोष्टींचं सतत मनन चिंतन करतं तेव्हा ते त्या गोष्टीसारखंच बनतं. त्या गोष्टीचे गुण मग मनामध्ये उमलायला लागतात. बुंदेलखंडातून ब्रजभूमीमध्ये आलेल्या एका बाबांचं असंच झालेलं. हे बाबा ज्याचं चिंतन करायचे तो होता नंदगावचा गुराखी! त्यामुळे बाबांची वेशभूषा, राहणी, आचारविचार आणि वाणी सर्व ब्रजवासी गोपाळांसारखंच होऊन गेलं होतं. यामुळे आता लोकंही त्यांना 'गोपाळ बाबा' म्हणूनच हाक मारू लागली. गोपाळ बाबा ज्याची आराधना करायचे तो मोठा संगीत प्रेमी असल्याने गोपाळ बाबांनाही संगीतकलेमध्ये उत्तम गति आणि रुचि होती.
गोपाळ बाबांच्या पूर्व इतिहासाबद्दल फार थोड्या लोकांना माहिती होती. बुन्देलखंडातल्या ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्म झालेल्या बाबांना लहानपणापासूनच श्रीकृष्णप्रेमाची लागण झालेली होती. त्यांच्या विरक्तीमध्ये वाढ होऊ नये म्हणून त्यांचं लग्न त्यांच्या वयाच्या सोळाव्या वर्षीच करून देण्यात आलं. पण काही वर्षातच पत्नीच्या पहिल्या बाळंतपणात तिच्या प्रसव-पीडा बघून त्यांच्या वैराग्याने पुन्हा उचल खाल्ली आणि परीणामी घर-संसाराचा त्याग करून ते डोंगर-दर्या नि जंगलांमध्ये श्रीकृष्णाचा शोध घेत फिरू लागले. त्यांची श्रीकृष्णाकडे बघण्याची दृष्टी साख्य भावामधली होती. ते त्याला 'यार' अशी हाक मारायचे. आपल्या 'यार'च्या आठवणीत आणि त्या आठवणीतून आलेल्या जगाला विसरायला लावणार्या मस्तीत फिरत फिरत गोपाळ बाबा ब्रजभूमीमध्ये पोहोचले होते.
ब्रजभूमीत पोहोचल्यावर गोपाळ बाबांचं श्रीकृष्णप्रेम दिवसेन्दिवस वाढतंच गेलं. श्रीकृष्णाच्या विरहात कधी ते ब्रजरजात, ब्रजभूमीच्या मातीत लोळायचे, कधी यमुनेच्या काठावर वाळवंटामध्ये तासन्तास कृष्णकीर्तन करायचे, कधी मंदिरांतील कृष्णाच्या मूर्तींकडे एकटक बघत राहायचे, कधी हसायचे, कधी रडायचे, कधी कृष्णाला मिठी मारण्यासाठी भान हरपल्यामुळे हात पसरून धाऊ लागायचे तर कधी भान परतल्यावर तो पकडीत येत नाही याची जाणीव होऊन, "हा कृष्ण!, हा श्यामसुंदर!! हा मदनमोहन!!! असं ओरडत जमिनीवर मूर्च्छित होऊन पडायचे. त्यांचे डोळे श्रीकृष्णदर्शनासाठी आसुसलेले राहून सतत अश्रुपात करायचे, कान श्रीकृष्णाच्या मुरलीच्या स्वर्गीय ध्वनिला ऐकण्यासाठी हपापलेले असायचे तर अंग-प्रत्यंग श्रीकृष्णाच्या स्पर्शासाठी व्याकूळ व्हायचे. यासाठी श्रीकृष्णाचा शोध घेत घेत ते कधी नंदगावात तर कधी गोकुलात, कधी गोवर्धनवर तर कधी कालिया डोहाजवळ, कधी सेवाकुंजामध्ये तर कधी निधिवनामध्ये भटकत राहात.
बाबांना श्रीकृष्णाच्या आठवणीमध्ये तळमळत आणि त्यांचा शोध घेत ब्रजभूमीत इथे तिथे भटकत खूप दिवस लोटले. पण तरीही त्यांना श्रीकृष्णदर्शन घडलं नाही तेव्हा त्यांच्या मनात एकदम विपरीत भावांनी उचल खाल्ली. ते म्हणू लागले, "मी ऐकलेलं की तू दयाळू आहेस, प्रेमी आहेस. जो एक पाऊल तुझ्या दिशेने टाकतो, त्याला भेटण्यासाठी तू स्वतः दहा पावलं पुढे येतोस. पण हे सगळं खोटं आहे. प्रत्यक्षात तू अत्यंत निर्दयी आणि क्रूर आहेस. तुझ्याशी यारी करणं म्हणजे पस्तावणं आहे, वाळवंटामध्ये तहानलेला माणूस जसा तडफडून मरतो, तसंच आहे. बस, तुटली आता आपली मैत्री! तुला नन्दराजाचा पुत्र म्हणून आपल्या युवराजपदाचा माज आहे तर मीही गोपाळ आहे. कधी भेटलास ना कुठेही, तर बोलणारच नाही मी तुझ्याशी, बोलणं तर सोडच, मी तर बघणारपण नाही तुझ्याकडे!"
त्या दिवसापासून गोपाळ बाबांनी मंदिरांमध्ये जाणं सोडलं, कृष्णलीलांच्या नाटकांचे प्रयोग बघणं सोडलं, कृष्णकीर्तन करणंही बंद केलं. इतर कुणालाही यातलं काही करताना पाहिलं की ते त्याला म्हणू लागले, "दादा! माझं ऐकाल तर याच्या भानगडीतच पडू नका. काहीच हाती गावणार नाही. खूप निष्ठूर आहे हो तो! बस, फक्त गोपींबरोबर हैदोस घालता येतो याला, आपली वास्तपुस्त करायची याला कुठे काही गरज पडलीय?"
इथे श्रीकृष्णही आपल्या सख्याच्या दर्शन-कीर्तनापासून वंचित राहिल्याने व्याकुळ झाले होते. त्यांचा मित्र स्वतः तर त्यांच्यावर रुष्ट झालेलाच होता त्याबरोबरच तो इतर भक्तांनाही काही-बाही सांगत होता - त्यांची दिशाभूल करत होता. या दोन्ही गोष्टी त्यांच्यासाठी असह्य होत्या.
एके दिवशी गोपाळ बाबा रमणरेतीमध्ये भटकत असताना, संध्याकाळच्या वेळी त्यांनी समोरून गायींचा कळप येताना पाहिला. त्या कळपामध्ये एक नीळ्या कमळासारखी कांती असणारा मुलगा, आपल्या मुरलीमधून अवर्णनीय अशी सुरावट वाजवत येत होता. थोडा जवळ आला तर गोपाळ बाबांना त्याचे सुंदर, कुरळे लांब केस, कमळाच्या पाकळीसारखे ओठ, सुंदर टपोरे डोळे, गळ्यात वनमाला आणि डोक्यावर खोचलेलं मोरपीस हे सारं दिसलं. त्यांनी एकदम म्हण्टलं, "अरे, हा तर माझा यार आहे!" गोपाळ बाबांच्या शरीरामध्ये एक आनंदाची लहर दौडू लागली. त्यांचा श्रीकृष्णावरचा सारा रोष कुठेतरी निघून गेला. आपला यार समोर दिसल्यावर, तुझं तोंडही बघणार नाही, ही आपली प्रतिज्ञाही ते विसरून गेले. स्तब्ध उभे राहून ते एकटक समोरून येणार्या श्रीकृष्णाकडे बघत त्याच्या रुपाचं आपल्या नजरेने जणु माधुर्यपानच करत राहिले. समोरासमोर आल्यावर त्यांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. दोघांचही भानच हरपून गेलेलं. सद्गदीत आवाजात श्रीकृष्ण त्यांना म्हणाले, "गोपाळा, मी कधीपासून तुला भेटण्यासाठी तळमळतोय आणि आत्ता आलास होय तू!"
हे ऐकताच श्रीकृष्णदर्शनाने शांत झालेला गोपाळ बाबांचा अभिमान, रोष एकदम उफाळून आला आणि ते श्रीकृष्णाला म्हणाले, " राहू दे, राहू दे! खोटं कशाला बोलतोयस? तुला भेटायचं होतं तर तूच का नाही आलास माझ्याकडे? पण तू तर ब्रजभूमीचा युवराज आहेस ना, मग कशाला येशील माझ्याकडे?" असं म्हणून ते तिथून निघून जाऊ लागले.
श्यामसुंदरने त्यांना हाळी दिली, "गोपाळ, पुन्हा केव्हा भेटशील?"
"मी कुठे ही जागा सोडून जातोय? वृन्दावनातच तर राहतोय मी, तेव्हा गरज वाटेल तेव्हा घे भेटून इथेच!" असं म्हणत गोपाळ बाबा निघून गेले.
या दिवसानंतर गोपाळ बाबांचा श्यामसुंदरबरोबर यारीचा एक नवा अध्याय सुरू झाला. श्यामसुंदर त्यांना कधी प्रत्यक्ष भेटे तर कधी छद्म रुपात. पण दोघांमध्ये हास्य, व्यंग, उपालम्भ (भांडण) अशा प्रकारच्या साख्य भावातील अनेक प्रकारच्या लीला संपन्न झाल्या.
No comments:
Post a Comment