भगवंतांना भक्तांची सेवा अनुपम सुखदायी असते. मग ही सेवा कितीही क्षुल्लक का असेना ते तिचा आनंदाने स्विकार करतात. छोट्यातली छोटी सेवाही जर कुणी नियमाने करत असेल तर भगवंतांना त्यात मोठे सुख प्राप्त होते. अशी सेवा करणार्याच्या जणु ते उपकाराखालीच जातात. मात्र हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे की भगवंत परोक्ष प्रियः असतात. म्हणजे त्यांच्या आवडी निवडी अगदी निकडीची परीस्थिती निर्माण होई पर्यंत प्रत्यक्ष कुणाला समजू देत नाहीत पण त्यांच्याकडे नोंद मात्र सगळ्याचीच असते.
अठराव्या शतकाच्या अखेरच्या काळात नंदगावच्या पावन सरोवराच्या काठावर श्रीगौरदास बाबाजी श्रीकृष्णाची उपासना करत होते. बाबाजींनी आपलं हृदयच जणु श्रीकृष्णांना दिलेलं होतं. ते दिवसरात्र श्रीकृष्णांचा धावा करायचे. ते कोणत्याही प्रकारे भगवंतांच्या सेवेमध्ये उणीव राहू नये म्हणून दक्ष असायचे. त्यांना श्रीकृष्णदर्शनाची तीव्र इच्छा होती. यामुळे सतत ते भगवंतांच्या सेवेत राहण्याचा प्रयत्न करायचे. त्यांनी भगवंतांच्या पुष्पसेवेचं व्रत घेतलेलं होतं. कसाही दिवस असो, मुसळधार पाऊस पडत असो वा हाडं गोठवणारी थंडी, श्रीगौरदास बाबाजी नियमाने रोज पहाटे उठून नंदगावहून गाझीपूर जवळच्या प्रेम सरोवराच्या आजुबाजुच्या प्रदेशात नैसर्गिकपणे उमलणारी फुलं वेचायला जायचे. तिथल्या रंगीबेरंगी ताज्या फुलांचा गोपालजींसाठी सुंदर हार गुंफायचे आणि तो भगवतांना परीधान करवूनच इतर नैमित्तिक कामांना हात लावायचे. हे व्रत त्यांनी अनेक वर्षं नियमाने पाळलेलं होतं.
अशाप्रकारे नियमित पुष्पसेवा करता करता एक दिवस श्रीगौरदास बाबाजी मनात फारच खंतावले. त्यांच्या मनाने घेतलं की भगवंत अगदी पाषाणहृदयी आहेत. इतकी वर्ष त्यांची सेवा करूनही ते अजून माझ्यावर कृपा करत नाही आहेत. त्यांच्या दर्शनाचा अजून एकदाही लाभ घडू दिलेला नाही. भगवंतांची ल्हादिनी शक्तीरूप असलेल्या वृषभानुनंदिनी राधाराणीच जास्त कृपाळू आहेत. इतकी वर्षं मी त्यांची सेवा केली असती तर एव्हाना नक्कीच त्यांनी माझ्यावर कृपा करून मला त्यांचं दर्शन दिलं असतं. तेव्हा आता मी लगेच तिच्याच सेवेसाठी बरसान्याला जातो. इथे यापुढे अजिबात राहणार नाही.
असा निर्णय झाल्यावर संध्याकाळच्या समयी बाबाजी आपलं किडुकमिडुक सामान एका थैलीत टाकून नंदगावहून बरसान्याला जायला निघाले. बरसान्याच्या रस्त्यावर गावाबाहेरच्या मैदानात गायी चरण्यासाठी नेवून परतणारी गुराखी ब्रजवासी मुले दिसली. त्यांच्यातल्या एका सावळ्याशा सुंदर मुलाने त्यांना हटकलं आणि विचारलं, " अरे बाबा, कुठे निघालास?"
त्यावर श्रीगौरदास बाबाजी त्याला म्हणाले, "लाला, आता इथे नाही राहू शकत, मी निघालो बरसान्याला." इतकं सांगेतो बाबाजींचा गळा दु:खाने दाटून आला.
त्यावर त्या ब्रजवासी मुलाने थोडं थांबून व्याकुळ नजरेने त्यांच्याकडे पहात त्यांना म्हण्टलं, "बाबा, नको जाऊस."
बाबाजी आपल्याच दु:खात होते. स्वतःशीच बोलल्यासारखे त्याला म्हणाले, "नाही लाला, गेली अनेक वर्षे इथे राहिलो, काय मिळालं मला त्याचं? एका कृपाकटाक्षाची इच्छा होती पण इतक्या वर्षांच्या सेवेनंतर ती ही पूर्ण झाली नाही तर आता इथे थांबून काय फायदा?"
तो गुराखी मुलगा त्यांची वाट आपल्या दोन्ही हातांनी अडवून रस्त्यातच उभा राहिला आणि म्हणाला, "बाबा, ऐक माझं, नको जाऊस."
आधीच दु:खात असलेले बाबाजी त्याच्या अशा वाट अडवण्याने एकदम वैतागले. त्या मुलाच्या एका बाजूने वाट काढून त्याला ओलांडून ते तसेच पुढे निघाले आणि जाता जाता त्याला म्हणाले, "पोरा का उच्छाद मांडला आहेस? नको अडवूस असा माझा रस्ता. कशाला थांबू मी इथे?"
बाबाजींची पाठ वळताच तो मुलगा आर्त स्वरात मोठ्याने म्हणाला, "मग बाबा, तू असा निघून गेलास तर माझी रोजची पुष्पसेवा कोण करणार रे?"
वैतागाच्या भरात त्या मुलाला ओलांडून दोन पावलं चाललेले बाबाजी त्याच्या या उद्गारांनी एकदम थबकले. झटकन वळून त्यांनी आश्चर्याने विचारलं, "अरे, कोण आहेस कोण तू?" पण त्यांना त्या मैदानावर स्वतःशिवाय कुणीच दिसलं नाही. ना गायी, ना गुराखी ना तो ब्रजवासी मुलगा. ते सारेच जणू एकदम अन्तर्धान पावले.
श्रीगौरदास बाबाजी दु:खातिशयाने उन्मळून पडले. अगदी धांय मोकलून रडू लागले, विलाप करू लागले, "भगवंता! कृष्णा!! असा कसा रे तू छलिया! दर्शन देण्याची कृपा केलीस पण ती ही अशी कपटाने? एखादा क्षण थांबला असतास तर तुला डोळे भरून पाहून घेतलं असतं आणि तसं झाल्याने तुझ्या कृपेचा खजिना का रीता झाला असता रे? पण यात तुझाही काय दोष? दोष माझाच आहे कारण मीच तुला ओळखू शकलो नाही. पण तू मात्र मी इथून जाऊ नये म्हणून स्वतः आलास, माझी विनवणी केलीस. अगदी माझा रस्ताही अडवलास. आता मात्र मी तुझी चरणकमळं सोडून कुठेही जाणार नाही." यानंतर श्रीगौरदास बाबाजींनी नंदगावात राहूनच भगवंतांची सेवा करून त्यांची कृपा पूर्णपणे प्राप्त केली.
भक्ताने भगवंताची नियमाने केलेली सेवा ही त्यांना फार आनंददायक असते. अशा सेवेखातर भगवंत स्वतःला भक्ताच्या ऋणात मानतात आणि प्रसंगी स्वतःहून भक्तावर कृपा करतात.
No comments:
Post a Comment