Sunday, 1 May 2011

भक्तापाठी भगवंत


भक्त आणि भगवंत यांच्यात फारच विलक्षण संबंध असतो. भक्ताला भगवंतांच्या दर्शनाची जेवढी इच्छा असते त्यापेक्षा अनेक पटींनी भगवंतांना भक्ताच्या दर्शनची अभिलाषा असते. जीवा-शिवाचा हा संबंध समजण्यासाठी भक्ताचाच भाव अंगी बाणवणं आवश्यक ठरतं. जीव हा शिवाचा नित्य सेवक आहे आणि या सेवाभावातूनच भक्ताची अध्यात्मिक प्रगती साधली जात असते. भगवंतांच्या सेवेमध्ये रममाण असलेला भक्त मायादेवीच्या पाशातून सुटण्याच्या संदर्भात योग्य मार्गावर असतो आणि म्हणूनच भक्त भगवंतांची अधिकाधिक सेवा करण्याच्या प्रयत्नात असतो. मात्र असं असलं तरी भगवंतही अशा भक्ताची सेवा मिळवण्यासाठी उतावीळ असतात. भक्तांच्या प्रेमसेवेद्वारे भगवंतांना जे सुख मिळतं ते तसं तर त्यांना वैकुण्ठातही मिळत नाही आणि म्हणूनच भगवंत अशी सेवा ग्रहण करण्यासाठी श्रीविग्रह स्वरूपात भक्तांजवळ उपस्थित होतात, कधी कधी अगदी बोलावता सुद्धा!
ब्रजमंडलामध्ये काम्यवन किंवा कामवन नावाचा एक भाग आहे. तिथे जयकृष्णदास बाबाजी राहायचे. जयकृष्णदास बाबाजी तिथे कधी आले, कुठून आले, त्यांचे गुरू कोण होते याची कुणालाच माहिती नव्हती. काम्यवनाच्या विमला कुण्डाच्या काठावर राहून ते श्रीकृष्णाच्या भजनात दंग असायचे. त्यांची श्रीकृष्ण उपासना अगदी वैशिष्ट्यपूर्ण होती. ते दिवसरात्र सतत हरिनामाचा जप करायचे. झोपायचेही नाहीत. दिवसभरातून एकदाच माधुकरी मागायला जायचे. राधाकृष्णांच्या अष्टौप्रहरी लीलांच्या अनुरोधाने त्यांचा रागानुगा भक्तिमधला खूप मोठा अधिकार होता.
अशा या सिद्ध जयकृष्णदास बाबाजींना केवळ एकच अडचण होती आणि ती म्हणजे तिथले ब्रजवासी गोप बालक. विमला कुण्डाच्या काठावर भजन करणार्‍या बाबाजींना ही छोटी ब्रजवासी मुले फार सतावायची. त्यांच्या उपासनेमध्ये व्यत्यय येईल असे खेळ खेळणं, कुण्डामध्ये उड्या मारणं, आरडा ओरडा करणं, वाकुल्या दाखवणं अशा या ना त्या प्रकारे तिथे उच्छाद मांडायची. या सगळ्याने त्रस्त होऊन बाबाजींनी दुसर्‍या एखाद्या शांत ठिकाणी जाण्याचं ठरवताच स्थानिक ब्रजवासींनी त्यांना एक छोटीशी झोपडी बांधून दिली ज्यामुळे या ब्रजवासी बालकांचा बाबाजींना होणारा त्रास बराच आटोक्यात आला पण ही मुले आता नव्या नव्या खोड्या काढतील अशी काहीशी धास्तीच जयकृष्णदास बाबाजींना वाटायची.
एके दिवशी दुपारच्या वेळेला जयकृष्णदास बाबाजींना आपल्या भजनानंदी अवस्थेमध्ये अत्यंत आतुरतेने श्रीकृष्ण विरहाची भावना उत्पन्न झाली. त्यामुळे त्यांची भावसमाधि उतरताच त्यांना जाणवलं की विमला कुण्डाच्या तीरावर आज चहुबाजूने असंख्य गायी आणि ब्रजवासी गोपबालक जमा झालेले आहेत. बाबाजींच्या झोपडीच्या समोर उभे राहून ती मुले ओरडू लागली, "अरे ए बाबा, खूप तहान लागली आहे रे, जरा पाणी तर दे की प्यायला!" जयकृष्णदास बाबाजी आधीच ब्रजवासी मुलांमुळे त्रस्त होते, आता ही मुले पुन्हा उच्छाद मांडतील म्हणून ते झोपडीतच बसून राहिले, त्यांनी दारच उघडलं नाही. पण इतक्याने ती गोपबालकं थोडीच शांत राहणार होती? त्यांनी तिथेच गोंधळ करायला सुरूवात केली. झोपडीच्या दाराशी उभी राहून म्हणू लागली, "अरे बंगाली बाबा, आम्हाला माहिती आहे की तू आतमध्ये भजन करत बसला आहेस. प्रचंड तहान लागली आहे तर आम्हाला बाहेर येऊन थोडं पाणी तर पाज. तुला माहित आहे ना की दयाहीन साधु आणि एखादा खाटिक हे दोघेही एकाच जातीचे असतात." असं म्हण्टल्याबरोबर जयकृष्णदास बाबाजी चिडले आणि एक लाकडी काठी घेऊन घाईघाईने झोपडीच्या बाहेर आले. बाहेर बघतात तो त्यांना अनेक धष्टपुष्ट गायी आणि अनेक गोपबालक दिसले. सगळे एकापेक्षा एक सुंदर आणि अद्भूत! त्यांना पहाताच त्यांचा क्रोध कुठेतरी पळूनच गेला. हातातली काठी गळून केली. त्या मुलांमधला जो मुख्य होता त्याच्याकडे एक विलक्षण तेज होतं. त्याला बाबाजींनी विचारलं,
"बाळा, तुम्ही कुठल्या गावाहून आलात?"
"नंदगावाहून", त्या मुलाने उत्तर दिलं.
"आणि तुझं नाव रे काय?" त्यांनी पुढे विचारलं.
"कन्हैय्या", तो उतरला.
"बाळा, तुझं रे नाव काय?", त्यांनी दुसर्‍याला विचारलं.
"बलदाऊ", तो दुसरा उत्तरला.
त्यावर मुले म्हणू लागली की बाबा, आधी पाणी तर पाज, नंतर कर काय करायची ती चौकशी! जयकृष्णदास बाबाजींनी सर्वांना प्रेमाने पाणी पाजलं. पुढे ती मुलं म्हणाली, "अरे बाबा, आम्ही रोज असं गायींना घेऊन फिरतो. मग दुपारच्या वेळेला तहान भूकेने जीव तळमळतो तेव्हा तुझ्याजवळ तू रोज काही बालभोग आणि पाणी ठेवत जा आमच्यासाठी", त्यावर, "नाही बाबा नाही, असं रोजचं काम नका लादू माझ्यापाठी, जमणार नाही मला"असं म्हणत बाबाजी पाण्याचं भाण्डं ठेवायला आपल्या झोपडीच्या आत गेले. आत जाता जाताच विचार करू लागले की कोण असतील ही मुलं? आजुबाजुची नेहमीची तर नाहीच आहेत ही, त्यांना आधीही कधी पाहिल्याचं आठवत नाही आहे. त्यांचं बोलणंही किती मधुर आहे. ही मुलं इथलीच आहेत की कुठल्या दुसर्‍या जगातली, असा विचार करत करत ते बाहेर आले तो बघतात काय की तिथे ना एकही गाय आणि ना एकही गोपबालक! जणू सगळे तिथून अन्तर्धान पावले होते. आता बाबाजींना सारी परीस्थिती समजली. ते त्या गोप बालकांना जे शेवटचे वाक्य बोलले ते आठवून आठवून त्यांना दु:खाचे उमाळे फुटू लागले. तेव्हा भगवंतांनी त्यांना सांगितले की आता दु:ख करू नकोस, मी उद्या येईन तुझ्याकडे. यामुळे बाबाजींना थोडा धीर आला.
दुसर्‍या दिवशी त्यांनी त्या मुलांची खूप वाट बघितली पण कुणीच आलं नाही. काही वेळानंतर एक वृद्ध ब्रजवासी माई त्यांच्याकडे गोपालकृष्णाची एक सुंदर मूर्ती घेऊन आली आणि त्यांना म्हणाली की बाबाजी, मी या गोपालजींची अनेक वर्ष सेवा केली. पण आता माझ्याच्याने होत नाही तेव्हा तो भार यापुढे तुम्ही उचला. त्यावर जयकृष्णदास बाबाजी तिला म्हणाले, "माई, मी कशी यांची सेवा करू? माझ्याकडे त्याची कोणतीही साधन-सामग्री नाही". तेव्हा साधन सामग्री मी पाठवून देते असं म्हणत ती वृद्धा निघून गेली. बाबांना समजलं, भगवंतांनी मी उद्या येईन हे जे सांगितलेलं त्याप्रमाणे ते रोजचा बालभोग आणि पाणी घेण्यासाठी जयकृष्णदास बाबाजींच्या कुटीमध्ये उपस्थित झाले आहेत. गोपालजींची ती मूर्ती आणि तिचं सौंदर्य बघून बाबाजींच्या डोळ्यांचं पारणंच फिटलं.
भगवंतांची अशीच उलटी रीत असते. कुणी त्यांना अगदी टाहो फोडून बोलवत असतो तर त्याच्याकडे ढुंकुनही बघत नाहित आणि जो बोलवत नाही त्याच्याकडे अगदी त्याने त्यांची उपेक्षा केली तरीही जातात. ऋषी, मुनी त्यांना बोलावून बोलावून थकतात पण ते त्यांच्या मनःपटलावरही उमटत नाहीत पण एखादा भक्त त्यांना सेवा जमणार नाही सांगतो तर ते अगदी त्याच्या पाठीच लागतात. आता हेच बघा ना, जयकृष्णदास बाबाजींनी त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं की बाबा, रोज रोजचं हे काम करायला लाऊ नका, तर आता स्वतःच तिथे असे जाऊन बसलेत की तिथून जायचं नावच काढत नाहीत.
म्हणूनच तर सुरुवातीला म्हण्टलंय ना, भक्तांच्या प्रेममयी सेवेतून भगवंतांना जे सुख मिळतं ते त्यांना वैकुण्ठातही अप्राप्य असतं आणि म्हणूनच जयकृष्णदास बाबाजींच्या प्रेमसेवेच्या सुखासाठी भगवंत स्वतःहून त्यांच्याकडे विग्रहरूपात अवतीर्ण झाले. शेवटी भगवंत आणि त्यांचे भक्त यांच्यात फार विलक्षण संबंध असतो हेच खरं!

No comments:

Post a Comment