Saturday, 14 May 2011

भक्तीतील भाव-युद्ध


नंदगावातल्या नंदीश्वरमहादेवाजवळच्या यशोदाकुण्डानिकटच्या गुहेमध्ये एक महात्मा बाबाजी खूप दिवसांपासून भजन करत होते. ते कोण होते? त्यांचे नाव काय होतं? ते कुठून आलेले? हे कुणालाच माहिती नव्हतं. खूप वयस्कर असल्यामुळे ते आपल्या या गुहेतून फार बाहेर पडत नसत. संध्याकाळच्या वेळी एकदाच बाहेर पडून शौचादि विधि उरकून ते माधुकरीसाठी गावात जायचे आणि चार घरांमधून जितकी भाकर मिळेल तेवढ्यानेच उदरपूर्ति करून पुन्हा भजनाला बसायचे.
एके दिवशी गोवर्धनच्या एका बाबाजींनी त्यांना चकलेश्वर महादेवाला येण्यासाठी भरीला घातलं आणि दोन दिवस नामयज्ञात सामिल करण्यासाठी तिथे घेऊन गेले. तिसर्‍या दिवशी तिथून परतल्यावर नियमानुसार ते माधुकरीसाठी गावात गेले. माधुकरी घेऊन पुन्हा गुहेकडे आले तो गुहेच्या तोंडाशीच त्यांना कुणाचे तरी करुण बोल ऐकू आले, "अहो बाबाजी, कुठे होतात तुम्ही? गेल्या दोन दिवसांपासून तुम्ही नसल्यामुळे मी उपाशीच राहिलो आहे हो!"
बाबाजींना आजुबाजुला कुणीच दिसेना. त्यांनी आश्चर्याने विचारलं, "आपण कोण आहात? आपला आवाज तर ऐकू येतोय पण दिसत मात्र कुणीच नाही आहे."
"तुम्ही माधुकरी मागून आल्यावर एक भाकर तुकडा इथेच या गुहेच्या तोंडाशी ज्या कुत्र्याला टाकायचात, तोच मी कुत्रा आहे." असं उत्तर त्यांना ऐकू येत असतानाच गुहेच्या दाराशी एक कुत्रा कपारींमागून अवतीर्ण झाला. कुत्रा बोलताना दिसत नव्हता पण त्याच्या मनातील भाव मात्र बाबाजींना स्वच्छ ऐकू येत होते. त्यांनी दयार्द्र स्वरात पुन्हा विचारलं, "तुम्ही कोण आहात? तुम्हाला हे रूप कसं प्राप्त झालं? तुमच्या गतकालीन स्वरूपाबद्दल काही सांगू शकाल काय?"
कुत्र्याच्या मनातील भाव बाबाजींच्या व्याकुळ अन्तःकरणात उमटू लागले. तो कुत्रा त्यांना म्हणाला, "बाबाजी, मी एक अभागी जीव आहे. पूर्वीच्या जन्मी मी या नन्दीश्वर महादेवाचा गुरव होतो. त्या जन्मात माझ्याकडून काही अपराध घडले. मी माझं वर्तनही शुद्ध ठेवू शकलो नाही. माझ्या त्या कर्मांचा परीणाम म्हणून मला हा कुत्र्याचा जन्म मिळाला. त्यातही पूर्वजन्मातील स्मृतिंमुळे मी तुमच्यासारख्या महात्म्यांच्या हातच्या माधुकरीच्याद्वारे स्वतःची उर्ध्व गति साधण्याचा प्रयत्न करत होतो पण माझे हे प्रयत्नही अपुरे पडले आणि सध्या कुत्र्याच्या देहातील भूतयोनीमध्ये मी अडकून राहिलो आहे. तुमच्या हातच्या माधुकरीने मला उर्ध्वगति मिळेल या आशेवर मी इथे आसपास राहतोय."
कुत्र्याचा वृत्तांत ऐकल्यावर कुतुहलवशात् बाबाजींनी विनयपूर्वक विचारलं, "काहीही असलं आणि कशामुळेही असलं तरी तुम्ही एका अप्राकृत धामातील भूत आहात. त्यामुळे तुम्ही श्री श्री जुगलकिशोर आणि त्यांच्या अप्राकृतलीला बघंतच असाल ना?"
"होय बाबा! या लीलांचं दर्शन होतं पण तुम्हा बाबाजींच्याकडून रागानुगा भक्तिच्या अभ्यासाने त्यांच्या रूपाचं आणि लीलांचं ज्याप्रमाणे दर्शन-आस्वादन होतं तसं करण्याची योग्यता माझ्यात कुठली?" तो कुत्रा उत्तरला.
"एकदा मला त्या मुरलीधराचं दर्शन करवू शकाल?" बाबांनी कातर स्वरात विचारलं.
"नाही हो बाबाजी! माझ्यात कुठे आहे असलं काही दाखवण्याची क्षमता?" त्यांना उत्तर मिळालं.
"मग त्यांचं दर्शन कसं करता येईल, हे तर सांगू शकाल?" बाबांनी पुन्हा विचारलं.
"हो, ते सांगता येईल. गोरज मुहूर्तसमयी श्रीकृष्ण आपल्या गायींना कुरणांतून परत आणतात. यशोदाकुण्डाजवळ तुम्हाला त्यावेळी अनेक गुराखी आपापल्या गायींना घेऊन परतताना दिसतील. त्यातला जो सगळ्यात शेवटी असतो ना, तोच गोपाळ आहे." असं सांगून बाबांनी टाकलेला भाकरतुकडा स्पर्शित करून तो कुत्रा कुठेतरी निघून गेला.
आता बाबाजींना गोरजमुहूर्ताचे वेध लागले. त्यांच्याच्याने दुसर्‍या दिवसापर्यंतचा तेवढा काळ काढणं फारच कठीण झालं. रात्र कशीबशी व्यतित केल्यावर दिवस तर त्यांना जणु खायलाच उठलेला. प्रत्येक क्षण त्यांना एक एक युगासारखा वाटत होता. त्यांचं मन खूपच अधीर झालं. मनात तर्‍हेतर्‍हेचे विचार येऊ लागले. श्रीकृष्ण मला खरंच दर्शन देतील? माझ्यावर इतकी कृपा करतील? मी खरोखरच त्यांच्या दर्शनाच्या योग्य आहे का? माझ्यासारख्या कुटिल, पाखंडी व्यक्तीला ते आपलं दर्शन देतील का? या आणि अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांच्या विचारात ते कधी रडायचे कधी मूर्च्छित पडायचे. कधी विचार करायचे, श्रीकृष्णांनी माझ्यावर अशी दर्शनाची कृपा नाही केली तरी काहीच हरकत नाही. ते करुणासागर आहेत. पतितपावन आहेत. ते जरूर माझ्यावर आज ना उद्या कृपा करतील आणि ते आनन्दसागरात झुलू लागत. अशाप्रकारे मनाच्या-भावनांच्या कल्लोळांमध्ये दुपार टळली आणि सूर्य मावळतीकडे झुकला. गोरज समय आला आणि दूर क्षितीजावर गायींचे कळप येताना दिसू लागले. बाबाजी जवळच्या झाडींमध्ये लपून बसले. काही वेळातच परीसर गायींच्या आणि वासरांच्या हंबरण्याने आणि त्यांच्या गळ्यांतील घंटांच्या आवाजाने भरून गेला. गुराखी आपापल्या गायी वेगळ्या करून घेताना दिसू लागले. त्याबरोबरच त्यांच्या वाटा वेगळ्या होऊ लागल्याचंही समजून येऊ लागलं. या सर्वांच्या शेवटी एक सावळ्या वर्णाचा बाल गुराखी येताना बाबाजींनी पाहिलं. त्याच्या हातात गुराखी वापरतात तशी काठी होती. त्या काठीच्या साहाय्याने आपल्या गायींना वेगळं करून त्वरेने तो त्यांना नंदगावच्या दिशेने वळवू लागला. तेव्हाच बाबाजींनी उडी मारून त्या मुलाचे पाय घट्ट पकडले आणि त्याला साष्टांग दण्डवत घातला.
तो मुलगा गडबडला. बाबाजींच्या पकडीतून सुटण्याचा प्रयत्न करत तो त्यांना म्हणाला, "ए बाबा! असं काय करतोयस? बाबाजी असून एका गुराख्याच्या पाया पडतोस होय? सोड, सोड, जाऊ दे मला!"
"दयामय! दया करा! दया करा!", बाबाजी हमसून हमसून रडत म्हणू लागले. त्यांच्या अश्रुंनी त्या बाल गोपाळाच्या पायांना अगदी भिजवून टाकलं. अवरुद्ध कंठाने आणि अस्पष्ट आवाजात बाबाजी काहीतरी बोलू लागले पण लौकिक कानांमध्ये त्या ध्वनीतून कोणताही अर्थबोध होत नव्हता. तो गोपाळ पुन्हा त्यांना बोलला, "बाबा, अरे, वेड लागलंय का तुला? बघ! मला जाऊ दे, उशीर होतोय. माझी आई फटकावून काढेल मला गायींना घरी आणण्यासाठी जास्त उशीर केला तर."
"नाही, नाही, प्रभु! असं माझ्याशी कपट खेळू नका. कृपा करा, दयाघना! दया करा." बाबा म्हणाले.
"अरे बाबा, मीच तुझ्या पाया पडतो पण मला सोड. त्यापेक्षा असं कर, तू माझ्यासोबतच माझ्या घरी चल. मी तुला माझ्या घरनं माधुकरी देतो. लोणी-साखरही देतो. तुला आणखी काय हवं ते देतो, पण मला आता सोड." तो गोपाळ बाबांना समजावत म्हणाला.
खरं तर तो गोपाळ आणि बाबाजी दोघेही एकमेकांच्या स्पर्शांनी पुलकित झाले होते पण श्रीकृष्ण आपल्या स्वभावगत खोडकरपणाला जागून बाबाजींना वेगवेगळी कारणं आणि आमिषं दाखवत होते. तरीही बाबाजींनी स्वतःचा हेका सोडला नाही. ते श्रीकृष्णांच्या आमिषांना बळी पडले नाहीत. आणि भुलणार तरी कसे? त्यांच्या मनात भगवंतांच्या ल्हादिनी शक्तीचा प्रकाश पसरलेला असताना ते शक्यच नव्हतं. खूप वेळ भगवंत आणि त्याचा भक्त यांच्यात भाव-युद्ध सुरू राहिलं पण शेवटी भक्ताच्या प्रेमाचा, त्याच्या प्रेमशक्तीचा विजय झाला. त्याच क्षणाला बाबाजींना जाणीव झाली की एक अवर्णनीय असा सुगंध सभोवार पसरला आहे. असा सुगंध की ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती. त्याचा आस्वाद घेता घेता बाबाजींना अत्यंत कर्णमधुर पण गंभीर शब्द ऐकू आले, "ठीक आहे, होऊ दे तुझ्या मनासारखं!"
पुढच्याच क्षणी बाबाजींना त्या गोपाळाच्या जागी भगवंतांच्या त्रिभंग - मुरलीधारी रूपाचं दर्शन झालं. त्या मनोहारी दर्शनानंही बाबाजींच्या जीवाची तृप्ती झाली नाही. ते भगवंतांना म्हणाले, "प्रभो, मी युगल उपासक आहे. तुमच्या एकट्याच्या दर्शनाने माझी विरह ज्वाला कशी शांत होईल? एकदा सपरिवार दर्शन देऊन माझ्या तप्त हृदयाला शीतलता द्या, माझ्यावर आणखी येवढी कृपा करा."
तेव्हा बाबाजींच्या भाग्याची परीसीमा झाली आणि त्यांच्यासमोर एका दिव्य प्रकाशाचा उदय झाला. त्यांच्या नजरेसमोरचा प्रकाश तेजस्वी होता पण त्यामुळे त्यांचे डोळे दिपले मात्र नाहीत. त्यातही एक प्रकारचा सौम्यपणा असल्याचं त्यांना जाणवलं. थोडं सरावताच बाबाजींना समोर एक सिंहासन दिसलं आणि त्या सिंहासनावर बसलेल्या युगल रुपातील श्रीश्रीराधा-माधवांना बघून त्यांच्या डोळ्याचं पारणंच फिटलं. 
काही क्षणांपूर्वीचा त्रिभंग मुरलीधररुपातील श्रीकृष्ण आता युगल रुपात नीलवर्णीय माधव बनल्याचं आणि आपली ल्हादिनी शक्ती श्रीमति राधाराणीच्या शेजारी आनंदात स्थानापन्न झाल्याचं त्यांनी पाहिलं. तापलेल्या सुवर्णाप्रमाणे अंगकांती असलेली राधाराणी त्यांना स्वतःला आपल्या स्नेहार्द्र नजरेने आश्वस्त करत असल्याचं त्यांना जाणवलं. राधा-माधवांच्या दोन्ही अंगांना ललिता सखी आणि विशाखा सखी त्यांनी पाहिल्या. माधवाच्या शेजारी वेगवेगळ्या स्वादिष्ट व्यंजनांचं ताट घेतलेली चंपकलता सखी त्यांनी पाहिली. तिच्या शेजारी रानफुलांच्या माळा घेऊन चित्रा सखी उभी असल्याचं त्यांना दिसलं. राधा-माधवांच्या समोर आपल्या वीणेवर सुरेल झंकार करणारी तुंगविद्या सखी आणि तिच्या शेजारी जमिनीवर वेगवेगळ्या घटामध्ये जिने सुगन्धी वनस्पतींचा धूप केला आहे आणि जिच्याकडे अनेक प्रकारच्या अत्तराच्या कुप्या आहेत अशी रंगदेवी सखी त्यांनी पाहिली. श्रीमति राधाराणीच्या शेजारी हातामध्ये अनेक रत्ने आणि रत्नमाला घेऊन इन्दुलेखा सखी होती तर राधाराणीच्या मागे रंगदेवी सखीचं प्रतिबिंबच जणू अशी असलेली सुदेवी सखी त्यांनी पाहिली.
अष्टसखींद्वारे सेवित युगल सरकारांच्या रूपमाधुरीचं रसास्वादन करता करता बाबाजींच्या चित्तवृत्ती तल्लीन झाल्या. त्यांच्यामध्ये एक अपूर्व असा आनंदावेश उत्पन्न झाला पण चित्तवृत्तींच्या या आवेशाला धारण करण्याची क्षमता बाबाजींच्या जीर्ण देहामध्ये नव्हती. यामुळे बाबाजींनी तो देह त्यागून भगवंतांच्या नित्य लीलांमध्ये प्रवेश केला.

Monday, 9 May 2011

कृष्णसख्याच्या कथा - ३ (भगवंतांच्या सेवेची साधनं)


जयपूरचे महाराजा माधोसिंह यांनी वृन्दावनात एक मोठे मंदिर बांधण्याचा संकल्प सोडला. महाराजांचंच काम म्हणून त्याची मोठ्या प्रमाणावर पूर्वतयारी सुरू झाली. योग्य विधि-विधानपूर्वक जमीन अधिग्रहित करण्यात आली. जागेच्या प्रमाणानुसार मंदिराच्या वास्तुचं आरेखन चित्र बनवलं गेलं. मंदिराचं संकल्पचित्र आणि त्यावरचं नक्षीकाम महाराजांच्या पसंतीला उतरल्यावर मंदिराच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात झाली. त्यासाठी खास राजस्थानहून संगमरवर आणण्यात आलं.
मंदिराचं स्वरूप खूप मोठं असल्याने आणि ते प्रत्यक्ष महाराज माधोसिंहांचं कार्य असल्याने त्या कामासाठी मोठ्याप्रमाणावर निधि संकलित करण्यात आलेला होता. आजुबाजुच्या अनेक गावांमध्ये ही बातमी पोहोचताच अनेक गरजु त्या ठिकाणी मजुरीच्या आशेने गोळा झाले आणि त्या सर्वांना तेथे काही ना काही काम मिळालं. या मजुरांमध्ये वृन्दावनमधली एक व्यक्ती कुणाच्याही नकळत सामील झाली. भल्या पहाटे ही व्यक्ती आपल्या कामाच्या ठिकाणी, मंदिराच्या बांधकामाच्या स्थानी उपस्थित व्हायची. इतर मजुरांसोबत रांग लावून त्या दिवशी मुकादम जे काम करायला सांगेल ते काम ती व्यक्ती मन लावून करायची आणि दिवसभर काम केल्यावर संध्याकाळी जी रोजंदारी मिळेल त्या सगळ्याचे चणे विकत घेऊन सर्वच्या सर्व त्या मजुरांमध्ये वाटून टाकायची. अनेक दिवस हा परिपाठ सुरू राहिला. त्या मजुरांना हा अवलिया त्यांच्यापैकीच एक वाटायला लागला होता.
मंदिराचा पाया व्यवस्थित खणला गेला, त्याचा ओटा नीट बांधला गेला, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण दिशेला योग्य प्रमाणात पायर्‍या काढल्या गेल्या, ओट्यावर विवक्षित ठिकाणी खांब निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू होऊन थोड्याच दिवसात मंदिराचा प्रेक्षणीय सभामंडप आकाराला येऊ लागला. अशा प्रकारे काम होत होत काही दिवसातच संकल्प चित्राप्रमाणे मंदिर दिसू लागलं. महाराज माधोसिंहांना वेळोवेळी बांधकामात होणार्‍या प्रगतीची माहिती देण्यात येत होती. सभा मंडप आणि गर्भगृह आकाराला येत असताना महाराजांनी प्रत्यक्ष बांधकामाच्या जागेवर जाऊन आढावा घेण्याचं निश्चित केलं आणि त्यानुसार ते मंदिराच्या आवारात येऊन दाखल झाले.
महाराजांच्या बांधकामाच्या जागी दाखल होण्याने कुठेही चालू असलेल्या कामात खंड पडला नाही. सर्व मजुर नेहमीप्रमाणेच कामं करत होते. महाराज प्रत्येक ठिकाणी जाऊन झालेल्या कामाचा आढावा घेत होते.  एका ठिकाणी त्यांना इतरांपेक्षा वेगळा मजुर दृष्टीस पडला. इतर मजुरांपेक्षा सुदृढ, गौरवर्णी आणि तेजस्वी असा तो मजुर इतरांपेक्षा खूपच जास्त मन लावून काम करत होता. त्याची प्रत्येक कृती हे मंदिर उत्तमाहून उत्तम बनावं याच हेतूने प्रेरित असल्यासारखी वाटत होती. महाराजांना ही गोष्ट खूपच जाणवली. त्यांना आश्चर्य वाटलं आणि ते मनात विचार करू लागले, "हा मजुर कोण असावा? याची वेशभूषा इतरांपेक्षा निराळी आहे, त्याचा देहाकार आणि वर्णही वेगळा वाटतोय. त्याचा कामाचा  झपाटा आणि त्याची कामातली तत्परता बघून फार अचंबा वाटतोय. त्याच्या जवळ जाऊन बघूया तर खरं हा आहे कोण ते?" असं म्हणत महाराज त्या मजुराजवळ गेले. जवळ जाताच त्यांनी त्या व्यक्तीला ओळखले आणि पुढे जाऊन त्यांचे पायच पकडले. तो अवलिया मजुर दुसरा तिसरा कुणी नसून ते होते वृन्दावनातले गोपाळ बाबा!
महाराज गोपाळ बाबांना म्हणाले, "बाबा, इथे उन्हातान्हात मजुरीचं काम का करताय?" त्यावर त्यांनी उत्तर दिलं,
"महाराज, तुम्ही हा इतका मोठा मंदिराचा संकल्प सोडला आहे. यासाठी तुम्ही खूप खर्च करताय. यातून तुम्ही भगवंतांची धनाद्वारे सेवा करताय. आमच्याकडे आमचं स्वतःच भगवंतांच्या सेवेचं साधन आमचं हे शरीरच आहे. तेव्हा आम्ही आमच्या तना-मनाचाच भगवंतांच्या सेवेसाठी वापर करतोय. यात आता अडचण ती कोणती?"
गोपाळ बाबांना आपल्याकडे मजुरीचं काम करताना बघून महाराज माधोसिंह खजिल झाले. त्यांनी बाबांना आपल्याबरोबर जयपूरला गोविंदजींच्या दर्शनासाठी येण्याची विनंती केली. तेव्हा बाबा त्यांना म्हणाल्रे, "महाराज, यार ची इच्छा नाही की मी वृन्दावन सोडून कुठे जावं पण गोविंदजींचं निमंत्रण मी टाळू शकत नाही."
गोपाळ बाबा माधोसिंहांबरोबर गोविंदजींच्या दर्शनाला गेले पण तिथेही फार काळ थांबू शकले नाहीत. आपल्या यार च्या आठवणींनी त्यांना लवकरच पुन्हा वृन्दावनामध्येच दाखल व्हावं लागलं कारण वृन्दावनामधल्या त्यांच्या यारालाही त्यांच्याशिवाय कुठे करमत होतं.

कृष्णसख्याच्या कथा - २


बुन्देलखंडामधून वृन्दावनामध्ये आलेले गोपाळ बाबा आपला यार श्रीकृष्ण याच्यासारखेच खेळकर आणि विनोदी स्वभावाचे होते. पण त्यांच्या खेळकरपणात आणि विनोदात लोक कल्याणाचा आणि लोक शिक्षणाचा हेतु नेहमीच असायचा.
आपल्या जन्मगावाचा त्याग केल्यानंतर गोपाळ बाबा, जेव्हा काही काळ जंगलांमध्ये आणि दर्‍याखोर्‍यांमध्ये भटकत होते, तेव्हा काही दिवस दतिया संस्थानामध्ये त्यांचा निवास होता. गोपाळ बाबांचा ऋजु पण निर्भय स्वभाव, वैराग्य, निष्ठा-भक्ती आणि संगीत कलेचं मर्मग्राही ज्ञान यांच्यामुळे दतियानरेश त्यांच्याकडे आकर्षित झाले. बाबांना ते गुरूचा मान देत आणि कारभारही त्यांच्या अनुकूल मतांनुसारच करायचे. याच कारणाने बाबा दतियामध्ये असताना त्या भागामध्ये भक्ती आणि नामसंकीर्तनाचा खूप चांगला प्रसार झाला. गोपाळ बाबा जसे एक दिवस दतियामध्ये प्रकटले होते तसेच एक दिवस कुणालाही न सांगता न कळवता ते दतियामधून निघून गेले. दतियात त्यांच्या जाण्यानंतर कुणालाही त्यांचा ठावठिकाणा माहित नव्हता. गोपाळ बाबा वृन्दावनात आल्यानंतर काही काळाने ही बातमी दतियानरेशांना मिळाली. त्याबरोबर महाराज स्वतः जातीने वृन्दावनात आले आणि मोठ्या विनम्रतेने त्यांनी गोपाळ बाबांना पुन्हा दतियामध्ये येऊन राहण्याची गळ घातली. बाबांनी या गोष्टीला नकार दिला तरी ते त्यांच्या मागेच लागले. तेव्हा गोपाळ बाबा त्यांना म्हणाले, "आता तू नाहीच ऐकत आहेस तर येतो मी तुझ्याबरोबर!" याचा महाराजांना खूप आनंद झाला आणि त्यांनी प्रस्थानाचा मुहूर्त ठरवला.
ठरलेल्या दिवशी मुहूर्ताच्या वेळेला सकाळी सकाळी गोपाळ बाबा दतियानरेशांकडे आले आणि त्यांना म्हणाले, "चला महाराज, मी एकदम तयार होऊन आलेलो आहे. आपण लगेच निघूया." महाराजांनी बाबांकडे पाहिलं मात्र आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. गोपाळ बाबांनी स्वतःच्या तोंडाला संपूर्ण काळं फासलं होतं आणि ते गाढवावर उलटे बसून आले होते. महाराजांनी त्यांना विनम्रतेनं विचारलं, "बाबा, हे असं रूप का बनवलंत?  गाढवावर उलटं बसून येण्याचं काय प्रयोजन आहे?" त्यावर गोपाळ बाबा म्हणाले,
"एकदा ज्याने वृन्दावनाचा आश्रय घेतला आणि पुढे वृन्दावन सोडून कुठे दुसरीकडे जाण्याचा विचार केला तर त्याचं असंच रूप होतं. त्याच्यासाठी हे गाढवावरून धिंड काढण्या इतकंच दु:खद प्रकरण आहे."
गोपाळ बाबांनी असं म्हणताच दतियानरेशांना आपली चूक उमगली आणि ते बाबांना म्हणाले, "बाबा! माझ्या या अपराधाला क्षमा करा. मी तुम्हाला वृन्दावन सोडण्यासाठी भरीला घालून तुम्हाला खूपच त्रास दिला आहे. आता मी तुम्हाला दतियात या असं म्हणून अजिबात हट्ट करणार नाही."
गोपाळ बाबांचं ब्रजभूमीवर खूप प्रेम होतं आणि त्याबरोबरच त्यांचा ब्रजवासीयांवरही खूप स्नेह होता. असेच एकदा गोपाळ बाबा बरसान्यातल्या एका बागेमध्ये खूप उशीरापर्यंत बसून श्रीकृष्ण चिंतन करत होते. जवळच कुठेतरी त्यांना कुजबुज ऐकू आली. त्यांनी नीट कान देऊन ऐकलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की काही चोर जवळच्या एका गोस्वामींच्या घरामध्ये चोरी करण्याची योजना बनवत आहेत. ते त्यांच्याजवळ जाऊन त्यांना म्हणाले, "मी एक चोर आहे. मी पण येतो तुमच्या बरोबर चोरी करायला."
ऐन वेळी आलेल्या या नवागताला त्या चोरांनी आपल्यात सामिल करून घेतलं आणि त्या गोस्वामींच्या घरात सर्वजण घुसले. बाकी चोर घरातल्या मौल्यवान वस्तु एकत्र करू लागले पण गोपाळ बाबांचं लक्ष घरातल्या एका कोपर्‍यात असलेल्या देवघराकडे गेलं. त्यांनी देवघराचा दरवाजा उघडला तर त्यांना दिसलं की त्यातले ठाकुरजी तर झोपले आहेत. त्यावर ते म्हणाले, "अरे यार! इथे मी तुझ्या घरी आलोय आणि तू चक्क झोपून राहिलायस? चल उठ, माझ्यासाठी काही न्याहरी वगैरे बनवून चांगली बडदास्त ठेवणार आहेस की नाही?"
ठाकुरजी गाढ झोपलेले होते. ते थोडीच काही बोलणार होते, उत्तर देणार होते? त्यावर गोपाळ बाबा, "तू असा नाही उठणार, आता बघंच!" असं म्हणत देवघराच्या दरवाज्याजवळची घंटा मोठ्याने जोराजोरात वाजवू लागले. त्याबरोबर त्यांच्या बरोबरच्या चोरांनी जमा केलेला सगळा मौल्यवान मुद्देमाल तिथेच टाकला आणि ते सर्व जण पसार झाले. यामुळे गोस्वामींचं होणारं नुकसान टळलं आणि त्यांनी बाबांना खूप धन्यवाद दिले.

Friday, 6 May 2011

कृष्णसख्याच्या कथा - १


मनुष्याचं मन एक निराळच रसायन आहे आणि या मनाचा, शरीरावरचा आणि शरीरक्रियांवरचा परीणामही अनन्यसाधारण असतो. माणसाचं मन जेव्हा एखाद्या गोष्टींचं सतत मनन चिंतन करतं तेव्हा ते त्या गोष्टीसारखंच बनतं. त्या गोष्टीचे गुण मग मनामध्ये उमलायला लागतात. बुंदेलखंडातून ब्रजभूमीमध्ये आलेल्या एका बाबांचं असंच झालेलं. हे  बाबा ज्याचं चिंतन करायचे तो होता नंदगावचा गुराखी! त्यामुळे बाबांची वेशभूषा, राहणी, आचारविचार आणि वाणी सर्व ब्रजवासी गोपाळांसारखंच होऊन गेलं होतं. यामुळे आता लोकंही त्यांना 'गोपाळ बाबा' म्हणूनच हाक मारू लागली. गोपाळ बाबा ज्याची आराधना करायचे तो मोठा संगीत प्रेमी असल्याने गोपाळ बाबांनाही संगीतकलेमध्ये उत्तम गति आणि रुचि होती.
गोपाळ बाबांच्या पूर्व इतिहासाबद्दल फार थोड्या लोकांना माहिती होती. बुन्देलखंडातल्या ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्म झालेल्या बाबांना लहानपणापासूनच श्रीकृष्णप्रेमाची लागण झालेली होती. त्यांच्या विरक्तीमध्ये वाढ होऊ नये म्हणून त्यांचं लग्न त्यांच्या वयाच्या सोळाव्या वर्षीच करून देण्यात आलं. पण काही वर्षातच पत्नीच्या पहिल्या बाळंतपणात तिच्या प्रसव-पीडा बघून त्यांच्या वैराग्याने पुन्हा उचल खाल्ली आणि परीणामी घर-संसाराचा त्याग करून ते डोंगर-र्‍या नि जंगलांमध्ये श्रीकृष्णाचा शोध घेत फिरू लागले. त्यांची श्रीकृष्णाकडे बघण्याची दृष्टी साख्य भावामधली होती. ते त्याला 'यार' अशी हाक मारायचे. आपल्या 'यार'च्या आठवणीत आणि त्या आठवणीतून आलेल्या जगाला विसरायला लावणार्‍या मस्तीत फिरत फिरत गोपाळ बाबा ब्रजभूमीमध्ये पोहोचले होते.
ब्रजभूमीत पोहोचल्यावर गोपाळ बाबांचं श्रीकृष्णप्रेम दिवसेन्दिवस वाढतंच गेलं. श्रीकृष्णाच्या विरहात कधी ते ब्रजरजात, ब्रजभूमीच्या मातीत लोळायचे, कधी यमुनेच्या काठावर वाळवंटामध्ये तासन्तास कृष्णकीर्तन करायचे, कधी मंदिरांतील कृष्णाच्या मूर्तींकडे एकटक बघत राहायचे, कधी हसायचे, कधी रडायचे, कधी कृष्णाला मिठी मारण्यासाठी भान हरपल्यामुळे हात पसरून धाऊ लागायचे तर कधी भान परतल्यावर तो पकडीत येत नाही याची जाणीव होऊन, "हा कृष्ण!, हा श्यामसुंदर!! हा मदनमोहन!!! असं ओरडत जमिनीवर मूर्च्छित होऊन पडायचे. त्यांचे डोळे श्रीकृष्णदर्शनासाठी आसुसलेले राहून सतत अश्रुपात करायचे, कान श्रीकृष्णाच्या मुरलीच्या स्वर्गीय ध्वनिला ऐकण्यासाठी हपापलेले असायचे तर अंग-प्रत्यंग श्रीकृष्णाच्या स्पर्शासाठी व्याकूळ व्हायचे. यासाठी श्रीकृष्णाचा शोध घेत घेत ते कधी नंदगावात तर कधी गोकुलात, कधी गोवर्धनवर तर कधी कालिया डोहाजवळ, कधी सेवाकुंजामध्ये तर कधी निधिवनामध्ये भटकत राहात.
बाबांना श्रीकृष्णाच्या आठवणीमध्ये तळमळत आणि त्यांचा शोध घेत ब्रजभूमीत इथे तिथे भटकत खूप दिवस लोटले. पण तरीही त्यांना श्रीकृष्णदर्शन घडलं नाही तेव्हा त्यांच्या मनात एकदम विपरीत भावांनी उचल खाल्ली. ते म्हणू लागले, "मी ऐकलेलं की तू दयाळू आहेस, प्रेमी आहेस. जो एक पाऊल तुझ्या दिशेने टाकतो, त्याला भेटण्यासाठी तू स्वतः दहा पावलं पुढे येतोस. पण हे सगळं खोटं आहे. प्रत्यक्षात तू अत्यंत निर्दयी आणि क्रूर आहेस. तुझ्याशी यारी करणं म्हणजे पस्तावणं आहे, वाळवंटामध्ये तहानलेला माणूस जसा तडफडून मरतो, तसंच आहे. बस, तुटली आता आपली मैत्री! तुला नन्दराजाचा पुत्र म्हणून आपल्या युवराजपदाचा माज आहे तर मीही गोपाळ आहे. कधी भेटलास ना कुठेही, तर बोलणारच नाही मी तुझ्याशी, बोलणं तर सोडच, मी तर बघणारपण नाही तुझ्याकडे!"
त्या दिवसापासून गोपाळ बाबांनी मंदिरांमध्ये जाणं सोडलं, कृष्णलीलांच्या नाटकांचे प्रयोग बघणं सोडलं, कृष्णकीर्तन करणंही बंद केलं. इतर कुणालाही यातलं काही करताना पाहिलं की ते त्याला म्हणू लागले, "दादा! माझं ऐकाल तर याच्या भानगडीतच पडू नका. काहीच हाती गावणार नाही. खूप निष्ठूर आहे हो तो! बस, फक्त गोपींबरोबर हैदोस घालता येतो याला, आपली वास्तपुस्त करायची याला कुठे काही गरज पडलीय?"
इथे श्रीकृष्णही आपल्या सख्याच्या दर्शन-कीर्तनापासून वंचित राहिल्याने व्याकुळ झाले होते. त्यांचा मित्र स्वतः तर त्यांच्यावर रुष्ट झालेलाच होता त्याबरोबरच तो इतर भक्तांनाही काही-बाही सांगत होता - त्यांची दिशाभूल करत होता. या दोन्ही गोष्टी त्यांच्यासाठी असह्य होत्या.
एके दिवशी गोपाळ बाबा रमणरेतीमध्ये भटकत असताना, संध्याकाळच्या वेळी त्यांनी समोरून गायींचा कळप येताना पाहिला. त्या कळपामध्ये एक नीळ्या कमळासारखी कांती असणारा मुलगा, आपल्या मुरलीमधून अवर्णनीय अशी सुरावट वाजवत येत होता. थोडा जवळ आला तर गोपाळ बाबांना त्याचे सुंदर, कुरळे लांब केस, कमळाच्या पाकळीसारखे ओठ, सुंदर टपोरे डोळे, गळ्यात वनमाला आणि डोक्यावर खोचलेलं मोरपीस हे सारं दिसलं. त्यांनी एकदम म्हण्टलं, "अरे, हा तर माझा यार आहे!" गोपाळ बाबांच्या शरीरामध्ये एक आनंदाची लहर दौडू लागली. त्यांचा श्रीकृष्णावरचा सारा रोष कुठेतरी निघून गेला. आपला यार समोर दिसल्यावर, तुझं तोंडही बघणार नाही, ही आपली प्रतिज्ञाही ते विसरून गेले. स्तब्ध उभे राहून ते एकटक समोरून येणार्‍या श्रीकृष्णाकडे बघत त्याच्या रुपाचं आपल्या नजरेने जणु माधुर्यपानच करत राहिले. समोरासमोर आल्यावर त्यांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. दोघांचही भानच हरपून गेलेलं. सद्गदीत आवाजात श्रीकृष्ण त्यांना म्हणाले, "गोपाळा, मी कधीपासून तुला भेटण्यासाठी तळमळतोय आणि आत्ता आलास होय तू!"
हे ऐकताच श्रीकृष्णदर्शनाने शांत झालेला गोपाळ बाबांचा अभिमान, रोष एकदम उफाळून आला आणि  ते श्रीकृष्णाला म्हणाले, " राहू दे, राहू दे! खोटं कशाला बोलतोयस? तुला भेटायचं होतं तर तूच का नाही आलास माझ्याकडे? पण तू तर ब्रजभूमीचा युवराज आहेस ना, मग कशाला येशील माझ्याकडे?" असं म्हणून ते तिथून निघून जाऊ लागले.
श्यामसुंदरने त्यांना हाळी दिली, "गोपाळ, पुन्हा केव्हा भेटशील?"
"मी कुठे ही जागा सोडून जातोय? वृन्दावनातच तर राहतोय मी, तेव्हा गरज वाटेल तेव्हा घे भेटून इथेच!" असं म्हणत गोपाळ बाबा निघून गेले.
या दिवसानंतर गोपाळ बाबांचा श्यामसुंदरबरोबर यारीचा एक नवा अध्याय सुरू झाला. श्यामसुंदर त्यांना कधी प्रत्यक्ष भेटे तर कधी छद्म रुपात. पण दोघांमध्ये हास्य, व्यंग, उपालम्भ (भांडण) अशा प्रकारच्या साख्य भावातील अनेक प्रकारच्या लीला संपन्न झाल्या.