Saturday, 31 December 2011

श्री गर्ग संहिता - ५


भगवान् श्रीहरि पुढे म्हणाले, "रमादेवींच्या वैकुण्ठातल्या सहचरी, श्वेतद्वीपातल्या मैत्रीणी, भगवान् अजितांच्या (विष्णु) आश्रित, उर्ध्व वैकुण्ठनिवासिनी असलेल्या देवी त्याचप्रमाणे श्रीलोकाचलावर राहणार्‍या, श्रीलक्ष्मींच्या, समुद्रातून प्रकट झालेल्या मैत्रीणी, या सगळ्या व्रजामध्ये गोपी होतील. आपल्या आधी केलेल्या पुण्यकर्मांच्या प्रभावाने कुणी दिव्य, कुणी अदिव्य आणि कुणी सत्त्व, रज, तम अशा तीनही गुणांनी युक्त देवी, व्रजमंडलात गोपी होतील.
रुचिकडे पुत्ररूपाने अवतीर्ण झालेल्या द्युलोकपति भगवान् यज्ञाला पाहून देवाङ्गना प्रेमरसात न्हाऊन निघाल्या. त्यानंतर त्या देवल ऋषींच्या उपदेशावरून हिमालयात भक्तिभावाने तपश्चर्या करू लागल्या. हे ब्रह्मन्, त्या सर्वजणी माझ्या व्रजामध्ये येऊन गोपी बनतील.
भगवान् धन्वंतरि जेव्हा अंतर्धान पावले तेव्हा या भूतलावरील सर्व औषधी दु:खात बुडून गेल्या आणि भारतवर्षात स्वतःला अगदी निरुपयुक्त मानू लागल्या. त्या सर्वांनी सुंदर स्त्रीचा वेश धारण करून तपस्येला सुरूवात केली. चार युगांच्या समाप्तीनंतर, भगवान् त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना वर मागण्यास सांगितले. जेव्हा त्यांनी आपले डोळे उघडून भगवानांना पाहिले तेव्हा त्या त्यांना म्हणाल्या की तुम्ही आमचे पतितुल्य आराध्य होण्याची कृपा करा. त्यावर भगवान् त्यांना म्हणाले की द्वापाराच्या अन्ति तुम्ही सर्व लता रूपात वृन्दावनात रहाल आणि रासाच्या वेळी मी तुमचे मनोरथ पूर्ण करेन."
श्रीहरि पुढे म्हणतात, "ब्रह्मन्, भक्तिभावयुक्त त्या लता-गोपी बनतील. याचप्रमाणे जालंधर नगरीतील स्त्रिया वृन्दापतिच्या दर्शनानंतर मनातच संकल्प करत्या झाल्या की हे साक्षात् हरिच आमचे स्वामी होवोत. त्याचवेळी आकाशवाणी झाली की तुम्ही सर्वांनी रमापतिंची आराधना करावी मग वृन्देप्रमाणेच तुम्हीही वृन्दावनात भगवंतांच्या प्रिय गोपी व्हाल.
मत्स्यावतारादरम्यान मत्स्याला पाहताच समुद्रकन्या मोहित झाल्या. त्यादेखिल मत्स्य भगवानाच्या वरदानाने व्रजमंडलात गोपी बनतील.
माझे अंशभूत राजा पृथु खूप पराक्रमी होते. त्यांनी सगळ्या शत्रूंना जिंकून पृथ्वीवरील सर्व वाईट गोष्टींचं दोहन केलं होतं. त्यावेळी बर्हिष्मती नगरीतल्या अनेक स्त्रिया त्यांना पाहून मुग्ध झाल्या आणि प्रेम-विह्वल होऊन अत्रि ऋषींकडे जाऊन म्हणाल्या की सगळ्या राजमंडळातील सर्वश्रेष्ठ राजा पृथु अत्यंत पराक्रमी आहेत. ते आमचे काय केल्याने पति होऊ शकतील? ते जरा आम्हाला सांगा. तेव्हा अत्रि ऋषी त्यांना म्हणाले की तुम्ही लवकरात लवकर या सर्व वस्तुंचे धारण करणार्‍या पृथ्विरूपी गायीचं दोहन करा. ही गाय तुमचे समुद्रासारखे अगाध, अपार आणि दुर्गम मनोरथही पूर्ण करू शकेल.
तेव्हा हे ब्रह्मन्, त्या स्त्रियांनी आपल्या मनाचं दोहनपात्र बनवून आपल्या मनोरथांचं दोहन करवलं. यामुळे त्या सगळ्या वृन्दावनात गोपी होतील.  अनेक रूपवान् श्रेष्ठ अप्सरा ज्या जणु कामदेवाच्या सेनाच आहेत, भगवान् नारायण ऋषींना मोहित करण्यासाठी गंधमादन पर्वतावर गेल्या परन्तु तिथे भगवानांना पहाताच त्या स्तब्धच झाल्या. त्यांच्या मनात भगवन् नारायण ऋषींना आपला पति बनवण्याची इच्छा झाली. यावर सिद्धतपस्वी नारायण ऋषींनी त्यांना सांगितलं की तुम्ही व्रजामध्ये गोपी व्हाल तेव्हा तुमचं मनोरथ पूर्ण होईल.
हे ब्रह्मन्, सुतल देशातील स्त्रिया, भगवान् वामनांना पाहून त्यांची इच्छा करू लागल्या. त्यासाठी त्यांनी तपश्चर्येला आरंभ केला. म्हणून त्यादेखिल वृन्दावनात गोपी होतील.
भगवान् शेषावतारांना पाहून ज्या नागकन्यांनी त्यांना पति म्हणून मिळवण्यासाठी त्यांची सेवा-समाराधना केली, त्या सर्व नागकन्या बलदेवांबरोबर रासविहार करण्यासाठी व्रजमंडलामध्ये उत्पन्न होतील.
कश्यप वसुदेव बनतील. परम पूजनीया अदिति, देवकीरूपात अवतरित होतील. 'प्राण' नावाचा वसु शूरसेन आणि 'ध्रुव' नावाचा वसु देवक बनेल. 'वसु' नावाच्या वसुचा आविर्भाव 'उद्धव'रूपात होईल. दयापरायण ‘दक्ष’ प्रजापति अक्रूराच्या रूपात अवतार घेतील. 'कुबेर' हृदीक नावने आणि जलाधिपति 'वरुण' कृतवर्मा नावाने प्रसिद्ध होतील. पुरातन राजा 'प्राचीनबर्हि' गद आणि 'मरुत्' देवता उग्रसेन बनेल. या उग्रसेनाला मी राजा बनवेन आणि स्वतः त्याचा आणि त्याच्या राज्याचा रक्षक बनेन. भक्त राजा 'अंबरीष' हा युयुधान आणि भक्तप्रवर 'प्रह्लाद' सात्यकि नावाने प्रकट होतील. क्शीरसागर शंतनु असेल आणि वसुंमधले श्रेष्ठ 'द्रोण' साक्षात् भीष्मपितामह रूपात उत्पन्न होतील. 'दिवोदास' शल्यरूपात आणि 'भग' नामक सूर्य, धृतराष्ट्ररूपात अवतीर्ण होतील. पूषा नावाची प्रख्यात देवता पण्डु असेल. सत्पुरूषांमध्ये आदर प्राप्त धर्मराज स्वतः युधिष्ठिररूपात अवतार घेतील. 'वायु' देवता, महान् पराक्रमी भीमसेनाच्या तर स्वयंभुव 'मनु' अर्जुनाच्या रूपात प्रकट होतील. 'शतरुपा' सुभद्रा होईल आणि सूर्यनारायण कर्णाच्या स्वरूपात अवतार घेतील. 'अश्विनीकुमार' नकुल आणि सहदेव होतील. 'धाता', महान् बलशाली बाह्लिक नावाने विख्यात होईल. अग्निदेवता द्रोणाचार्याच्या रूपात अवतार घेतील. 'कलि'चा अंश दुर्योधन असेल. 'चंद्रमा', अभिमन्युरूपात अवतार घेतील. पृथ्विवर अश्वत्थामा साक्षात् शंकराचे रूप होईल. अशा प्रकारे तुम्ही सर्व देवता माझ्या आज्ञेने आपल्या अंश आणि स्त्रियांसह यदुवंशी, करुवंशी त्याचप्रमाणे इतर वंशीय राजांच्या कुलामध्ये प्रकट व्हा. पूर्वीच्या काळी माझ्या अवतारांच्या वेळी माझ्या ज्या राण्या होत्या त्या सगळ्या रमेच्या अंश होत्या, त्या सर्व माझ्या सोळा हजार एकशे आठ संख्येमध्ये प्रकट होतील."
असं म्हणून नारदमुनी पुढे जनकाला म्हणाले, "हे राजा, अशाप्रकारे कमळनिवासी ब्रह्मदेवाला सांगून भगवान् श्रीहरि दिव्यरूपधारिणी भगवती योगमायेला म्हणाले."
भगवान् श्रीहरि म्हणाले, "महामते, तू देवकीचा सातवा गर्भ तिच्या उदरातून खेचून वसुदेवपत्नी रोहिणीच्या उदरात स्थापित कर. ती कंसाच्या भयाने व्रजात नंदाघरी राहिल. पुढे तू स्वतः अशाच प्रकारे अलौकिक कार्य करून नंदपत्नी यशोदेच्या गर्भातून प्रकट हो."
पुढे नारदमुनी बोलले, "परमश्रेष्ठ राजन्, भगवान् श्रीकृष्णाचं वचन ऐकून सगळ्या देवतांसह ब्रह्मदेवाने त्यांना प्रणाम केला आणि आपल्या बोलण्याने पृथ्वीदेवीला धीर देत ते आपल्या धामामध्ये परतले. हे मिथिलेश्वर जनक राजा, तू भगवान् श्रीकृष्णाला साक्षात् परिपूर्णतम परमात्माच मान. कंस आदि दुष्टांचा विनाश करण्यासाठीच ते या धरणीवर अवतीर्ण झाले आहेत. शरीरावर जितके रोम आहेत तितक्या जिभा निर्माण झाल्या तरीही श्रीकृष्णांच्या महान् गुणांचं वर्णन करणं अशक्य आहे. हे महाराज, पक्षीगण जसे आपल्या शक्तीनुसार अवकाशात उडतात, त्याचप्रमाणे ज्ञानीजन आपल्या बुद्धीच्या शक्तीनुसार भगवान् श्रीकृष्णांच्या लीलांचे गायन करतात.
---------------------------------------------------------------------------------------------
अशाप्रकारे गर्गसंहितेतील गोलोकखंडातील नारद-बहुलाश्व संवादातला, 'अवतार-व्यवस्थेचे वर्णन' नावाचा पाचवा अध्याय पूर्ण झाला.

Monday, 12 December 2011

गर्ग संहिता - ४

पुढे भगवान् ब्रह्मदेवांना म्हणाले, "सुबल आणि श्रीदामा नावाचे माझे सखा नंद आणि उपनंदांच्या घरी जन्म घेतील. यांच्याशिवाय माझे इतर स्तोककृष्ण, अर्जुन आणि अंशु वगैरे जे मित्र आहेत त्यांचाही जन्म नवनंदांच्या घरात होईल. ब्रजमंडळामध्ये जे सहा वृषभानु आहेत, त्यांच्या घरांमध्येही विशाल, ऋषभ, तेजस्वी, देवप्रस्थ आणि वरूथप नावांचे माझे सखा अवतीर्ण होतील."
त्यावर ब्रह्मदेवांनी त्यांना विचारलं, "देवेश्वर! हे नंद कुणाला आणि उपनंद कुणाला म्हण्टलं जातं? त्याचप्रमाणे वृषभानुंची काय लक्षणं आहेत?
तेव्हा भगवंतांनी उत्तर दिलं, "ज्यांच्याकडे गोठ्यांमध्ये नेहमी गोपालन होतं आणि गोसेवा हीच ज्यांची उपजीविका आहे त्यांना मी 'गोपाल' असं म्हणतो. ज्या गोपाळांकडे नऊ लाख गायी असतात त्यांना 'नंद' म्हणतात. ज्यांच्याकडे पाच लाख गायी असतात त्यांना 'उपनंद' म्हणतात. ज्यांच्या अधिकारात दहा लाख धेनु रक्षणासाठी असतात त्यांना 'वृषभानु' म्हणतात तर ज्याच्या अधिकारात एक कोटी धेनुंचं रक्षण होतं त्याला 'नंदराज' म्हणतात. पन्नास लाख गायींची रक्षा करणारा 'वृषभानुवर' म्हणून ओळखला जातो. सुचंद्र आणि द्रोण हे दोघे या प्रकारच्या संपूर्ण लक्षणांनी युक्त असे संपन्न गोपराज बनतील आणि माझ्या दिव्य ब्रजातील सुंदर वस्त्रे धारण करणार्‍या, शंभर चंद्रांचं सौन्दर्य ल्यालेल्या गोपसुंदरींचे शंभर यूथ असतील."
भगवंतांनी असं म्हण्टल्यावर ब्रह्मदेवांनी त्यांना विचारलं, "भगवन्! तुम्ही दीनबंधू आणि प्रकृतिचेही कारण आहात, कृपया मला या यूथांची सगळी लक्षणं सांगाल का?"
त्यावर भगवंत म्हणाले, "संख्यासंदर्भाने शंभर कोटी म्हणजे एक अर्बुद आणि शंभर अर्बुद म्हणजे एक यूथ. या संख्येने असलेल्या गोपींमध्ये काही गोलोकवासिनी आहेत, काही द्वारपालिका आहेत, काही श्रुंगार-साधन-वाहिका आहेत तर काही शय्या-निर्मिती करणार्‍या आहेत. काही पार्षदश्रेणीमधल्या आहेत तर काही वृन्दावनाची देखरेख करणार्‍या आहेत. काही गोपींचा गोवर्धन गिरीवर निवास आहे. काही गोपी कुञ्जवनाच्या देखभालीचं कार्य करतात तर काही माझ्या निकुञ्जामध्ये निवास करतात. या सगळ्यांना माझ्यासोबत ब्रजामध्ये यावं लागणार. त्याचप्रमाणे गंगा-यमुनांचेही यूथ आहेत. तसेच रमा, मधुमाधवी, विरजा, ललिता, विशाखा आणि मायेचेही यूथ यामध्ये असतील. ब्रह्मदेवा, याप्रमाणे माझ्या ब्रजामध्ये आठ, सोळा आणि बत्तीस सखिंचेसुद्धा यूथ असतील. पूर्वीच्या अनेक युगांमध्ये ज्यांना मी त्यांनी मागितलेले वर प्रदान केलेले आहेत अशा श्रुति, मुनीपत्नी, अयोध्येतील महिला, श्रीरामांनी यज्ञात वापरलेल्या सुवर्ण सीता-प्रतिमा, जनकपुरी आणि कोसलनिवासी सुंदर्‍या आणि दण्डकारण्यादि अरण्यांतील भिल्लकन्या या देखिल माझ्यासोबत ब्रजामध्ये गोपीरूपात अवतरीत होतील आणि त्यांचेही यूथ असतील."
त्यावर ब्रह्मदेवांनी विचारलं, "या स्त्रियांनी कोणत्या पुण्यकर्मांमुळे हा ब्रजवासाचा वर मिळवला? कारण तुमचं धाम हे तर योगीजनांसाठीही दुर्लभ मानलं जातं."
तेव्हा भगवंत त्यांना म्हणाले, "फार पूर्वी श्रुतिंनी श्वेतद्विपात जाऊन माझ्या विराट पुरूषरूपाचे आपल्या मधुर वाणीने स्तवन केले होते. त्यावर सहस्त्र पाद विराट पुरूष प्रसन्न होऊन त्यांच्याशी बोलू लागले."
विराट पुरूष श्रुतिंना म्हणाले, "श्रुतिंनो, तुम्हाला जे काही मिळवण्याची इच्छा आहे त्याचा आशीर्वाद मागा. मी ज्यांच्यावर प्रसन्न झालो आहे त्यांना अप्राप्य असं काय असेल?"
तेव्हा श्रुति बोलल्या, "भगवन्, तुम्ही मन आणि वाणी यांच्या आधाराने जाणले जाऊ शकत नाही म्हणून मग आम्ही तुम्हाला पूर्णपणे जाणण्यास असमर्थ आहोत. पुराण जाणणारे ज्ञानी, तुम्ही 'आनंदमात्र' आहात असं सांगतात, तुमच्या त्या 'आनंदमात्र' रूपाचं आम्हाला दर्शन द्यावं."
श्रुतिंचं हे बोलणं ऐकून भगवंतांनी त्यांना सामान्य प्रकृतिच्या पलिकडल्या, त्यांच्या दिव्य गोलोक धामाचं दर्शन करवलं. हे धाम ज्ञानानंदस्वरूप, अविनाशी आणि निर्विकार आहे. इथे वृन्दावन नावाचं कल्पवृक्षांनी सुशोभित वन आहे. मनोहर बगिचे आहेत. सगळ्या ऋतुंमध्ये ते सुखदायीच असतं. तिथे सुंदर झर्‍यांनी आणि गुहांनी सुशोभित असा गोवर्धन गिरी आहे. रत्नं आणि मौल्यवान धातुंनी भरलेला हा श्रीमान् पर्वत विविध पशुपक्षांचं निवासस्थान आहे. इथे स्वच्छ जल असणारी यमुना नदीही वाहतेय. तिचे दोन्ही काठ रत्नांनी बांधलेल्या घाटांद्वारे सुयोजित आहेत. ते हंस आणि कमळं इत्यादिंनी नेहमी व्याप्त असतात. तिथे रास-रंगाने उन्मत्त गोपींचा समुदाय शोभायमान होतो आणि त्यांच्या मध्यभागी किशोरवयीन भगवान् श्रीकृष्ण असतात. त्या श्रुतिंना अशाप्रकारे आपल्या धामाचं दर्शन करवून भगवंत म्हणाले, "बोला, आता तुमच्यासाठी काय करू? तुम्ही माझं हे धाम तर पाहिलेलंच आहे, याखेरीज दुसरा उत्तम आशीर्वाद नाहीच."
त्यावर श्रुति म्हणाल्या, "हे प्रभो, तुमचा कामदेवाहून सुंदर विग्रह पाहून आमच्यात कामिनी-भावाची लागण झाली आहे आणि त्याच्या पूर्तीची उत्कट इच्छा होत आहे. आम्ही सार्‍या विरहाने तळमळत आहोत. तुमच्या गोपी जशा तुमचा संग मिळवण्यासाठी तुमची सेवा करतात तीच आमचीही इच्छा आहे."
तेव्हा श्रीहरि बोलले, "हे श्रुतिंनो, तुमचा हा मनोरथ दुर्लभ आणि दुर्घट आहे, पण मी तुम्हाला त्याच्या पूर्ततेचा वर दिलेला असल्याने तो पूर्ण होणार हे नक्की. तेव्हा ब्रह्मदेवांच्या पुढच्या नव्या जगत् निर्मितीमध्ये, सारस्वत कल्पाच्या समाप्तीनंतर तुम्ही सार्‍या ब्रजामध्ये गोपी बनाल. भूमण्डलातील मथुरामंडलामध्ये असलेल्या वृन्दावनातील रासमंडलात मी तुमचा प्रियतम बनेन. हे सर्व प्रकारच्या प्रेमाहून श्रेष्ठ आहे. त्यावेळेस तुमचा मनोरथ पूर्ण होईल."
असा श्रुतिंचा वृत्तांत ब्रह्मदेवांना सांगून भगवान् त्यांना म्हणाले, "आधीच्या कल्पामध्ये मी दिलेल्या आशीर्वादाचा परिणाम म्हणून श्रुति ब्रजामध्ये गोपी बनतील. आता इतर गोपींची लक्षणं ऐक."
त्रेतायुगामध्ये देवतांच्या रक्षणासाठी आणि राक्षसांच्या संहारासाठी माझे स्वरूपभूत महापराक्रमी श्रीरामचंद्रांचं अवतरण झालं. कमललोचन श्रीरामांनी सीतास्वयंवराच्या वेळेस जाऊन शिव धनुष्य तोडलं आणि तिच्याबरोबर विवाह केला. त्यावेळी जनकपुरीतील स्त्रिया श्रीरामांना बघून प्रेमविह्वल झाल्या. एकांतात त्यांनी, "राघव, तुम्ही आमचे प्रियतम बना", असा प्रस्ताव ठेवला. तेव्हा श्रीराम त्यांना म्हणाले की या जन्मामध्ये ते शक्य नाही तरी तुम्ही शोक करू नका. द्वापाराच्या अन्ति मी तुमची इच्छा पूर्ण करेन. तोपर्यंत तुम्ही श्रद्धा आणि भक्तिभावाने तीर्थ, दान, तप, शौच आणि सदाचाराचं पालन करा. ब्रजामध्ये गोपी बनण्याची संधी तुम्हाला मिळेल. असा वर देऊन धनुर्धारी, करुणानिधी श्रीराम अयोध्येला निघून गेले. अयोध्येला जाताना मार्गातील कोसल जनपथातील स्त्रियाही श्रीरामचंद्रांवर मोहित झाल्या. त्यांनी श्रीरामांना मनोमन आपला पति मानलं. तेव्हा सर्वज्ञ श्रीरामचंद्रांनी त्यांचे मनोरथ जाणून त्यांनाही, ब्रजामध्ये गोपी होण्याचा आणि तिथे त्यांच्या मनोरथपूर्तीचा आशीर्वाद दिला.
अशाप्रकारे सीता आणि आपल्या सेनेसहित श्रीराम अयोध्येत पोहोचले. ही वार्ता ऐकताच अयोध्येतल्या स्त्रिया त्यांना पहाण्यासाठी आल्या आणि त्यांना बघून मुग्ध झाल्या. श्रीरामांच्या प्रेमात विह्वल होऊन त्या शरयु नदीच्या तिरावर तप करू लागल्या. त्यावेळी आकाशवाणी झाली - द्वापाराच्या अंताला यमुनेच्या किनारी ब्रजभूमीमध्ये तुमचे मनोरथ नि:संशय पूर्ण होतील.
पुढे ज्यावेळी पित्याच्या आज्ञेने श्रीराम, धनुर्धारी लक्ष्मण आणि सीतेसहित वनवास करत होते तेव्हा तेथिल अनेक ऋषि-मुनि गोपालवेषातील भगवंतांच्या स्वरूपावर ध्यान करत होते. रासलीलेच्या निमित्ताने ते भगवंतांचे ध्यान करत होते. युवावस्थेतील धनुर्धारी श्रीरामचंद्रांना दुसर्‍या वेशातील भगवंतच समजून ते श्रीरामांकडे आकर्षित झाले. त्यांची समाधि भंगली. ते एकमेकांमध्ये बोलू लागले की गोपालजीच वंशीशिवाय आलेले आहेत. त्यांनी श्रीरामचंद्रांना मनोमन प्रणाम करून त्यांची स्तुति करण्यास आरंभ केला. त्यामुळे प्रसन्न होऊन श्रीराम त्यांना म्हणाले वर मागा. त्यावर त्या सर्वांनी एका सूरात सांगितलं की जशी सीता तुमच्या प्रेमाला प्राप्त करते तशाचप्रकारे आमची मागणी आहे.
त्यावर श्रीरामचंद्र त्यांना म्हणाले, "तुम्हाला लक्ष्मणाप्रमाणे माझा बंधू व्हायचं असेल तर मी आत्ताच तुमची ही अभिलाषा पूर्ण करू शकेन पण तुम्ही सीतेसारखे बनायचा वर मागितल्यामुळे हा महाकठीण आणि दुर्लभ वर बनला आहे. कारण यावेळी मी एकपत्नीव्रती असून मर्यादारक्षणात तत्पर राहून 'मर्यादापुरूषोत्तम' नावानेही ओळखला जातो. तेव्हा तुम्हाला दिलेल्या वराचा आदर राखून द्वापाराच्या अन्ति मी तुमची वरपूर्ती करेन. असं म्हणून श्रीराम पुढे पञ्चवटीला गेले.
पंचवटीमध्ये श्रीरामचंद्रांना तिथल्या भिल्ल स्त्रियांनी पाहिलं आणि त्या त्यांच्या प्रेमात विव्हल बनल्या. श्रीरामांच्या चरणांची धूळ मस्तकी लावून त्यांनी प्राणत्यागाचीही तयारी केली. तेव्हा श्रीराम ब्रह्मचारी वेषात तिथे आले आणि त्यांनी त्या स्त्रियांना प्राणत्याग करण्यापासून थांबवलं. ते त्यांना म्हणाले की तुम्ही व्यर्थ प्राणत्याग करत आहात. तसं करू नका. द्वापाराच्या अन्ति तुमचे मनोरथ पूर्ण होतील.
पंचवटीहून दानवराज रावणाने सीतेचे हरण केले आणि तिच्या शोधार्थ श्रीराम आणि लक्ष्मण दक्षिण दिशेकडे गेले. तिथून त्यांची भेट सुग्रीवादि वानरांशी झाली आणि त्यांच्याकडून सीतेची माहिती मिळाली. वानरांच्या साहाय्याने सीतेची मुक्ति करवून तिच्यासह श्रीरामचंद्र पुन्हा अयोध्येला आले. पुढे लोकापवादामुळे त्यांनी सीतेचा वनामध्ये त्याग केला. या घटनेनंतर श्रीरामचंद्र जेव्हा जेव्हा यज्ञ करत तेव्हा तेव्हा विधिवत् सीतेची सुवर्णमूर्ती बनवायचे आणि त्या मूर्तीला आपल्या शेजारी बसवून यज्ञ करायचे. अशाप्रकारे श्रीरामांच्या निवासस्थानी अशा यज्ञ-सीतांच्या मूर्तींचा समूहच बनला. एके वेळी या सर्व दिव्य चैतन्यशाली मूर्ती श्रीरामांकडे गेल्या तेव्हा श्रीराम त्यांना म्हणाले की मी तुमचा स्विकार करू शकणार नाही. त्या दिव्य स्वर्णिम सीतामूर्तींनी त्याचं कारण विचारलं. त्या श्रीरामांना म्हणाल्या, "आम्ही तुमची सेवा करणार्‍या आहोत, आमचं नावही मिथिलाकुमारी सीता आहे आणि आम्हीही व्रताचरण करतो, यज्ञाच्या वेळेला तुमची अर्धांगिनी बनतो तर मग तुमच्यासारख्या धर्मात्मा आणि वेदमार्गानुसारी व्यक्तिकडून अशी अधर्मयुक्त वाणी कशी निर्माण होते आहे? अशा प्रकारे तुम्ही आमचा त्याग केल्यास तुम्ही पापकर्माचरण केल्यासारखे होईल."
त्यावर श्रीरामचंद्र त्यांना म्हणाले, "देवींनो, तुम्ही आत्ता जे काही म्हणत आहात ते निश्चितच सत्य आणि योग्य आहे. परन्तु मी एकपत्नीव्रती आहे आणि लोकं मला राजर्षि मानतात तेव्हा मी नियम तोडू शकत नाही. एकमात्र सीताच माझी सहधर्मिणी आहे तेव्हा आता तुम्ही द्वापार युगाच्या अन्ति श्रेष्ठ अशा श्री क्षेत्र वृन्दावनात अवतरित व्हा, मी तिथे तुमची मनोकामना पूर्ण करेन."
श्रीहरि पुढे म्हणाले, "ब्रह्मदेव, अशा प्रकारे यज्ञ-सीताही ब्रजामध्ये गोपी बनणार आहेत. आता इतर गोपींची लक्षणंही ऐक."
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अशाप्रकारे श्रीगर्गसंहितेतील गोलोकखंडान्तर्गत भगवद्-ब्रह्म संवादातल्या 'अवतारकार्यविषयक प्रश्नाचे वर्णन' नावाचा चतुर्थ अध्याय पूर्ण झाला.

Monday, 19 September 2011

श्री गर्ग संहिता - ३


हे ऐकून बहुलाश्व राजाने नारद मुनिंना विचारलं, "हे मुने! परात्पर महात्मा भगवान् श्रीकृष्णचंद्रांचं दर्शन घेतल्यानंतर सर्व देवतांनी पुढे काय केलं, हे मला सांगण्याची कृपा कराल का?"
त्यावर नारद मुनि त्यांना म्हणाले, "राजन्, त्यावेळी अष्टभुजाधारी वैकुण्ठाधिपति भगवान् श्रीहरि उठले आणि बघता बघता साक्षात् भगवान् श्रीकृष्णांच्या शरीरामध्ये विलीन झाले. त्याचवेळी कोटीसूर्यांप्रमाणे तेजस्वी, प्रचंड पराक्रमी, पूर्णस्वरूप भगवान् नरसिंह उपस्थित झाले आणि भगवान् श्रीकृष्णाच्या तेजामध्ये लीन झाले. त्यानंतर तिथे लाख घोडे जोडलेल्या शुभ्रवर्णी रथावर आरूढ होऊन, श्वेतद्विपाचे स्वामी, सहस्रबाहु विराट् पुरूष, श्रीलक्ष्मींसह आले. ते स्वतः आपल्या सर्व आयुधांना धारण केलेल्या अवस्थेत होते आणि त्यांचे पार्षदगणही चहुबाजूंनी त्यांच्या सेवेसाठी उपस्थित होते. ते सर्वही त्याचवेळी श्रीकृष्णांच्या श्रीविग्रहात सहजतेने प्रविष्ट झाले. त्यानंतर धनुष्य-बाणधारी कमलनयन भगवान् श्रीरामांचे सीता आणि आपल्या इतर तिन्ही भावंडांसह तिथे आगमन झाले. त्यांचा दिव्य रथ दहा कोटी सूर्यांच्या तेजासमान प्रकाशमान होता. त्यांच्यावर सतत चवर्‍या ढाळल्या जात होत्या. असंख्य वानरयूथपति त्यांचे संरक्षणासाठी नियुक्त होते. त्यांच्या रथाच्या लक्ष चाकांमधून मेघगर्जनेसमान ध्वनि उत्पन्न होत होता. त्यावर लक्ष ध्वजा फडफडत होत्या. लक्ष घोडे जुंपलेल्या सुवर्णमय रथावर बसलेले भगवान् श्रीरामही श्रीकृष्णचंद्रांच्या दिव्य विग्रहात लीन झाले. तेव्हाच प्रलयकाळच्या जाज्वल्यमान अग्निज्वालेसमान तेजस्वी साक्षात् यज्ञनारायण श्रीहरि तिथे आले. ज्योतिर्मय रथावर, आपली धर्मपत्नी दक्षिणा हिच्यासह असलेले तेही श्यामविग्रह भगवान् श्रीकृष्णचंद्रांमध्ये विलीन झाले. त्यानंतर मेघश्यामवर्णी, चतुर्भुज, विशाल नेत्रधारी, मुनिवेशधारी भगवान् नर-नारायण साक्षात् तिथे उपस्थित झाले. त्यांनी कोटी विद्युल्लतेसमान तेजस्वी जटा धारण केल्या होत्या. आपल्या अखण्ड ब्रह्मचर्याने युक्त भगवान् नारायणांकडे सगळे देव बघतच होते की त्यांनीही स्वतःला श्रीकृष्णामध्ये विलीन करून घेतलं. अशा प्रकारच्या दिव्य दर्शनांनी देवता अत्यंत आश्चर्य चकित झाल्या. त्यांना व्यवस्थित समजून चुकलं की परमात्मा श्रीकृष्णचंद्रच स्वयं परिपूर्णतम भगवान् आहेत, तेव्हा ते त्या परमप्रभुची स्तुति करू लागले.
देव म्हणाले, "भगवान् श्रीकृष्णचंद्र, जे पूर्णपुरूष, परात्पर, यज्ञांचे अधिपति, कारणांचेही परम कारण, परिपूर्णतम परमात्मा आणि साक्षात् गोलोकधामाचे निवासी आहेत, त्या परम पुरूष श्रीराधावराला आमचा सादर प्रणाम असो. योगेश्वर लोकं म्हणतात की तुम्ही परम तेजस्वी आहात; शुद्ध अंतःकरणाच्या व्यक्ती असं मानतात की तुम्ही लीलाविग्रह धारण करणारे अवतारी पुरूष आहात; परंतु आम्ही आज आपल्या ज्या स्वरूपाला जाणलं आहे, ते या सगळ्यांहून भिन्न आणि अद्वितीय आहे; तेव्हा तुम्ही महत्तम तत्त्वांचे आणि महात्मांचे अधिपति आहात. परब्रह्मस्वरूप परमेश्वर अशा तुम्हाला आमचा नमस्कार असो. कित्येक विद्वानांनी व्यंजना, लक्षणा आणि स्फोटद्वारा तुम्हाला जाणण्याचा प्रयत्न केला; परंतु तरी ते तुम्हाला जाणू शकले नाहीत; कारण तुम्ही निर्दिष्ट भावरहित आहात. म्हणून तुम्ही मायेच्या पलिकडचे आहात आणि तुम्हाला निर्गुण ब्रह्म मानून आम्ही तुम्हाला शरण येतो. काही लोक तुम्हाला 'ब्रह्म' मानतात तर काही तुमच्यासाठी 'काल' या शब्दाचा प्रयोग करतात. कित्येकांची अशी धारणा आहे की तुम्ही शुद्ध 'प्रशान्त' स्वरूप आहात तर काही मीमांसकांनी असं मानलेलं आहे की पृथ्वीवर तुम्ही 'कर्म' स्वरूपात विराजमान आहात. काही प्राचीनांनी 'योग' या नावाने तर काहींनी 'कर्ता'च्या रूपात तुमचा स्वीकार केलेला आहे. अशाप्रकारे सगळ्यांची वेगवेगळी नावं आहेत. पण त्यांच्यापैकी कुणीही तुम्हाला परिपूर्णरीत्या जाणू शकलेला नाही. म्हणून अनिर्देश्य, अचिन्त्य आणि अनिर्वचनीय अशा तुम्हाला आम्ही शरण आलेलो आहोत. भगवन्! तुमच्या चरणांची सेवा कल्याणकारक आहे. तिला सोडून जो तीर्थ, यज्ञ आणि तपाचरण करेल किंवा ज्ञानाद्वारे सिद्ध होण्याचा प्रयत्न करेल, त्याला अनेक विघ्नांचा सामना करावा लागेल आणि तो त्याच्या साध्यप्राप्तीमध्ये यशस्वी होऊ शकणार नाही. भगवन्! आता आणखी काय बोलू, तुम्ही तर सगळंच जाणता, कारण तुम्हीच सर्व चराचर व्यापून आहात. ज्यांचे अन्तःकरण शुद्ध आहे आणि जे देहबन्धनापासून मुक्त आहेत त्या आमच्यासारख्या देवताही तुम्हालाच वंदन करतात. अशा पुरूषोत्तम भगवान् तुम्हाला आम्ही प्रणाम करतो. श्रीराधिकेच्या हृदयाला सुशोभित करणार्‍या चंद्रहार स्वरूप असलेल्या, गोपींच्या नेत्रांचा आणि जीवनाचा आधार असलेल्या आणि ध्वजाप्रमाणे गोलोकधामास अलंकृत करणार्‍या आदिदेव भगवान् (अशा) तुम्ही, संकटात सापडलेल्या आम्हा देवतांची रक्षा करावी, रक्षा करावी. भगवन्! तुम्ही वृन्दावनाचे स्वामी आहात, गिरिराजपति असेही संबोधले जाता. तुम्ही ब्रजाचे अधिनायक आहात, गोपालरूप अवतार धारण करून अनेक प्रकारच्या नित्य विहार-लीला करता. श्रीराधिकेचे प्राणवल्लभ आणि श्रुतिधरांचेही तुम्ही स्वामी आहात. तुम्हीच गोवर्धनधारी आहात, तेव्हा आता धर्माचा भार सहन करणार्‍या या पृथ्वीचाही उद्धार करण्याची कृपा करा."
"देवतांनी अशाप्रकारे केलेली स्तुति ऐकून," नारदमुनि पुढे सागू लागले, "गोकुलेश्वर भगवान् श्रीकृष्णचंद्रांनी त्या देवतांना आपल्या मेघासमान गंभीर आवाजात आपला निर्णय सांगितला."
भगवान् श्रीकृष्ण देवतांना म्हणाले, "ब्रह्मा, शंकर आणि अन्य देवतांनो, तुम्ही सगळे मी जे सांगतोय ते ऐका. माझ्या आदेशानुसार तुम्ही आपापल्या पत्नींसह आणि अंशांसह यदुकुलात जन्म घ्या. मी सुद्धा अवतार घेईन आणि पृथ्वीचा ब हार हलका करेन. माझा हा अवतार यदुकुलात होईल आणि मी या कार्याची पूर्ण सिद्धी करेन. वेद माझी वाणी, ब्राह्मण माझे मुख आणि गाय माझं शरीर आहे. सर्व देवता माझे अंग आहेत, साधुपुरूष तर हृदयी निवास करणारे माझे प्राणच आहेत. म्हणून प्रत्येक युगात दंभपूर्ण दुष्टांद्वारे जेव्हा यांना पीडा दिली जाते आणि धर्म, यज्ञ आणि दयेवरही आघात होतात तेव्हा मी स्वतःला भूतलावर प्रकट करतो."
भगवान् श्रीकृष्णांचे हे शब्द सांगून नारदमुनि बहुलाश्व जनक राजाला पुढे म्हणाले, "ज्यावेळी जगताधिपति भगवान् श्रीकृष्णचंद्र अशाप्रकारे देवतांशी वार्तालाप करत होते त्याच वेळी 'आता माझ्या प्राणनाथांशी माझा वियोग होणार' असं वाटून श्रीराधिका व्याकूळ झाली आणि वणव्यात जळून दग्ध झालेल्या वेलीप्रमाणे मूर्च्छित होऊन पडली. तिच्या शरीरात अश्रु, कंप, रोमांच इ. सात्त्विक भावांचा उदय झाला. तशा अवस्थेत ती श्रीकृष्णांशी बोलू लागली."
श्रीराधा म्हणाली, "प्राणनाथ, तुम्ही पृथ्वीदेवींचा भार कमी करण्यासाठी जरूर भूमण्डलावर पदार्पण करा पण जाण्यापूर्वी माझी एक प्रतिज्ञाही ऐका. तुम्ही इथून गेल्यावर तुमच्या अपरोक्ष मी एक क्षणही इथे जिवंत राहू शकणार नाही. तुमचा माझ्या या प्रतिज्ञेवर विश्वास नसेल तर मी हेच पुन्हा सांगते. आत्ताच माझे प्राण कंठाशी आलेले आहेत. कापूर अग्नीच्या संपर्कात जसा भुर्कन् उडून जातो तसंच माझं शरीर अशाने उडून जाईल."
त्यावर श्रीकृष्णचंद्र भगवान् म्हणाले, "राधिके, तू अशी दु:खी होऊ नकोस. मी तुझ्याबरोबरच जाऊन पृथ्वीवरचा भार कमी करणार आहे. मी या देवतांना जे काही सांगितलं आहे ते तसंच अवश्य होणार आहे."
"पण हे प्रभो", श्रीराधिकेने विचारलं, "जिथे वृन्दावन नाही, यमुना नदी नाही आणि गोवर्धन पर्वतही नाही तिथे माझं मन कसं काय रमेल?"
नारदमुनि पुढे सांगू लागले, "राधाराणीने अशा प्रकारची शंका व्यक्त केल्यावर भगवान् श्रीकृष्णचंद्रांनी आपल्या धामातून चौर्‍याऐंशी कोस भूमी, गोवर्धन पर्वत आणि यमुना नदी भूतलावर पाठवली. त्यावेळी सगळ्या देवतांच्या वतीने ब्रह्मदेवांनी भगवान् श्रीकृष्णांना नमस्कार करून त्यांना काही शंका विचारल्या."
ब्रह्मदेवांनी भगवान् श्रीकृष्णांना विचारलं, "भगवन्, माझ्यासाठी कोणते स्थान असेल? तुम्ही कुठे जन्म घेणार आहात? आणि हे सगळे देव कोणकोणत्या घरात जन्म घेतील आणि त्यांची नावं काय काय असतील?"
तेव्हा भगवान् श्री़कृष्णचंद्रांनी त्याला उत्तर दिलं, "मी स्वतः वसुदेव आणि देवकी यांच्याकडे प्रकट होणार आहे. माझाच अंश असणारा 'शेष' नि:संशय रोहिणीच्या गर्भातून जन्म घेईल. साक्षात् 'लक्ष्मी' राजा भीष्मक यांच्या घरी पुत्रीरूपाने उत्पन्न होईल आणि तिचं नाव 'रुक्मिणी'असेल आणि 'पार्वती' ही 'जांबवती' या नावाने प्रकट होईल. यज्ञपुरुषाची 'दक्षिणा देवी' तिथे 'लक्ष्मणा' नाव धारण करेल. इथे जी विरजा नदी आहे, तीच 'कालिंदी' नावाने प्रसिद्ध होईल. भगवती 'लज्जा'चं नाव 'भद्रा' असेल. समस्त पापांच निराकरण करणारी 'गंगा', 'मित्रविंदा' नाव धारण करेल. जो या वेळी 'कामदेव' आहे तोच रुक्मिणीच्या पोटी 'प्रद्युम्न' रुपात उत्पन्न होईल. या प्रद्युम्नाच्या घरात तुझा अवतार होईल आणि त्यावेळी तुला 'अनिरुद्ध' नाव मिळेल, यामध्ये कसलाही संशय नाही. हे 'वसु' जे 'द्रोण' नावांनी प्रसिद्ध आहेत, ते व्रजात 'नंद' होतील आणि त्यांची प्राणप्रिया 'धरा देवी' ही 'यशोदा' नाव धारण करेल. 'सुचंद्र' हा 'वृषभानु' होईल आणि त्याची सहधर्मिणी 'कलावती' पृथ्वीवर 'कीर्ति' या नावाने प्रसिद्ध होईल. नंतर यांच्याच घरी श्रीराधिकेचा जन्म होईल. मी या व्रजमंडलात गोपींबरोबर नेहमीच रासविहार करेन."


अशाप्रकारे श्री गर्ग संहितेच्या गोलोक खंडान्तर्गत श्री नारद-बहुलाश्व संवादातील 'भूतलावर अवतीर्ण होण्याचे उद्योग वर्णन' नामक तिसरा अध्याय पूर्ण झाला.

Thursday, 15 September 2011

श्री गर्ग संहिता - २


नारद मुनी पुढे म्हणाले, "जो मनुष्य जीभ असूनही कीर्तनीय भगवान श्रीकृष्णांचे कीर्तन करत नाही तो बुद्धिहीन मनुष्य मोक्षपदाची शिडी मिळूनही त्यावर चढण्याचा प्रयत्नच करत नाही. हे राजा, या वाराहकल्पात पृथ्वीवर भगवान् श्रीकृष्णांचे जे आगमन झालेले आहे, त्यांनी ज्या ज्या लीला इथे केल्या, त्या सगळ्या मी तुला आता वर्णन करून सांगतो; ऐक. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे -

दानव, दैत्य, असुर - स्वभावाच्या मनुष्य आणि दुष्ट राजांच्या भाराने पृथ्वी अत्यधिक पीडित झाली. एका गायीचे रूप घेऊन अनाथ स्त्रीसारखी रडत रडत आपली आन्तरिक व्यथा सांगण्यासाठी ती ब्रह्मदेवांकडे गेली. त्यावेळी दु:खाने तिची काया थरथरत होती. तिची करुण कहाणी ऐकून ब्रह्मदेवांनी तिला धीर दिला आणि तात्काळ ते, शंकर आणि इतर देवतांना बरोबर घेऊन भगवान् नारायणांच्या वैकुण्ठ-धामी गेले. तिथे गेल्यावर ब्रह्मदेवांनी चतुर्भुज भगवान् विष्णुंना प्रणाम करून यासंबंधी आपलं निवेदन ऐकवलं.

त्यावर लक्ष्मीपति भगवान् विष्णु त्यांना आणि इतर देवतांना म्हणाले, "ब्रह्मन्, साक्षात् भगवान् श्रीकृष्ण हेच अगणित ब्रह्माण्डांचे स्वामी, परमेश्वर, अखण्डस्वरूप आणि देवातीत आहेत. त्यांच्या लीला अनन्त आणि अनिर्वचनीय आहेत. त्यांच्या कृपेशिवाय तुमचं हे अपेक्षित कार्य कधीही सिद्ध होणार नाही. तेव्हा तुम्ही सगळेजण लवकरात लवकर त्यांच्या परमोज्ज्वल आणि अविनाशी धामात जाणं उत्तम राहिल."

तेव्हा ब्रह्मदेव त्यांना म्हणाले, "प्रभो! तुमच्याशिवाय कुणी दुसरंही परिपूर्णतम असं तत्त्व आहे, हेच मला माहित नव्हतं. आता असा कुणी तुमच्याहूनही श्रेष्ठ परमेश्वर असल्यास त्यांच्या धामाचं तुम्हीच दर्शन करून द्या."

हे सांगून नारदमुनि जनकराजाला म्हणाले, "ब्रह्मदेवांनी असं म्हण्टल्याबरोबर भगवान् विष्णुंनी उपस्थित सर्व देवतांसह ब्रह्मदेवांना ब्रह्माण्ड-शिखरावर असलेला गोलोकधामाला जाणारा मार्ग दाखवला. भगवान् वामनदेवांच्या डाव्या पायाच्या अंगठ्याच्या आघातामुळे ब्रह्माण्डाच्या शिरोभागावर जी छिद्ररूपी भेग पडली होती ती ब्रह्मद्रवाने (नित्य अक्षय नीर) परिपूर्ण होती. त्या भेगरूपी मार्गातून जाऊ शकण्यायोग्य अशा जलयानातून सर्व देव ब्रह्माण्डाच्या कक्षेतून बाहेर पडले. ब्रह्माण्डाच्या वर पोहोचल्यावर जेव्हा त्यांनी खाली वाकून, जिथून आले त्या ब्रह्माण्डाला पाहिले तेव्हा त्यांना ते एखाद्या कलिंगफळाप्रमाणे (दुधी) दिसले. त्यांना असंही दिसलं की त्या फळासारखी अनेक इतर फळं त्या पाण्यात इथे-तिथे डुलत होती. हे सगळं पाहून देवतांना आश्चर्याचा धक्काच बसला. ते एकदम चकितच झाले. पुढल्या प्रवासात तिथून करोडों योजन अंतरावर उर्ध्व दिशेला त्यांना आठ नगरं लागली. त्यांच्या चारही दिशेला दिव्य तटबंदी उभारलेली होती. रत्नादिंनी युक्त वृक्षांनी या नगरांची मनोरम शोभा वाढत होती. तिथेच वरच्या अंगाला देवतांनी विरजा नदीच्या लाटा हळूवारपणे आपटणारा घाट बघितला. विरजा नदीचा तटप्रदेश उज्ज्वल रेशमी वस्त्र-प्रावरणांप्रमाणे शुभ्र दिसत होता. घाटावर दिव्य मणिमय पायर्‍या बांधलेल्या असल्याने ते दृश्य अतिशय मनोहर दिसत होतं. तटप्रदेशाची शोभा बघत बघत पुढे जाणार्‍या देवता, अनन्तकोटी सूर्यांइतक्या तेजःपुंज अशा त्यातल्या उत्तम नगरात पोहोचल्या. त्या नगराला बघताच देवतांचे डोळे दिपले नि ते जागच्याजागीच स्तब्ध झाले. तेव्हा भगवान् विष्णुंच्या आज्ञेने ब्रह्मदेवांनी त्या तेजाला प्रणाम केला आणि ते त्याची प्रार्थना करू लागले. त्याच तेजःपुंज ज्योतिच्या ठिकाणी त्यांना परम शांतिमय साकार धाम दिसलं. तिथे अद्भूत, कमलनालवर्णी, हजार फणांच्या शेषनागाचंही त्यांना दर्शन झालं तेव्हा इतर देवतांसह त्यांनी शेषनागांना प्रणाम केला. हे जनक राजा! त्या शेषनागाच्या कुशीमध्ये महातेजस्वी, लोकवन्दित गोलोकधामाचं त्यांना दर्शन झालं. या गोलोकधामामध्ये धामाभिमानी देवतांचा ईश्वर आणि गणनाशीलांमध्ये प्रमुख अशा काळाच्या आधीन काहीही नाही. इथे मायादेवीही आपला प्रभाव पाडू शकत नाही. मन, चित्त, बुद्धि, अहंकार, सोळा विकार त्याचप्रमाणे महत्तत्त्वसुद्धा इथे प्रवेश करू शकत नाही तिथे (सत्त्व-रज-तम या) त्रिगुणांविषयी काय म्हणावं? तिथे अत्यंत लावण्यशालिनी, श्यामसुंदरविग्रहा श्रीकृष्णांच्या पार्षदा (सख्या) द्वारपालनाचं कार्य करत होत्या. देवता दार ओलांडून आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्नात आहेत हे पाहताच त्यांनी सर्वांना दारातच थांबवलं.”

तेव्हा देवता गण म्हणाले, "आम्ही सगळे ब्रह्मा, विष्णु, शंकर नावाचे लोकपाल तथा इन्द्रादि देवता आहोत आणि भगवान् श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी आलेलो आहोत."

श्रीकृष्णांच्या द्वारपालिकांनी देवतांचं म्हणणं अन्तःपुरात जाऊन सांगितलं. तेव्हा पीतवस्त्रांकित आणि हातात वेताची छडी घेतलेली शतचंद्रानना नावाची सखी बाहेर आली आणि तिने देवतांच्या तिथे येण्याचं प्रयोजन विचारलं. ती म्हणाली, "इथे आलेले तुम्ही देवतागण कोणत्या ब्रह्माण्डाचे रहिवासी आहात? ते त्वरेने सांगा म्हणजे मला तसं भगवान् श्रीकृष्णांना सूचित करता येईल." 

त्यावर देवतागणांनी तिला सांगितलं, "अरे, हे तर फारच आश्चर्यजनक आहे, आमच्या ब्रह्माण्डाखेरिजही खरंच दुसरी अनेक ब्रह्माण्डं आहेत? आम्ही तर कधीच त्यांची स्वरूपं पाहू शकलेलो नाही. हे सुंदरी, आम्ही तर असंच समजत होतो की एकच ब्रह्माण्ड आहे."

तेव्हा शतचंद्रानना त्यांना म्हणाली, "ब्रह्मदेव, इथे विरजा नदीमध्ये करोडो ब्रह्माण्डं आहेत. त्या प्रत्येक ब्रह्माण्डामध्ये तुमच्यासारखेच अनेक देवतागण निवास करतात. तुम्ही स्वतःच्या ब्रह्माण्डाचे नावही जाणत नाहीत? असं वाटतंय की तुम्ही पूर्वी कधी इथे येऊच शकलेला नाहीत. आपल्या तुटपुंज्या ज्ञान-आधारावरच हर्षभरीत झाला आहात. असंही वाटतंय की तुम्ही कधी आपल्या घराबाहेरच पडलेला नाहीत. औदुंबराच्या फळांमध्ये असलेले किडे ज्या फळात राहतात त्या फळाशिवाय दुसर्‍या कशालाही जाणत नाहीत तशीच तुमची गत झालेली दिसतेय. तुम्हीही स्वतःच्या ब्रह्माण्डालाच एकमेव उपलब्ध ब्रह्माण्ड समजता."

हे ऐकून सर्व देवता उपहासाचा विषय बनल्यामुळे गप्प उभे राहिले. त्यावेळी भगवान् विष्णु म्हणाले, "ज्या ब्रह्माण्डामध्ये भगवान् पृश्निगर्भांचा सनातन अवतार झाला होता आणि त्रिविक्रमाच्या (विराटदेहधारी वामन) नखामुळे ज्या ब्रह्माण्डामध्ये विवर उत्पन्न झालेले आहे, त्या ब्रह्माण्डामध्ये आम्ही निवास करतो."

भगवान् विष्णुंचं बोलणं ऐकताच शतचंद्राननाच्या सगळ्या संदेहांचं निराकरण झाल्यामुळे तिने त्यांची प्रशंसा केली आणि ती स्वतः देवतागणांच्या आगमनाची वर्दी देण्यासाठी अन्तःपुरात गेली. तिथून ती लगोलग परतली आणि सर्वांना अन्तःपुरात येण्याची सूचना देऊन निघून गेली. 

यानंतर देवतागणांनी दरवाज्यातून आतमध्ये पदार्पण करून प्रथमच त्या परमसुंदर गोलोकधामाचं अवलोकन केलं. तिथे 'गोवर्धन' नामक गिरिराज स्थापित होते. गिरिराज गोवर्धनांचा प्रदेश वसन्तोत्सव साज‍रा करणार्‍या अनेक गोपि आणि गायींनी घेरलेला होता. कल्पवृक्ष आणि कल्पलतांच्या समुदायांनी सुशोभित होता त्याचप्रमाणे त्या प्रदेशाला रासमण्डल अलंकृत करत होतं. तिथे श्यामवर्णी यमुना नदी स्वच्छंद गतिने वाहत होती. तिच्या तटावर अनेक प्रासाद उभे होते आणि ते तिची शोभा वाढवत होते. त्या नदीत उतरण्यासाठी वैदूर्यमण्यांच्या पायर्‍यांनीयुक्त घाट बांधलेले होते. तिच्या किनार्‍या वरच दिव्य वृक्ष-वेलींनीयुक्त 'वृंदावन' अत्यंत शोभायमान दिसत होतं. चित्र-विचित्र पक्षी, भ्रमर आणि वंशीवटांमुळे तिथलं सौदर्य आणखी वाढत होतं. तिथे सहस्र कमलदलांपासून निघालेले सुगंधित परागकण चारही दिशांना पसरवणारा थंड वायु मन्द गतिने वाहत होता. अशा वृंदावनाच्या मध्यभागी बत्तीस वनांनी युक्त एक 'निज-निकुंज' होतं. हे निकुंज चारही दिशांनी तट-खंदकांनी सुशोभित होतं. त्याचं अंगण रक्तवर्णी अक्षयवटांनी सुशोभित होतं. पद्मरागादि सात प्रकारच्या मण्यांनी बनलेल्या त्याच्या भिंती आणि फरसबंद खूपच सुंदर दिसत होत्या. कोटीचंद्रबिंबांची छबीच जणू असे चांदवे त्या निकुंजाला सुशोभित करत होते आणि त्याच्या अन्तर्भागात चमचमते गोळे लटकत होते. फडफडत्या पताका आणि जागोजागी फुललेली फुले मंदिरांची आणि मार्गांची शोभा वाढवत होते. तिथल्या भ्रमरांचा गुंजारव जणू संगीताची वृष्टीच करत होता. त्याचप्रमाणे मत्त मयुर आणि कोकिळ यांचा कलरव सतत कानावर पडत होता. तिथल्या, बाल-सूर्याच्या पीत-रक्तवर्णाची कुण्डलं धारण करणार्‍या ललना शंभर-शंभर चंद्रांइतक्या गौरवर्णी सुंदरी होत्या. स्वच्छंद गतिने चालणार्‍या आणि मणिमय भिंतींमध्ये आपले मुखावलोकन करणार्‍या अशा सुंदर स्त्रिया तिथल्या रत्नजडित अंगणात फिरत होत्या. त्यांच्या गळ्यातील हार आणि बाहुंतील केयूर त्यांच्या सौन्दर्यात भर टाकत होते. पैजण आणि करधनींचे मधुर झंकार तिथे सतत गुंजत होते. गोपांगनांनी मस्तकावर चूडामणि धारण केले होते. तिथे प्रासादांच्या दारांमध्ये आभूषणांनी विभूषित आणि श्वेत पर्वतासमान अनेक गायींचे दर्शन होत होते. सर्व गायी तरुण, दूध देणार्‍या, सुशीला, सुरुचा, सवत्सा, पीतपुच्छा आणि सद्गुणवती होत्या. त्यांच्या गळ्यांतील घण्टांचा आणि मंजिरांचा मधुर ध्वनि उत्पन्न होत होता. त्या विविध रंगी होत्या. काही उजळ, काही काळ्या, काही पांढर्‍या, काही लाल, काही पिवळ्या, काही तपकिरी आणि काही चित्रविचित्रवर्णी होत्या. काहींचा धूम्रवर्ण, काहींचा कोळश्यासारखा काळा रंग होता. दूध देण्यामध्ये समुद्राशीच तुलना होऊ शकणार्‍या या गायींच्या शरीरावर तरुणींची करचिह्ने उमटवलेली होती. हरणांप्रमाणे उड्या मारणारी वासरं त्या दृश्याची शोभा अधिकच वाढवत होती. गायींबरोबरच मध्ये मध्ये लांब मानांचे आणि मोठ्या शिंगांचे धष्टपुष्ट, ज्यांना साक्षात् धर्मधुरंधर संबोधले जाते असे बैलही दिसत होते. या गायी-बैलांच्या सुरक्षेसाठी तिथे अनेक गोपाळही दिसत होते. त्यांच्यातल्या काहींच्या हातात वेताच्या छड्या दिसत होत्या तर काहींच्या हातात पावा होता. सर्व गोपाळ रंगाने सावळे होते. ते भगवान् श्रीकृष्णांच्या लीला इतक्या मधुर स्वरात गात होते की त्या ऐकून कामदेवही मोहित होऊन जाईल.

अशा दिव्य निज-निकुंजाला सर्व देवतांनी प्रणाम केला आणि त्यांनी त्यात प्रवेश केला. तिथे त्यांना सहस्रदलाच्या कमळाचं दर्शन झालं. ते कमळ इतकं सुशोभित होतं की जणु एखादा प्रकाशपुंजच असावा. त्या कमळावर आणखी एक सोळा पाकळ्यांचं कमळ होतं आणि त्याच्यावर आणखी एक अष्टदलयुक्त कमळ होतं. या अष्टदलयुक्त कमळावर उंच आणि तेजस्वी सिंहासन होतं. कौस्तुभ मणि जडवलेलं हे सिंहासन तीन पायर्‍यांनी सुशोभित होतं आणि त्यावरच भगवान् श्रीकृष्णचंद्र, श्रीराधिकाजींसह विराजमान झाले होते, असं दृश्य देवांनी पाहिलं. ते युगलरूप भगवान् आठ दिव्य सखींबरोबर होते तथा श्रीदामा प्रभृति आठ गोपालांद्वारे सेवित होते. त्यांच्या डोक्यावर हंसासारख्या शुभ्रवर्णाचे पंखे झुलत होते आणि त्यांच्यामागे हिर्‍यांच्या मुठी असलेल्या चवरी डुलत होत्या. भगवन्तांच्या सेवेमध्ये असे करोडो छत्र होते ज्यांची तुलना केवळ कोटीचंद्रांच्या कौमुदीशीच होऊ शकेल. भगवान् श्री़कृष्णांची डावी भुजा त्यांच्या डाव्या अंगाला असलेल्या श्रीराधिकाजींमुळे सुशोभित होत होती. भगवंतांनी स्वेच्छेने आपला उजवा पाय दुमडला होता. त्यांनी हातात मुरली धारण केली होती. त्यांच्या हास्ययुक्त मुखकमलाने आणि भ्रुकुटी-विलासाने जणु अनेक कामदेवांनाच मोहित करून ठेवलं होतं. त्या श्रीहरिंची कान्ति मेघाप्रमाणे श्यामल होती आणि त्यांचे डोळे कमलदलांप्रमाणे मोठे होते. आजानुबाहु भगवंतांनी पीतवस्त्रं धारण केली होती आणि वृंदावनात विचरण करणार्‍या मत्त भुंग्यांना आकर्षित करणारी सुंदर वनमाला गळ्यामध्ये घातली होती. पायामध्ये घुंगरु आणि हातांमध्ये कंकणांच्या छटा विलसत होत्या. त्यांचं अतिसुंदर हास्य फारच मनमोहक होतं. त्यांचं श्रीवत्साचं चिह्न, बहुमोल रत्नांनी बनलेले किरीट, कुण्डल, बाजूबंद आणि हार यथास्थान भगवंतांची शोभा वाढवत होते.

भगवान् श्रीकृष्णांचे असे दिव्य दर्शन प्राप्त झाल्यावर सर्व देवता जणु आनंदसागरातच गटांगळ्या खाऊ लागले. हर्षातिरेकाने त्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. तेव्हा सर्व देवतांनी हात जोडून विनीत भावाने त्या परमपुरुष भगवान् श्रीकृष्णचंद्रांना प्रणाम केला.