Saturday, 31 December 2011

श्री गर्ग संहिता - ५


भगवान् श्रीहरि पुढे म्हणाले, "रमादेवींच्या वैकुण्ठातल्या सहचरी, श्वेतद्वीपातल्या मैत्रीणी, भगवान् अजितांच्या (विष्णु) आश्रित, उर्ध्व वैकुण्ठनिवासिनी असलेल्या देवी त्याचप्रमाणे श्रीलोकाचलावर राहणार्‍या, श्रीलक्ष्मींच्या, समुद्रातून प्रकट झालेल्या मैत्रीणी, या सगळ्या व्रजामध्ये गोपी होतील. आपल्या आधी केलेल्या पुण्यकर्मांच्या प्रभावाने कुणी दिव्य, कुणी अदिव्य आणि कुणी सत्त्व, रज, तम अशा तीनही गुणांनी युक्त देवी, व्रजमंडलात गोपी होतील.
रुचिकडे पुत्ररूपाने अवतीर्ण झालेल्या द्युलोकपति भगवान् यज्ञाला पाहून देवाङ्गना प्रेमरसात न्हाऊन निघाल्या. त्यानंतर त्या देवल ऋषींच्या उपदेशावरून हिमालयात भक्तिभावाने तपश्चर्या करू लागल्या. हे ब्रह्मन्, त्या सर्वजणी माझ्या व्रजामध्ये येऊन गोपी बनतील.
भगवान् धन्वंतरि जेव्हा अंतर्धान पावले तेव्हा या भूतलावरील सर्व औषधी दु:खात बुडून गेल्या आणि भारतवर्षात स्वतःला अगदी निरुपयुक्त मानू लागल्या. त्या सर्वांनी सुंदर स्त्रीचा वेश धारण करून तपस्येला सुरूवात केली. चार युगांच्या समाप्तीनंतर, भगवान् त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना वर मागण्यास सांगितले. जेव्हा त्यांनी आपले डोळे उघडून भगवानांना पाहिले तेव्हा त्या त्यांना म्हणाल्या की तुम्ही आमचे पतितुल्य आराध्य होण्याची कृपा करा. त्यावर भगवान् त्यांना म्हणाले की द्वापाराच्या अन्ति तुम्ही सर्व लता रूपात वृन्दावनात रहाल आणि रासाच्या वेळी मी तुमचे मनोरथ पूर्ण करेन."
श्रीहरि पुढे म्हणतात, "ब्रह्मन्, भक्तिभावयुक्त त्या लता-गोपी बनतील. याचप्रमाणे जालंधर नगरीतील स्त्रिया वृन्दापतिच्या दर्शनानंतर मनातच संकल्प करत्या झाल्या की हे साक्षात् हरिच आमचे स्वामी होवोत. त्याचवेळी आकाशवाणी झाली की तुम्ही सर्वांनी रमापतिंची आराधना करावी मग वृन्देप्रमाणेच तुम्हीही वृन्दावनात भगवंतांच्या प्रिय गोपी व्हाल.
मत्स्यावतारादरम्यान मत्स्याला पाहताच समुद्रकन्या मोहित झाल्या. त्यादेखिल मत्स्य भगवानाच्या वरदानाने व्रजमंडलात गोपी बनतील.
माझे अंशभूत राजा पृथु खूप पराक्रमी होते. त्यांनी सगळ्या शत्रूंना जिंकून पृथ्वीवरील सर्व वाईट गोष्टींचं दोहन केलं होतं. त्यावेळी बर्हिष्मती नगरीतल्या अनेक स्त्रिया त्यांना पाहून मुग्ध झाल्या आणि प्रेम-विह्वल होऊन अत्रि ऋषींकडे जाऊन म्हणाल्या की सगळ्या राजमंडळातील सर्वश्रेष्ठ राजा पृथु अत्यंत पराक्रमी आहेत. ते आमचे काय केल्याने पति होऊ शकतील? ते जरा आम्हाला सांगा. तेव्हा अत्रि ऋषी त्यांना म्हणाले की तुम्ही लवकरात लवकर या सर्व वस्तुंचे धारण करणार्‍या पृथ्विरूपी गायीचं दोहन करा. ही गाय तुमचे समुद्रासारखे अगाध, अपार आणि दुर्गम मनोरथही पूर्ण करू शकेल.
तेव्हा हे ब्रह्मन्, त्या स्त्रियांनी आपल्या मनाचं दोहनपात्र बनवून आपल्या मनोरथांचं दोहन करवलं. यामुळे त्या सगळ्या वृन्दावनात गोपी होतील.  अनेक रूपवान् श्रेष्ठ अप्सरा ज्या जणु कामदेवाच्या सेनाच आहेत, भगवान् नारायण ऋषींना मोहित करण्यासाठी गंधमादन पर्वतावर गेल्या परन्तु तिथे भगवानांना पहाताच त्या स्तब्धच झाल्या. त्यांच्या मनात भगवन् नारायण ऋषींना आपला पति बनवण्याची इच्छा झाली. यावर सिद्धतपस्वी नारायण ऋषींनी त्यांना सांगितलं की तुम्ही व्रजामध्ये गोपी व्हाल तेव्हा तुमचं मनोरथ पूर्ण होईल.
हे ब्रह्मन्, सुतल देशातील स्त्रिया, भगवान् वामनांना पाहून त्यांची इच्छा करू लागल्या. त्यासाठी त्यांनी तपश्चर्येला आरंभ केला. म्हणून त्यादेखिल वृन्दावनात गोपी होतील.
भगवान् शेषावतारांना पाहून ज्या नागकन्यांनी त्यांना पति म्हणून मिळवण्यासाठी त्यांची सेवा-समाराधना केली, त्या सर्व नागकन्या बलदेवांबरोबर रासविहार करण्यासाठी व्रजमंडलामध्ये उत्पन्न होतील.
कश्यप वसुदेव बनतील. परम पूजनीया अदिति, देवकीरूपात अवतरित होतील. 'प्राण' नावाचा वसु शूरसेन आणि 'ध्रुव' नावाचा वसु देवक बनेल. 'वसु' नावाच्या वसुचा आविर्भाव 'उद्धव'रूपात होईल. दयापरायण ‘दक्ष’ प्रजापति अक्रूराच्या रूपात अवतार घेतील. 'कुबेर' हृदीक नावने आणि जलाधिपति 'वरुण' कृतवर्मा नावाने प्रसिद्ध होतील. पुरातन राजा 'प्राचीनबर्हि' गद आणि 'मरुत्' देवता उग्रसेन बनेल. या उग्रसेनाला मी राजा बनवेन आणि स्वतः त्याचा आणि त्याच्या राज्याचा रक्षक बनेन. भक्त राजा 'अंबरीष' हा युयुधान आणि भक्तप्रवर 'प्रह्लाद' सात्यकि नावाने प्रकट होतील. क्शीरसागर शंतनु असेल आणि वसुंमधले श्रेष्ठ 'द्रोण' साक्षात् भीष्मपितामह रूपात उत्पन्न होतील. 'दिवोदास' शल्यरूपात आणि 'भग' नामक सूर्य, धृतराष्ट्ररूपात अवतीर्ण होतील. पूषा नावाची प्रख्यात देवता पण्डु असेल. सत्पुरूषांमध्ये आदर प्राप्त धर्मराज स्वतः युधिष्ठिररूपात अवतार घेतील. 'वायु' देवता, महान् पराक्रमी भीमसेनाच्या तर स्वयंभुव 'मनु' अर्जुनाच्या रूपात प्रकट होतील. 'शतरुपा' सुभद्रा होईल आणि सूर्यनारायण कर्णाच्या स्वरूपात अवतार घेतील. 'अश्विनीकुमार' नकुल आणि सहदेव होतील. 'धाता', महान् बलशाली बाह्लिक नावाने विख्यात होईल. अग्निदेवता द्रोणाचार्याच्या रूपात अवतार घेतील. 'कलि'चा अंश दुर्योधन असेल. 'चंद्रमा', अभिमन्युरूपात अवतार घेतील. पृथ्विवर अश्वत्थामा साक्षात् शंकराचे रूप होईल. अशा प्रकारे तुम्ही सर्व देवता माझ्या आज्ञेने आपल्या अंश आणि स्त्रियांसह यदुवंशी, करुवंशी त्याचप्रमाणे इतर वंशीय राजांच्या कुलामध्ये प्रकट व्हा. पूर्वीच्या काळी माझ्या अवतारांच्या वेळी माझ्या ज्या राण्या होत्या त्या सगळ्या रमेच्या अंश होत्या, त्या सर्व माझ्या सोळा हजार एकशे आठ संख्येमध्ये प्रकट होतील."
असं म्हणून नारदमुनी पुढे जनकाला म्हणाले, "हे राजा, अशाप्रकारे कमळनिवासी ब्रह्मदेवाला सांगून भगवान् श्रीहरि दिव्यरूपधारिणी भगवती योगमायेला म्हणाले."
भगवान् श्रीहरि म्हणाले, "महामते, तू देवकीचा सातवा गर्भ तिच्या उदरातून खेचून वसुदेवपत्नी रोहिणीच्या उदरात स्थापित कर. ती कंसाच्या भयाने व्रजात नंदाघरी राहिल. पुढे तू स्वतः अशाच प्रकारे अलौकिक कार्य करून नंदपत्नी यशोदेच्या गर्भातून प्रकट हो."
पुढे नारदमुनी बोलले, "परमश्रेष्ठ राजन्, भगवान् श्रीकृष्णाचं वचन ऐकून सगळ्या देवतांसह ब्रह्मदेवाने त्यांना प्रणाम केला आणि आपल्या बोलण्याने पृथ्वीदेवीला धीर देत ते आपल्या धामामध्ये परतले. हे मिथिलेश्वर जनक राजा, तू भगवान् श्रीकृष्णाला साक्षात् परिपूर्णतम परमात्माच मान. कंस आदि दुष्टांचा विनाश करण्यासाठीच ते या धरणीवर अवतीर्ण झाले आहेत. शरीरावर जितके रोम आहेत तितक्या जिभा निर्माण झाल्या तरीही श्रीकृष्णांच्या महान् गुणांचं वर्णन करणं अशक्य आहे. हे महाराज, पक्षीगण जसे आपल्या शक्तीनुसार अवकाशात उडतात, त्याचप्रमाणे ज्ञानीजन आपल्या बुद्धीच्या शक्तीनुसार भगवान् श्रीकृष्णांच्या लीलांचे गायन करतात.
---------------------------------------------------------------------------------------------
अशाप्रकारे गर्गसंहितेतील गोलोकखंडातील नारद-बहुलाश्व संवादातला, 'अवतार-व्यवस्थेचे वर्णन' नावाचा पाचवा अध्याय पूर्ण झाला.